नवी मुंबई

Navi Mumbai : गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली; बेलापूरमध्ये उभे राहणार अत्याधुनिक CCTV कमांड सेंटर

शहरातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी नवी मुंबई पोलीस दलाने तंत्रज्ञानाधिष्ठित पाऊल उचलत बेलापूर येथे अत्याधुनिक सीसीटीव्ही कमांड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil S

नवी मुंबई : शहरातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी नवी मुंबई पोलीस दलाने तंत्रज्ञानाधिष्ठित पाऊल उचलत बेलापूर येथे अत्याधुनिक सीसीटीव्ही कमांड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रातून नवी मुंबई महापालिका, पनवेल, उरण, खारघर, तळोजा, कळंबोली, अटल सेतू तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर थेट देखरेख ठेवली जाणार आहे. दरम्यान, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा गुन्हे उकल दरात वाढ झाल्याने नवी मुंबई पोलिसांचा तपास अधिक वेगवान आणि परिणामकारक ठरत असल्याचे चित्र आहे.

या वेळी सहपोलीस आयुक्त संजय येनपुरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त सचिन सूर्यवंशी, अमित काळे, अनिलकुमार पाटील, रश्मी नांदेडकर आदी अधिकारी उपस्थित होते. नवी मुंबईचे झपाट्याने वाढते नागरीकरण आणि नैना (NAINA) प्रकल्प क्षेत्राचा विस्तार लक्षात घेऊन बेलापूर येथे उभारण्यात येणाऱ्या कमांड सेंटरमध्ये हजारो कॅमेऱ्यांचे एकत्रित नियंत्रण केले जाणार आहे.

नवी मुंबई शहरात २०२४ मध्ये ७,७३९ गुन्हे नोंदवले गेले होते. त्यापैकी ७,८३५ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. २०२५ मध्ये गुन्ह्यांचा आकडा वाढला असला तरी एकूण ७,८३५ गुन्ह्यांपैकी ६,२७६ गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले आहे. गुन्हे उकल दर २०२४ मधील ७७ टक्क्यांवरून २०२५ मध्ये ८० टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

ड्रग्ज तस्करीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी मागील दोन वर्षांत मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या. विशेषतः आफ्रिकन ड्रग्ज तस्करांना लक्ष्य करत हायड्रो गांजाच्या तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले असून अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. 'नशामुक्त नवी मुंबई' अभियानांतर्गत ही मोहीम पुढेही सुरू राहणार आहे.
मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त

कॅमेऱ्यांचे मॉनिटरिंग

या केंद्रातून पुढील कॅमेऱ्यांचे मॉनिटरिंग होणार आहे. त्याप्रमाणे नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १,२०० कॅमेरे, पनवेल महापालिका क्षेत्रात १,५०३ कॅमेरे, सिडको क्षेत्रात ५२१ कॅमेरे, अटल सेतूसाठी १९६ कॅमेरे, पोलीस वाहनांतील कॅमेरे २२० आणि वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांकडे असणाऱ्या बॉडी कॅमेऱ्यामध्ये १० चा समावेश असून हे सर्व कॅमेरे कमांड सेंटरशी जोडले जाणार असून एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने संशयास्पद हालचालींचे विश्लेषण केले जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. वाहतूक शाखेतील पोलिसांना आतापर्यंत १० बॉडी वॉर्न कॅमेरे देण्यात आले असून ही संख्या वाढवली जाणार आहे. यामुळे कारवाई अधिक पारदर्शक आणि नोंदीसह होणार आहेत. शहरातील विविध भागांत बीट मार्शलद्वारे सुरू असलेले पेट्रोलिंग आता डिजिटल पद्धतीने मॉनिटर केले जाणार आहे. संबंधित अधिकारी किती वेळा व किती वेळ ठराविक ठिकाणी गेले, याची नोंद प्रणालीत उपलब्ध राहणार आहे.

वाहतूक कारवाईत वाढ

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधातील कारवाईतही वाढ झाली आहे. यामध्ये २०२४ साली ८,८७,७७० प्रकरणे नोंदविण्यात आली होती, तर २०२५ मध्ये ९,८०,८०६ प्रकरणे नोंदवली गेली आहे. यावर्षी २,०३,४३७ हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्तालयासाठी नवीन भव्य इमारत

नवी मुंबईतील वाढते नागरीकरण आणि वाढती पोलीस ठाण्यांची संख्या लक्षात घेता सध्याची आयुक्तालयाची इमारत अपुरी पडत आहे. त्यामुळे नवीन भव्य पोलीस आयुक्तालय इमारतीचे नियोजन सुरू असल्याची माहितीही आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली.

Ind vs NZ, ICC T20 WC26 Final : आज विश्वविजयाची हॅटट्रिक? अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम यावेळी तरी लकी ठरणार का?

आजचे राशिभविष्य, ८ मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Women's Day 2026 : "चालीनं तितक्या वाटा गं"; तुमच्या आयुष्यातील खास महिलांना द्या शुभेच्छा, शेअर करा Quotes आणि Messages

Women's Day Special : स्मृती मंधानाचा जागतिक सन्मान; बार्बी वर्ल्डमध्ये स्थान मिळवणारी पहिली क्रिकेटपटू

Women's Day 2026 : राज्यात HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात; एचपीव्ही म्हणजे काय? जाणून घ्या महत्त्व