पनवेल शहर पोलीस ठाणे  
नवी मुंबई

पनवेलमध्ये पाच अनधिकृत शाळांवर कारवाई; मान्यता प्रमाणपत्र नसल्यामुळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मान्यता प्रमाणपत्राशिवाय शाळा चालवून विद्यार्थ्यांकडून फी वसूल करत शासन, पालक व विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या पनवेल तालुक्यातील पाच शाळांच्या संस्थाचालक, अध्यक्ष व संचालकांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Swapnil S

नवी मुंबई : मान्यता प्रमाणपत्राशिवाय शाळा चालवून विद्यार्थ्यांकडून फी वसूल करत शासन, पालक व विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या पनवेल तालुक्यातील पाच शाळांच्या संस्थाचालक, अध्यक्ष व संचालकांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाची कोणतीही मान्यता नसताना अनधिकृतपणे शाळा चालवून शिक्षण हक्क कायदा (आरटीई) चे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, त्यामुळे अनधिकृत शाळा चालकांचे धाबे दणाणले आहेत.

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियमानुसार कोणतीही शाळा शासन किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या मान्यता प्रमाणपत्राशिवाय चालवता येत नाही. रायगड जिल्हा परिषदेच्या आदेशानुसार गतवर्षी पनवेल शहर परिसरातील शाळांची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत पाच शाळांकडे कोणतेही मान्यता प्रमाणपत्र अथवा स्वतंत्र यू-डायस (UDISE) क्रमांक नसल्याचे निष्पन्न झाले. या शाळांनी पालकांना अंधारात ठेवून विद्यार्थी व शासनाची फसवणूक केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. त्यानंतर तत्कालीन गट शिक्षणाधिकारी एस. आर. मोहिते यांनी ११ सप्टेंबर रोजी संबंधित शाळांना नोटीस बजावून तत्काळ शाळा बंद करण्याचे व विद्यार्थ्यांना जवळच्या मान्यताप्राप्त शाळांमध्ये दाखल करण्याचे निर्देश दिले होते. तसेच दंड भरून हमीपत्र सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, जून २०२३ पासूनच हे संस्थाचालक नियमबाह्य पद्धतीने शाळा चालवत असल्याचे केंद्रप्रमुखांच्या अहवालातून स्पष्ट झाले. प्रत्यक्ष पाहणीत या शाळा अद्याप सुरू असल्याचे आढळल्याने अखेर फौजदारी कारवाईचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गट शिक्षणाधिकारी शाहू सतपाल यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संबंधित पाचही शाळांच्या संस्थापक, अध्यक्ष व संचालकांविरुद्ध बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियमान्वये गुन्हा दाखल केल आहे.

दरम्यान, पालकांनी मान्यता नसलेल्या शाळांमध्ये आपल्या पाल्यांचे प्रवेश घेऊ नयेत, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही संस्थेची गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

गुन्हा दाखल झालेल्या शाळांची नावे

१. एस. जी. टी. इंटरनॅशनल स्कूल, करंजाडे (सेक्टर-१)

२. वेदिक टी इंटरनॅशनल स्कूल, करंजाडे (सेक्टर-३)

३. वेदगृह पब्लिक स्कूल, करंजाडे (सेक्टर-३.

४. दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल (प्राथमिक), दापोली पारगाव

५. दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल (माध्यमिक), करंजाडे (सेक्टर आर-१)

Thane : पाणीटंचाई टाळण्यासाठी नैसर्गिक जलस्रोतांचा आधार; उन्हाळ्यात कुपनलिका व विहिरींच्या पाण्याच्या वापराचा निर्णय

लाडकी बहीण योजना : e-KYC मुदत वाढली, पण सर्वांसाठी नाही; फक्त 'या' महिलांनाच मिळणार संधी, संकेतस्थळावर दिला स्पष्ट संदेश

Mumbai : थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीची नोटीस...अन्यथा कायदेशीर कारवाई; डॉ. अश्विनी जोशी यांचा इशारा

ज्येष्ठांच्या पालनपोषणाचा कायदा म्हणजे मालमत्तेतून बेदखल करण्याचा पर्याय नाही; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

जयपूरमधील लग्नसोहळ्यात पर्सची चोरी; ४ लाखांची रोकड आणि दागिने लंपास, आरोपीचा शोध सुरू; CCTV फुटेज व्हायरल