नवी मुंबई : केंद्र सरकारचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल पडत आहेत. विमानतळ प्रशासनाने २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी झालेली पहिली प्रवासी चाचणी यशस्वी पूर्ण झाल्याची माहिती जाहीर केली. २५ डिसेंबरपासून विमानतळावर नियमित उड्डाणांना सुरुवात होणार असल्याने ही चाचणी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
शेकडो स्वयंसेवकांना प्रवासी बनवून पूर्ण प्रक्रिया पार पाडली. यात चेक-इन, सुरक्षा तपासणी, बोर्डिंग प्रक्रिया आणि बॅगेज क्लेमपर्यंत सर्व टप्प्यांची काटेकोर तपासणी करण्यात आली. इंडिगो, अकासा आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या विमान कंपन्यांनी या चाचणीत सहभाग घेतला.
८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले होते. १९,५४० कोटी रुपयांच्या खर्चाने विकसित करण्यात आलेला हा देशातील सर्वात मोठा ग्रीनफिल्ड विमानतळ ठरणार आहे. मुंबई विमानतळावरील वाढत्या प्रवासी गर्दीचा भार कमी करण्यास नवीन विमानतळ महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
२५ डिसेंबरपासून उड्डाणांना सुरुवात करण्याची तयारी आहे. आम्ही लवकरच तुम्हा सर्वांचे स्वागत करण्यास उत्सुक आहोत! आमच्या टीमने शेकडो सिम्युलेटेड प्रवाशांसह पहिली प्रवासी चाचणी यशस्वी पूर्ण केली. चेक-इनपासून सुरक्षा, बोर्डिंग आणि बॅगेज रिक्लेमपर्यंत सर्व टप्प्यांची परिपूर्ण चाचणी करण्यात आली. आमच्या ‘पहिल्या प्रवाशांचे’, सीआयएसएफ, लार्सन ॲॅण्ड टुब्रो, एअरलाइन पार्टनर्स आणि संपूर्ण नवी मुंबई विमानतळाच्या टीमचे मनःपूर्वक आभार, असे विमानतळ प्राधिकरणाने म्हटले आहे.
नवी मुंबईकरांसाठी आणि संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशासाठी नवी मुंबई विमानतळाचे संचालन हा मोठा टप्पा ठरणार आहे. आता सर्वांचे लक्ष २५ डिसेंबरकडे लागले आहे, ज्या दिवशी येथून पहिले व्यावसायिक उड्डाण आकाशात झेप घेणार आहे.