नवी मुंबई : कामात कुचराई आणि दिरंगाई केल्याच्या आरोपांमुळे नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्राह्मनंद नाईकवाडी यांना निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, केवळ चार दिवसांपूर्वीच त्यांची बदली पोलीस नियंत्रण कक्षात करण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, २३ जानेवारी रोजी त्यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली होती. मात्र, त्याच वेळी त्यांच्या कामकाजाबाबत उपायुक्त कार्यालयाकडून गोपनीय चौकशी सुरू होती. चौकशीत काही गंभीर बाबी समोर आल्याने अखेर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे समजते.
नेरूळ परिसरातील एका भूखंड व्यवहारातील फसवणुकीची तक्रार गांभीर्याने न घेता प्रकरण प्रलंबित ठेवणे, तसेच संबंधित संशयितांविरोधात गुन्हा नोंद करण्याऐवजी अर्ज निकाली काढणे, या बाबी त्यांच्या अंगाशी आल्याची चर्चा आहे. याशिवाय, एका गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपीच्या जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी स्वतः न्यायालयात हजर न राहता कनिष्ठ अधिकाऱ्याला पाठवण्यात आल्याची बाबही त्यांच्या विरोधात नोंदवण्यात आली आहे.
दरम्यान, १६ जानेवारी रोजी निवडणुकीच्या निकालानंतर नेरुळ येथे एका पराभूत उमेदवाराच्या कार्यालयात घुसून मारहाण व तोडफोड केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातही वरिष्ठ पातळीवर अपेक्षित ती कडक कारवाई झाली नसल्याची नोंद चौकशीत झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या सर्व बाबींचा एकत्रित आढावा घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केल्याचे समजते.