नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी होत असून, ही निवडणूक पालिकेच्या इतिहासात प्रथमच बहुसदस्यीय पद्धतीने पार पडणार आहे. त्यामुळे मतदारांना मतदान प्रक्रियेबाबत योग्य माहिती असणे अत्यंत आवश्यक असल्याने व्यापक जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे.
नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात एकूण २८ प्रभाग असून, त्यापैकी प्रभाग क्रमांक १ ते २७ मध्ये प्रत्येकी चार सदस्य (‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’) निवडले जाणार आहेत. तर प्रभाग क्रमांक २८ मध्ये तीन सदस्य (‘अ’, ‘ब’, ‘क’) निवडले जाणार आहेत. त्यामुळे प्रभाग १ ते २७ मधील प्रत्येक मतदाराने चार वेळा मतदान करणे आवश्यक असून, प्रभाग २८ मधील मतदारांना तीन वेळा मतदान करावे लागणार आहे. प्रत्येक जागेसाठी स्वतंत्रपणे एक मत द्यायचे आहे. महत्त्वाचे म्हणजे एका जागेसाठी एकापेक्षा जास्त मते देता येणार नाहीत. प्रत्येक जागेतील उमेदवारासमोरील बटण दाबल्यानंतर संबंधित लाल दिवा पेटेल. चारही (किंवा तीन) जागांसाठी मतदान पूर्ण झाल्यानंतर ‘बीप’ असा आवाज येईल, म्हणजे मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याचे समजावे.
‘एक जागा, एक मत’ बंधनकारक
‘अ’ जागेसाठी १ मत
‘ब’ जागेसाठी १ मत
‘क’ जागेसाठी १ मत
आणि ‘ड’ जागेसाठी १ मत
वेगवेगळ्या रंगांच्या मतपत्रिका
‘अ’ जागेसाठी - पांढरा रंग
‘ब’ जागेसाठी - फिकट गुलाबी
‘क’ जागेसाठी - फिकट पिवळा
‘ड’ जागेसाठी - फिकट निळा
‘नोटा’चा पर्यायही उपलब्ध
जर एखाद्या जागेसाठी कोणताही उमेदवार पसंत नसेल, तर त्या जागेच्या शेवटी ‘नोटा’ (None of the Above) हा पर्याय उपलब्ध असणार आहे. तसेच प्रभाग १ ते २७ मधील मतदारांनी एकूण ४ मते, तर प्रभाग २८ मधील मतदारांनी एकूण ३ मते देऊन लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क बजावावा.