नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ अंतर्गत प्रभाग क्रमांक १७ अ मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार निलेश भोजने यांना निवडणूक लढवण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यावरून अर्ज पडताळणीदरम्यान निलेश भोजने यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला होता. या निर्णयाविरोधात भोजने यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवरील पहिली सुनावणी ८ जानेवारी झाली होती. त्या वेळी प्रथमदर्शनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन निर्णय घेतल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले होते.
अर्ज पडताळणीदरम्यान शिवसेनेचे उमेदवार किशोर पाटकर यांनी भोजने यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता. महानगरपालिका कायदा अंतर्गत अनधिकृत बांधकामाचा मुद्दा उपस्थित करत भोजने यांचा अर्ज रद्द करण्यात आला होता. मात्र, संबंधित बांधकाम हे निलेश भोजने यांना त्यांच्या वडिलांकडून बक्षीसपत्राद्वारे मिळालेले असल्याचे त्यांनी न्यायालयात स्पष्ट केले. तसेच, महानगरपालिका कायद्यातील कलम १० (१)(ड) हे विद्यमान लोकप्रतिनिधींना लागू होते, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना लागू होत नाही, असा ठोस दावा भोजने यांनी केला. शुक्रवारी झालेल्या अंतिम सुनावणीदरम्यान निलेश भोजने यांना निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राजकीय वर्तुळाचे लक्ष
भोजने यांचा अर्ज रद्द झाल्यानंतर भाजपकडून अपक्ष उमेदवार दर्शन भोईर यांना भाजप-पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार भाजप नेत्यांच्या उपस्थितीत भोईर यांचा प्रचारही सुरू करण्यात आला होता. फलक लावणे, पत्रक वाटप अशा स्वरूपात प्रचार करण्यात आला. मात्र, आता निलेश भोजने पुन्हा अधिकृत भाजप उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्याने दर्शन भोईर यांची पुढील भूमिका काय असणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.