नवी मुंबई : व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी १०० ते २०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून एका नामांकित फार्मा कंपनीची ४० लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रसिद्ध कंपनीचे फायनान्शिअल कन्सल्टंट असल्याचे भासवून आरोपींनी सल्लागार शुल्क आणि प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये बदल करण्याच्या नावाखाली कंपनीकडून टप्प्याटप्प्याने पैसे उकळल्याचे उघडकीस आले आहे. वाशी पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी पूजा उमक आणि चिराग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
तक्रारदार अश्वनी कुमार सिंग हे ‘एम्बेलिश फार्माटेक प्रा. लि.’ या फार्मा केमिकल कंपनीचे व्हाइस चेअरमन आहेत. १४ मे २०२६ रोजी ते कामानिमित्त वाशीत आले होते. तेव्हा पूजा उमक हिने त्यांच्याशी संपर्क साधला होता. आपण फ्लुइडमास्टर इंडिया प्रा. लि. या कंपनीची फायनान्शिअल कन्सल्टंट असल्याचे सांगत तिने त्यांच्या कंपनीत १०० ते २०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली.
पूजा व चिराग यांनी मोठ्या गुंतवणुकीचे आश्वासन देत अश्विनी कुमार यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून बँक खात्यांमध्ये एकूण ४० लाख रुपये हस्तांतरित करून घेतले. मात्र, पैसे दिल्यानंतरही गुंतवणुकीबाबत ठोस कार्यवाही झाली नाही. तसेच कंपनीच्या चेअरमनशी भेट घडवून आणण्याबाबत दोघांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अश्विनी कुमार यांनी प्रथम सायबर हेल्पलाइन पोर्टलवर त्यानंतर वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.