नवी मुंबई : खाकी वर्दी मिळवण्यासाठी जिवाचे रान करणाऱ्या हजारो तरुणांच्या गर्दीत, शॉर्टकट शोधणाऱ्या चार उमेदवारांना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. ५२७ पदांसाठी सुरू असलेल्या नवी मुंबई पोलीस भरती प्रक्रियेत, शारीरिक चाचणी दरम्यान ‘स्टिरॉइड’ (उत्तेजक द्रव्य) घेतल्याच्या संशयावरून चार तरुणांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या चार तरुणांकडे रिकामी इंजेक्शन्स आणि सिरिंजमुळे भरती प्रक्रियेत मोठी खळबळ उडाली आहे.
कळंबोलीच्या पोलीस मुख्यालय मैदानावर सध्या ५०,४६० उमेदवारांची मैदानी चाचणी सुरू आहे. ९ मार्च रोजी मल्टिपर्पज हॉल परिसरात उमेदवारांची उंची आणि छाती मोजण्याची प्रक्रिया सुरू असताना, चार तरुण संशयास्पद हालचाली करताना आढळले. पोलिसांनी तत्काळ त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे ‘बीडी यू ४० इन्सूलिन’ ची लाल रंगाची टोपण असलेली रिकामी इंजेक्शन्स आणि सिरिंज सापडली.
झडती दरम्यान प्रत्यक्ष सदर तरुणाकडे कुठल्याही प्रकारचे उत्तेजक द्रव्य सापडले नसले, तरी त्यांच्याकडे सापडलेल्या रिकामी इंजेक्शन्सवरून सदर तरुणांनी उत्तेजक द्रव्ये टोचून घेतल्याचा दाट संशय निर्माण करत आहेत. या तरुणांनी खरोखरच कामगिरी सुधारण्यासाठी उत्तेजक द्रव्याचा वापर केला आहे का? हे तपासण्यासाठी पोलिसांनी त्यांचे रक्ताचे नमुने घेतले आहेत. या चाचणीचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणातील सत्य समोर येणार आहे.
पोलीस भरतीदरम्यान इंजेक्शन्स आणि सिरिंजसह सापडलेल्या आकाश नामदेव पानसरे (२१), सुयोग विलास ढोले (२१), सुनिल बबन कडुस्कर (२४) आणि संकेत रामदास डोंगरे (३०) या चौघांविरुद्ध कळंबोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ आणि औषधी द्रव्ये व सौंदर्य प्रसाधने अधिनियम १९४० च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या तरुणांना ही इंजेक्शन्स कोणी पुरवली, याचाही शोध घेतला जात आहे.
पोलीस भरती ही पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित आहे. अशा प्रकारे अमली पदार्थांचा किंवा अनुचित मार्गाचा वापर करणाऱ्या उमेदवारांना आम्ही कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. त्यांना भरती प्रक्रियेतून कायमचे बाद केले जाईल.संजयकुमार पाटील (पोलीस उपआयुक्त-मुख्यालय)