नवी मुंबई : हत्येच्या गुन्ह्यात न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर मागील ३ वर्षे न्यायालयात सुनावणीसाठी हजर न राहणाऱ्या दोन आरोपींचा नेरूळ पोलिसांनी शोध घेऊन त्यांना पुन्हा अटक केली आहे. हमीद मोहम्मद शेख (२५) आणि रोहित सुभाष सिंग (२५) अशी या दोघांची नावे असून पोलिसांनी या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून त्यांची रवानगी तळोजा जेलमध्ये केली आहे.
या प्रकरणातील आरोपी हमीद मोहम्मद शेख व रोहित सुभाष सिंग या सराईत गुन्हेगारांनी २०१९ मध्ये बेकायदेशीर जमाव जमवून पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आपल्या एका मित्राची हत्या केली होती. तर दुसऱ्याला जबर दुखापत करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी नेरूळ पोलिसांनी हत्या व हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून हमीद शेख व रोहित सिंग या दोघांना अटक केली होती. त्यावेळी हे आरोपी न्यायालयाकडून जामीन मिळवून बाहेर आले होते. मात्र त्यानंतर ते खटल्याच्या सुनावणीसाठी बेलापूर येथील सत्र न्यायालयात हजर राहत नव्हते. त्यामुळे न्यायालयाकडून आरोपींना वारंवार बोलावण्यात आल्यानंतर देखील हे आरोपी गत ३ वर्षांपासून न्यायालयात हजर राहत नव्हते.
त्यामुळे बेलापूर सत्र न्यायालयाने या दोघांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. त्या अनुषंगाने नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय कांगणे, भानुदास ठाकूर व रशिद पटवेकर यांच्या पथकाने हमीद शेख याला करावेगाव येथून तर रोहित सिंग याला नेरूळ दरावे भागातून ताब्यात घेतले. त्यानंतर सोमवारी या दोघांना बेलापूर येथील सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोन्ही आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून त्यांची तळोजा कारागृहात रवानगी केली आहे.