नवी मुंबई विमानतळाचे आज PM नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन; भारताच्या पहिल्या ‘पूर्ण डिजिटल’ विमानतळाची १० वैशिष्ट्ये महेश मोरे
नवी मुंबई

नवी मुंबई विमानतळाचे आज PM नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन; भारताच्या पहिल्या ‘पूर्ण डिजिटल’ एअरपोर्टची १० वैशिष्ट्ये

हे विमानतळ एक्सप्रेसवे, मेट्रो लाईन्स, उपनगरीय रेल्वे आणि वॉटर टॅक्सी सेवेसह अनेक वाहतूक प्रणालींनी 'कनेक्टेड' असेल. या नवीन विमानतळामुळे विद्यमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (CSMIA) मोठा ताण कमी होईल आणि ही भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी एका नव्या युगाची सुरुवात ठरणार आहे.

Krantee V. Kale

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि.८) अखेर बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणार आहेत. हा प्रकल्प देशातील सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड विमानतळ प्रकल्पांपैकी एक असून मुंबई महानगर प्रदेशाला (MMR) जागतिक बहुविमानतळ शहरात रूपांतरित करण्यासाठी सज्ज आहे. या नवीन विमानतळामुळे विद्यमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (CSMIA) गर्दीचा मोठा ताण कमी होईल आणि ही भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी एका नव्या युगाची सुरुवात ठरेल.

जाणून घेऊया या विमानतळाची खास वैशिष्ट्ये

१) भारताचे पहिले पूर्ण डिजिटल विमानतळ:
एनएमआयए हे भारताचे पहिले पूर्णपणे डिजिटल विमानतळ असून, ते ‘डिजीयात्रा’ सुविधेसह संपूर्णपणे सक्षम आहे. येथे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित स्वयंचलित टर्मिनल प्रणालींद्वारे प्रवाशांना अखंड, कागदविरहित अनुभव मिळेल.

२) प्रारंभिक आणि पूर्ण क्षमता:
पहिल्या टप्प्यात या विमानतळाची प्रवासी क्षमता प्रतिवर्षी २० दशलक्ष (दोन कोटी) प्रवाशांची आहे. सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर चार टर्मिनल्स आणि दोन धावपट्ट्यांसह हे विमानतळ दरवर्षी ९० दशलक्ष (नऊ कोटी) प्रवासी आणि ३.२५ दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक हाताळेल.

३) कमळापासून प्रेरित वास्तुकला:
प्रसिद्ध ‘झाहा हदीद आर्किटेक्ट्स’ यांनी डिझाइन केलेल्या या टर्मिनल इमारतीची रचना कमळाच्या फुलाच्या आकारावर आधारित आहे. तिचे स्तंभ उलगडणाऱ्या पाकळ्यांसारखे दिसतात, जे आधुनिकतेचे प्रतीक आहे.

४) मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी:
एनएमआयए हे भारतातील पहिले प्रमुख हवाई वाहतूक केंद्र असेल जे एक्सप्रेसवे, मेट्रो लाईन्स, उपनगरीय रेल्वे आणि विशेषतः वॉटर टॅक्सी सेवेसह अनेक वाहतूक प्रणालींनी जोडलेले असेल.

५) सस्टेनेबल ग्रीन विमानतळ:
शाश्वतता लक्षात घेऊन बांधण्यात आलेल्या या विमानतळात ४७ मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती क्षमता आहे. तसेच ‘सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल’ (SAF) साठवण सुविधा आणि ईव्ही बससेवांचा समावेश आहे.

६) प्रवाशांचा वेळ वाचवणार:
प्रवाशांच्या प्रतीक्षा वेळेत कपात करण्यासाठी टर्मिनलमध्ये ६६ चेक-इन काउंटर आणि २२ सेल्फ-बॅगेज ड्रॉप पॉइंट्स आहेत. भविष्यात चारही टर्मिनल्सना जोडणारी ‘ऑटोमेटेड पीपल मूव्हर’ (APM) सेवा देखील सुरू करण्यात येणार आहे.

७) आर्थिक विकासाचे इंजिन:
या प्रकल्पामुळे विमान वाहतूक, लॉजिस्टिक्स, आयटी आणि रिअल इस्टेट क्षेत्रात दोन लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती होणार असून, नवीन औद्योगिक कॉरिडॉरच्या विकासाला गती मिळेल.

८) प्रगत लँडिंग प्रणाली:
‘कॅटेगरी २ इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम’ (ILS) ने धावपट्टी सुसज्ज असून, ३०० मीटरपर्यंत कमी दृश्यमानतेतही सुरक्षित लँडिंग शक्य होईल. हे सर्व हवामानात कार्यरत राहणाऱ्या विमानतळासाठी मोठे पाऊल आहे.

