नवी मुंबई

पोलीस भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू, दुसऱ्या तरुणाची प्रकृती चिंताजनक; नवी मुंबई कॅम्पमधील घटना

Swapnil S

नवी मुंबई : बाळेगाव शिळफाटा येथील राज्य राखीव पोलीस बल (एसआरपीएफ) गट क्र-११, नवी मुंबई कॅम्पकरिता सुरू असलेल्या पोलीस भरतीदरम्यान शनिवारी झालेल्या मैदानी चाचणीदरम्यान अत्यवस्थ झालेल्या ७ उमेदवारांपैकी एका तरुणाचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे, तर आणखी एका तरुणाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यासह अन्य ६ अत्यवस्थ उमेदवारांवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

पोलीस भरतीदरम्यान मृत झालेल्या तरुणाचे नाव अक्षय मिलिंद बिऱ्हाडे (२५) असे असून तो जळगाव येथील अंमळनेर येथे राहत होता. अक्षयने राज्य राखीव पोलीस बल गट क्र-११, नवी मुंबई कॅम्पच्या सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज केला होता.

शनिवारी बाळेगाव, वाकळण येथील एसआरपीएफच्या कॅम्पमध्ये मैदानी चाचणी सुरू होती. पुरुष उमेदवारांमध्ये ५ कि.मी. धावण्याची चाचणी सुरू असताना ७ उमेदवारांना चक्कर येऊन ते कोसळले. त्यामुळे त्यांना तत्काळ कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र, या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच अक्षयचा मृत्यू झाला.

यातील प्रेम सुखदेव ठाकरे (२९) हा दुसरा उमेदवार अत्यवस्थ असून त्याच्यावर तसेच अमित गायकवाड (२०), पवन शिवाजी शिंदे (२५), अभिषेक शेटे (२४), सुमित किशोर अदाटकर (२३), साहिल किशोर लावण (१९) या सर्वांवर छत्रपती शिवाजी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अक्षयला हृदयविकाराचा झटका आला की, त्याने काही सेवन केले होते, याची तपासणी रुग्णालयाकडून करण्यात येत आहे. शवविच्छेदनानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. याबाबतची नोंद डायघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

पाच किमी धावण्याच्या चाचणीदरम्यान घडली दुर्घटना

राज्य राखीव पोलीस बल गट क्र-११, नवी मुंबईच्या वतीने बाळेगाव वाकळण येथील एसआरपीएफच्या कॅम्पमध्ये ३४४ सशस्त्र पोलीस शिपाई पदांकरिता २४ जूनपासून भरती प्रक्रिया सुरू आहे. शनिवारी मैदानी चाचणीसाठी उमेदवारांची ५ कि.मी. धावण्याची चाचणी घेण्यात येत असताना हा दुर्दैवी प्रकार घडला.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा