नवी मुंबई : ठाणे बेलापूर मार्ग ओलांडून जात असलेल्या एका महिलेला भरधाव कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सदर छाया गायकवाड या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी तुर्भे स्टोअर येथे घडली. या घटनेनंतर संतफ्त नागरिकांनी रस्ता रोको करुन आपला निषेध व्यक्त केला. पाच वर्षांपासून रखडलेल्या उड्डाणपुलाचे काम आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्गाच्या अभावामुळे आणखी एका नागरिकाला जीव गमवावा लागल्याचा आरोप करत नागरिकांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. उड्डाणपुलाचे काम तातडीने पूर्ण करावे आणि पादचाऱ्यांसाठी तात्पुरता पादचारी पूल उभारावा, अशी मागणी करण्यात आली.
या घटनेतील मृत छाया गायकवाड या तुर्भे स्टोअर्स येथे राहण्यास होत्या. सोमवारी सायंकाळी छाया गायकवाड या तुर्भे रेल्वे स्टेशन समोरुन ठाणे-बेलापूर मार्ग ओलांडून तुर्भे स्टोअर्स येथील घरी जात होत्या. याचवेळी ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या कचरा गाडीने छाया गायकवाड यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
रस्त्याखालील एमआयडीसीची मलवाहिनी, आराखड्यातील अडचणी आणि प्रशासकीय विलंबामुळे प्रकल्प रखडला. मध्यंतरी काम बंद पडले होते. त्यानंतर आयआयटी मुंबईकडून नव्या आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर काम पुन्हा सुरु झाले. मात्र, प्रत्यक्ष कामाचा वेग संथ असल्याने उड्डाणपूल अद्याप पूर्ण झालेला नाही.
तुर्भे स्टोअर येथे गेल्या दहा वर्षांत झालेल्या अपघातांत २३जणांचा मृत्यू झाला असून ५०हून अधिक जण जखमी झाले आहेत. ठाणे-बेलापूर मार्गावरील तुर्भे स्टोअर चौक हा अत्यंत वर्दळीचा परिसर आहे.
४१ कोटी प्रकल्पाला मंजुरी मिळाली
तुर्भे स्टोअर चौकातील वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका कमी करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने २०१९ मध्ये सुमारे ४१ कोटी रुपये खर्चाचा ५६० मीटर लांबीचा चारपदरी उड्डाणपूल मंजूर केला होता. या कामाचे कंत्राट महावीर रोड्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीला देण्यात आले होते.