९) कार्गो आणि एमआरओ हब:
प्रवासी वाहतुकीबरोबरच एनएमआयए भारतातील सर्वात मोठे ‘मेंटेनन्स, रिपेअर अँड ओव्हरहॉल’ (MRO) केंद्र ठरणार आहे. हे विमानतळ दरवर्षी ३.२५ दशलक्ष मेट्रिक टन माल हाताळेल.

१०) लवकरच व्यावसायिक उड्डाणे:
आज उद्घाटन होणार असले तरी व्यावसायिक उड्डाणे डिसेंबर २०२५ मध्ये सुरू होतील. उद्घाटनानंतर ४५ ते ६० दिवसांनी पहिले उड्डाण घेण्याची शक्यता आहे. ‘इंडिगो’, ‘एअर इंडिया’ आणि ‘अकासा एअर’ सारख्या प्रमुख देशांतर्गत विमान कंपन्यांनी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. विविध सुरक्षा, इमिग्रेशन आणि कस्टम एजन्सी एकत्रित केल्यानंतर डिसेंबरच्या सुमारास एनएमआयए एकाचवेळी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करेल, अशी अपेक्षा आहे. सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर, हे विमानतळ लंडन हीथ्रो विमानतळाच्या बरोबरीने सर्वात मोठ्या प्रवासी क्षमतेपैकी एक ठरेल.

विमानतळाबाबत अन्य महत्त्वाची माहिती

स्थळ - उलवे, नवी मुंबई

विमान स्टँड आणि कार्गो - प्रवासी विमान स्टँड (अंतिम टप्पा) : २४५, कार्गो विमान स्टँड : ०७,

सामान्य विमान स्टँड : ७९, सामान्य विमान हँगर्स : १६

कार्यान्वयन -

पहिले उड्डाण : उद्घाटनानंतर ४५ ते ६० दिवस

ऑपरेशन वेळ (सुरुवातीला) : सकाळी ८ ते रात्री ८

हवाई वाहतूक हालचाली (सुरुवातीला) : ८ ते १० प्रति तास

हवाई वाहतूक हालचाली (पहिला टप्पा): २०-२३ प्रति तास

एकूण प्रकल्प क्षेत्र : १,१६० हेक्टर/ अंदाजे २,८६६ एकर

टर्मिनल १ : क्षेत्रफळ: २.३४ लाख चौ.मी., क्षमता: २० दशलक्ष प्रवासी, सुविधा: देशांतर्गत प्रवास

सुविधा : प्रवेशद्वार : ४, चेक-इन काऊंटर : ६६, स्वयं-बॅगेज ड्रॉप : २२, एरोब्रिज : २९, बस बोर्डिंग गेट्स: १०

टर्मिनल्स : चार टर्मिनल्स (अंतिम टप्पा), प्रारंभिक टप्पा: देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्ससाठी एकल एकात्मिक टर्मिनल वैशिष्ट्यीकृत, टर्मिनल २ : दुसऱ्या टप्प्यात सुरुवात होणार

रनवे (नियोजित) : दोन 'कोड F' अनुरूप समांतर धावपट्ट्या

रनवे १ (टप्पा १): ३,७०० मीटर लांबी/६० मीटर रुंदी

रनवे २: ३,७०० मीटर लांबी/६० मीटर रुंदी

गुंतवणूक/ खर्च :

टप्पा १: १९,६४६ कोटी रुपये

टप्पा २: ३०,००० कोटी रुपये

अंतिम टप्पा: अंदाजे १ लाख कोटी रुपये

देखभाल दुरुस्ती

-५ MRO हँगर्स

-देशातील सर्वात मोठे प्रकल्पित प्रवासी क्षमता

-प्रारंभिक टप्पा: प्रतिवर्षी २० दशलक्ष प्रवासी (MPPA)

-अंतिम टप्पा: ९० MPPA

-५जी ‘कनेक्टेड एनएमआयए’

-फास्ट ट्रॅक इमिग्रेशन

पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन; देशातील पहिलं ‘पूर्ण डिजिटल’ एअरपोर्ट, बघा Video

Shiv Sena Symbol Dispute: सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर; आता १२ नोव्हेंबरला फैसला?

कन्फर्म तिकीट पण प्लॅन बदलला? टेन्शन नको! आता ‘डेट चेंज’ची मोफत सोय; रेल्वेचा नवा नियम

UPI वापरकर्त्यांना 'पिन'ऐवजी चेहरा, बोटाचा ठसा सक्तीचा; NPCI ची मंजुरी; आजपासून बायोमेट्रिक प्रणाली सुरू होणार

नवी मुंबई एअरपोर्टसाठी नवे इमिग्रेशन चेकपोस्ट; २८५ नवीन पोलीस पदांना मंजुरी, प्रतिनियुक्तीवर इच्छुक कर्मचाऱ्यांचे मागवले अर्ज