Navi Mumbai : उद्घाटनापूर्वीच उरण बायपासवर वाहतूक सुरू; नगरपरिषद हद्दीतील भूसंपादनामुळे उर्वरित काम रखडले 
नवी मुंबई

Navi Mumbai : उद्घाटनापूर्वीच उरण बायपासवर वाहतूक सुरू; नगरपरिषद हद्दीतील भूसंपादनामुळे उर्वरित काम रखडले

उरण शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या उरण बायपासच्या सिडको हद्दीतील रस्ता आणि पुलाचे काम पूर्ण झाल्याने या मार्गावरून दुचाकी आणि लहान चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे.

राजकुमार भगत

उरण : उरण शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या उरण बायपासच्या सिडको हद्दीतील रस्ता आणि पुलाचे काम पूर्ण झाल्याने या मार्गावरून दुचाकी आणि लहान चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. अधिकृत उद्घाटनाची प्रतीक्षा न करता वाहनचालकांनी धुळीवाडा ते बोकडविरा दरम्यानच्या मार्गाचा वापर सुरू केला आहे. मात्र, उरण नगरपरिषद हद्दीतील भूसंपादनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नसल्याने बायपासचे संपूर्ण काम पूर्ण होण्यास विलंब होत आहे. तरीही सिडको हद्दीतील मार्ग सुरू झाल्याने नागरिकांना वाहतूककोंडीतून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

उरण शहरातील वाढते नागरीकरण आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून उरण नगरपरिषदेने २००२ मध्ये कोटनाका ते बोरी-पाखाडी दरम्यान १,१५० मीटर लांबीचा आणि १२ मीटर रुंदीचा बाह्यवळण मार्ग प्रस्तावित केला होता. या प्रकल्पाचे भूमिपूजन २००१ मध्ये तत्कालीन मंत्री नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्या हस्ते झाल्याचे सांगितले जाते. वन, महसूल आणि सिडकोसह संबंधित विभागांच्या परवानग्यांनंतर कामाला सुरुवात झाली. या प्रकल्पांतर्गत ४०० मीटर लांबीचा उड्डाणपूलही उभारण्यात आला.

या आराखड्यानुसार ११ मीटर रुंदीच्या रस्त्यासह ४०० मीटर लांबीचा उड्डाणपूल आणि दोन्ही बाजूंना प्रत्येकी ३०० मीटरचे जोडरस्ते प्रस्तावित आहेत. बोकडविरा बाजूचा जोडरस्ता आणि सिडको हद्दीतील पुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या भागातून लहान वाहनांची ये-जा सुरू झाली आहे.

भूसंपादनासाठी १२ कोटींची गरज

नगरपरिषद हद्दीतील खासगी मालकीच्या सुमारे ४,२०० चौरस मीटर जागेच्या भूसंपादनाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. या जागेच्या १५ भोगवटादारांना सुमारे १२ कोटी रुपयांचा मोबदला देणे आवश्यक आहे. मात्र, नगरपरिषदेची आर्थिक स्थिती लक्षात घेता भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे बायपासच्या उर्वरित कामाला अडथळा निर्माण झाला आहे.

लवकरच अधिकृत उद्घाटन

सिडको हद्दीतील पुलावर दिशादर्शक फलक लावणे आणि रंगरंगोटीची काही कामे सुरू आहेत. या मार्गाचे अधिकृत उद्घाटन करण्याची तयारीही सिडको प्रशासनाकडून केली जात आहे. सिडकोचे कार्यकारी अभियंता आशिष भारनुके यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलाचे आणि जोडरस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून, उर्वरित कामे लवकरच पूर्ण केली जातील. त्यानंतर हा पूल अधिकृतपणे लहान वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.

सिडकोकडून ४२ कोटींचा निधी

आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्यानंतर या प्रकल्पासाठी वाढीव निधी मंजूर करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते गोपाळ पाटील यांनीही सिडकोकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर सिडकोमार्फत एक किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या कामाचे कंत्राट ‘जे. एम. म्हात्रे इन्फ्रा’ कंपनीला देण्यात आले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

CJP ची दिल्लीत उद्या तिरंगा रॅली; सरकार देशात अघोषित आणीबाणी लादतंय - अभिजित दीपकेंचा आरोप

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा शुल्क घेतल्यास महाविद्यालयांवर होणार कारवाई, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश

विहिरी, बोअरवेलने गाठला तळ; ग्रामीण जनजीवन विस्कळीत होण्याची भीती

... तर द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होतील; भारत-चीन सीमावादावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा स्पष्ट इशारा

दिवाळीभेट! शेतकऱ्यांना पाच हजाराची मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर