नवी मुंबई : नवी मुंबई शहर व लगतच्या परिसरातील गुन्हेगारीला पूर्णपणे वेसण घालण्यासाठी आणि नागरिकांच्या २४ तास सुरक्षेसाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक इंटिग्रेटेड सीसीटीव्ही कमांड सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रकल्पाद्वारे नवी मुंबई, पनवेल, सिडको, तळोजा एमआयडीसीसह तब्बल ४०११ हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लाइव्ह फीड एकाच छताखाली आणण्यात आले आहे. त्यामुळे विविध प्राधिकरणांच्या अखत्यारीतील कॅमेरे एकात्मिक प्रणालीद्वारे एकत्र आणणारा हा राज्यातील पहिलाच अनोखा प्रकल्प ठरला आहे.
कमांड सेंटरची दैनंदिन कार्यपद्धती अत्यंत नियोजनबद्ध आणि तंत्रज्ञानाधारित आहे. याद्वारे शहरातील प्रमुख रस्ते, चौक, संवेदनशील ठिकाणे आणि दळणवळण मार्गांवर २४ तास बारकाईने नजर ठेवली जाणार आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल, अपघात, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न किंवा आपत्कालीन परिस्थिती दिसताच तात्काळ संबंधित पोलीस ठाणे, बीट मार्शल किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना वायरलेस/कंट्रोल रूमद्वारे अलर्ट पाठवून तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे.
शहरात प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या प्रत्येक संशयास्पद हालचालीवर, वाहनांवर तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर या प्रणालीद्वारे २४ तास करडी नजर राहील. यामुळे केवळ गुन्हे प्रतिबंधच नव्हे, तर तपासाची गती, अचूक पुरावा संकलन, गर्दी नियंत्रण आणि वाहतूक नियमन यांमध्ये मोठी क्रांती घडेल तसेच पोलिसांच्या अंगावरील बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांमुळे प्रत्यक्ष कारवाईदरम्यान पारदर्शकता आणि विश्वासार्हता टिकून राहील. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल.मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त, नवी मुंबई
१२ एलसीडी स्क्रीन (व्हिडिओ वॉल) व्यवस्थापन
कमांड रूममधील २×६ आकाराच्या १२ मोठ्या एलसीडी स्क्रीनवर झोन, प्रमुख मार्ग व संवेदनशील परिसरानुसार कॅमेऱ्यांचे मॅपिंग केले आहे. त्यामुळे व्हीआयपी हालचाली, सण-उत्सव, मोर्चे किंवा विशेष बंदोबस्ताच्या वेळी आवश्यकतेनुसार प्राधान्यक्रम बदलून विशिष्ट भागांवर थेट स्क्रीनवर लक्ष केंद्रित करून योग्य नियोजन करण्यास मदत होणार आहे. केवळ रस्त्यावरील कॅमेरेच नव्हे, तर फिल्डवर कार्यरत असलेल्या पोलिसांचे बॉडी वॉर्न कॅमेरे, डॅश कॅम्स, प्रिझन व्हॅन कॅमेरे, सोलर कॅमेरे, जीपीएस वाहने आणि थेट ड्रोन कॅमेऱ्यांचे फीड या सेंटरमधील एलसीडी स्क्रीनच्या माध्यमातून रिअल-टाइम मॉनिटर केले जाणार आहे.