मुंबई : निर्यातदार कंपनीच्या गोदामातून अन्नधान्य आणि तेलबिया जप्त करण्याची नवी मुंबई पोलिसांची कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आणि मनमानी असल्याचे ताशेरे ओढत उच्च न्यायालयाने नवी मुंबई पोलिसांना मोठा झटका दिला.
न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील एफआयआर आणि जप्तीची कारवाई रद्द करण्याचे आदेश दिले. कल्पवृक्ष इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी अन्नधान्य आणि विविध बियाण्यांच्या निर्यातीचा व्यवसाय करते. ८ मार्च २०१३ रोजी तुर्भे पोलिसांनी आणि शिधावाटप अधिकाऱ्यांनी कंपनीच्या गोदामावर धाड टाकून कारळे, काळे तीळ आणि तांदूळ जप्त केले होते. आवश्यक परवाना नसल्याचा दावा करत पोलिसांनी ९ मार्च २०१३ रोजी जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला होता.
या कारवाईविरोधात कंपनीने ॲड. दिलीप साटले आणि ॲड. हर्षद भडभडे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात दाद मागितली होती. कंपनीच्या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली.