नवी मुंबई : नेरूळ सेक्टर-१ आणि ३ मधील चौकात उभारलेली शिवसृष्टी अनेक महिन्यांपासून तयार असूनही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा धुळीने माखलेल्या कपड्यात झाकलेला होता. ही एकप्रकारे शिवप्रतिमेची विटंबना असल्याचा आरोप करत मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवप्रेमींनी रविवारी शिवसृष्टी सर्वसामान्यांसाठी खुली केली.
यावेळी पोलिसांनी शिवप्रेमींना थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांचा विरोध झुगारत अमित ठाकरे यांनी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पुतळ्याचे अनावरण केले. अनधिकृतरीत्या सिंहासनारूढ पुतळ्याचे अनावरण केल्याप्रकरणी अमित ठाकरे यांच्यासह तब्बल ४० मनसैनिकांवर नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये जमावबंदीचे उल्लंघन, बेकायदेशीर मोर्चा काढणे, सरकारी कामात अडथळा आणणे आणि महापालिकेच्या जाळ्यांचे नुकसान करणे असे आरोप आहेत.
नेरूळमधील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळील शिवस्मारकाचा पुतळा अनेक महिन्यांपासून अनावरणासाठी प्रतीक्षेत होता. नवी मुंबईत पक्षाच्या कार्यक्रमासाठी आलेले अमित ठाकरे यांनी कोणतीही परवानगी न घेता पुतळ्याचे लोकार्पण केले.
या दरम्यान शेकडो कार्यकर्त्यांचा जमाव जमवण्यात आला. पोलिसांनी जमावाला थांबवण्याचा प्रयत्न केला असता धक्काबुक्की झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
नेरूळ पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब व पंचनामा यांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. परिसरात तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.
महापालिकेचे स्पष्टीकरण
नवी मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारुढ पुतळ्याचे अनावरण महापालिकेच्या वतीने करण्यात आलेले नाही. पुतळ्यासभोवतालची स्थापत्यकामे अद्याप पूर्ण नसून ती अंतिम टप्प्यात आहेत. रितसर परवानगी व अधिकृत घोषणा करूनच पुतळ्याचे समारंभपूर्वक अनावरण करण्यात येणार असल्याचे महापालिकेने प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळवले. परवानगी न घेता आणि कोणतीही पूर्वसूचना न देता पुतळ्याचे अनावरण करणे ही कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने चुकीची आणि अनधिकृत कृती असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना शिवरायांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही. माझ्यावर अशा कार्यासाठी पहिलाच गुन्हा नोंदवला जात असेल, तर त्याचा मला आनंद आहे. शिवरायांसाठी मी शेकडो गुन्हे घ्यायला तयार आहे.अमित ठाकरे
३० ते ४० कार्यकर्त्यांवर गुन्हा
या प्रकरणी एपीआय रविंद्र शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून अमित ठाकरे, शहराध्यक्ष गजानन काळे, उपशहरप्रमुख सविनय म्हात्रे, अभिजीत सावंत, सचिन कदम, अक्षय भोसले, निखिल गावडे, उमेश गायकवाड, सागर विचारे, श्रीकांत माने, विलास घोणे, योगेश शेटे, मयूर कारंडे, मंगेश जाधव, आरती नायडू, विलास गाडगे, सुरेश शेटे, अमोल आयवळे, संप्रित तुर्मेकर, निखिल खानविलकर, अक्षय कदम, अभिलेश दंडवते, श्याम डमाळे, प्रतीक खेडकर, शशी गजंगे, संतोष गायकवाड, संदेश खांबे, प्रवीण शिंदे, अनिवंत भोपी यांच्यासह इतर ३० ते ४० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला गेला आहे.