Navi Mumbai : वाशी एपीएमसीत कांद्याने गाठली 'पन्नाशी'; घाऊक भाव ५० रुपयांच्या पार; किरकोळ बाजारात कांदा ७० रुपयांवर संग्रहित छायाचित्र
नवी मुंबई

Navi Mumbai : वाशी एपीएमसीत कांद्याने गाठली 'पन्नाशी'; घाऊक भाव ५० रुपयांच्या पार; किरकोळ बाजारात कांदा ७० रुपयांवर

वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) कांदा-बटाटा बाजारात कांद्याच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. पावसामुळे कांद्याची आवक घटली असून, साठवणुकीतील मोठ्या प्रमाणातील कांदा खराब झाल्याने चांगल्या प्रतीच्या कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.

Swapnil S

नवी मुंबई : वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) कांदा-बटाटा बाजारात कांद्याच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. पावसामुळे कांद्याची आवक घटली असून, साठवणुकीतील मोठ्या प्रमाणातील कांदा खराब झाल्याने चांगल्या प्रतीच्या कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, चांगल्या दर्जाच्या कांद्याचे घाऊक दर ५२ ते ५३ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. घाऊक बाजारातील दरवाढीचा थेट परिणाम किरकोळ बाजारावर झाला असून, ग्राहकांना आता कांद्यासाठी ६५ ते ७० रुपये प्रतिकिलो मोजावे लागत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले आहे.

कांदा हा प्रत्येक गृहिणीच्या स्वयंपाकघरातील रोजच्या वापरातील महत्त्वाचा घटक आहे. मात्र किरकोळ बाजारात कांद्याचा दर ६० ते ७० रुपये किलोवर पोहोचल्याने घरखर्चाचे गणित बिघडले आहे. कांद्याच्या दरातील ही तेजी आणखी किती काळ कायम राहणार, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले असून, शासनाकडून बाजारातील आवक आणि दर नियंत्रणासाठी कोणती पावले उचलली जातात, याकडेही व्यापारी आणि ग्राहकांचे लक्ष आहे.

पावसामुळे साठवणुकीतील कांदा मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे. बाजारात चांगल्या दर्जाच्या कांद्याची आवक घटली असून, नाशिकहून होणारा पुरवठाही मंदावला आहे. त्यामुळे घाऊक बाजारात कांद्याच्या दराने ५० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. नवीन कांद्याची आवक बाजारात पूर्णपणे सुरू होईपर्यंत पुढील काही महिने दरातील तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.
विनोद निकम, कांदा-बटाटा व्यापारी प्रतिनिधी, वाशी एपीएमसी
भाजीपाल्याचे दर आधीच वाढलेले असताना आता कांद्याच्या दरानेही डोळ्यात पाणी आणले आहे. कांदा हा रोजच्या स्वयंपाकातील अत्यावश्यक घटक असल्याने त्याच्या वाढलेल्या दराचा थेट परिणाम घरगुती बजेटवर होत आहे. गणेशोत्सव सुरू होणार असल्याने खर्चात आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कांद्याचे दर नियंत्रणात आणावेत.
सुजाता भोईर, गृहिणी, सानपाडा

आवक घटली; साठवणुकीतील कांदा खराब

कांदा काढणीच्या काळात झालेल्या पावसाचा मोठा फटका कांदा उत्पादकांना तसेच व्यापाऱ्यांना बसला आहे. पावसामुळे साठवणुकीतील कांदा मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे. बाजारात येणाऱ्या कांद्यापैकी लक्षणीय प्रमाणात कांदा ओला किंवा खराब निघत असल्याने चांगल्या प्रतीच्या कांद्याची उपलब्धता कमी झाली आहे. दरम्यान, नाशिक आणि लासलगाव परिसरातून वाशी एपीएमसीमध्ये होणारी कांद्याची आवकही मंदावली आहे. त्यामुळे बाजारातील पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. विशेषतः नंबर-१ दर्जाच्या कांद्याला मोठी मागणी असून, त्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने त्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.

पुढील दोन-तीन महिने दर चढेच राहण्याची शक्यता

नवीन कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर बाजारात सुरू होण्यासाठी अद्याप काही काळ लागणार आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन महिने कांद्याचे दर चढेच राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. वाशी एपीएमसीच्या घाऊक बाजारात कांद्याने ५० रुपयांचा टप्पा ओलांडल्याने त्याचा परिणाम किरकोळ बाजारात अधिक तीव्रतेने जाणवत आहे. आधीच महागाईमुळे त्रस्त असलेल्या ग्राहकांना आता कांद्यासाठी ६० ते ७० रुपये मोजावे लागत असल्याने घरगुती अर्थसंकल्पावर अतिरिक्त भार पडला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदी वाढण्याची शक्यता असताना कांद्याच्या वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्य ग्राहकांची चिंता आणखी वाढली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना दिलासा! ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान वाहनांना टोलमाफी

...त्यापेक्षा मृत्यू पत्करेन; न्यायाधीशांचे वक्तव्य

पालघर पो. अधीक्षकांना न्यायालयाने केले पाचारण

मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेस उद्यापासून रोज धावणार

नगरसेवकांना एक कोटीचा निधी; BMC सभागृहाची मंजुरी; विकासकामे मार्गी लावण्यासाठी केली वाढ; आयुक्तांच्या अभिप्रायाची प्रतीक्षा