नवी मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी आणि नवी मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले नवी मुंबई विमानतळ आता लोकांना सेवा देण्यासाठी सज्ज झाले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (एनएमआयए) उद्घाटन १७ एप्रिल २०२५ रोजी केले जाणार असून मे २०२५ पासून उड्डाणांना सुरुवात होणार आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बन्सल यांनी रविवारी याबाबतची माहिती दिली. रविवारी नवी मुंबई विमानतळावर पहिले व्यावसायिक विमान यशस्वीपणे उतरवण्यात आले.
मुंबई विमानतळावरून सुटलेले इंडिगो एअरलाईन्सचे ‘ए३२०’ विमान रविवारी दुपारी १.४० वाजता नवी मुंबई विमानतळावर लँड झाले. त्यामुळे आता नवी मुंबई विमानतळावरून लवकरच सेवा सुरू करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून वेगाने काम सुरू आहे. नवी मुंबई विमानतळावरून व्यावसायिक सेवांना मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरुवात होणार आहे, तर या विमानतळाचे उद्धाटन १७ एप्रिलला करण्याचा विचार आहे. “उद्घाटन झाल्यानंतर आम्ही प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज असू. एरोड्रोमच्या परवानगीसाठी आम्ही ६ फेब्रुवारी रोजी अर्ज करणार आहोत. ७० दिवसांच्या आत आम्हाला ही परवानगी मिळू शकते,” असे बन्सल यांनी सांगितले.
“देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे घेणाऱ्या महत्त्वाच्या एअरलाईन्सशी आम्ही चर्चा करत असून प्रवाशांना उत्तमोत्तम सुविधा देण्याचे आमचे ध्येय आहे. अतिरिक्त प्रवाशांचा भार पेलण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्व सुविधांनी युक्त आहे. त्यामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी होईल,” असेही बन्सल यांनी सांगितले.
नवीन विमानतळावर आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून प्रवाशांसाठी हे विमानतळ आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. “प्रवाशांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही उच्च दर्जाच्या सुविधा उभारल्या आहेत. त्यामुळे उड्डाण घेण्यासाठी प्रवाशांची तोबा गर्दी उसळली तरी आम्हाला कोणतीच अडचण येणार नाही,” असेही त्यांनी सांगितले.
रविवारी नवी मुंबई विमानतळाच्या उत्तर प्रवेशद्वाराजवळ व्यावसायिक विमान उतरवण्यात आले, त्यावेळी उरणचे आमदार महेश बालदी, सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅप्टन बीव्हीजेके शर्मा तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी सिंघल म्हणाले की, “मुंबई आणि नवी मुंबई विमानतळामधील अंतर हे फक्त ३५ किलोमीटरचे असल्यामुळे मुंबईच्या रहिवाशांनाही नवी मुंबई विमानतळावरून प्रवास करण्यासाठी आम्ही सोयीसुविधा उभारत आहोत.
नवी मुंबई विमानतळावर ११ ऑक्टोबर २०२४ रोजी भारतीय वायु दलाचे सी-२९५ या विमानाची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. वायुदलाच्या अनुभवी चालकांनी ही मोहीम यशस्वीपणे राबवली होती. आता रविवारी मुंबई ते नवी मुंबई या मोजक्या अंतराचे यशस्वी लँडिंग या विमानतळावर करण्यात आले. यापूर्वी नवी मुंबई ते पुणे इतक्या छोट्या अंतराचा प्रवास करण्यात आला होता.
नवी मुंबई विमानतळाविषयी
दरवर्षी २० दशलक्ष प्रवाशांना हाताळण्याची क्षमता
मार्च २००८ मध्ये विमानतळाच्या उभारणीस प्रारंभ
जुलै २०२५ पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांना सुरुवात
शेवटच्या क्षणी उड्डाणे घेण्यासाठी चर्चा सुरू
दरवर्षी २.५ दशलक्ष टन कार्गो वाहतूक होणार
मुंबई महानगर प्रदेशातील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