देश-विदेश
भावेश ब्राह्मणकर
मथळा वाचून दचकलात ना पण हे खरे आहे. कोण आहे हा भाग्यशाली व्यक्ती असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. नायजेरियातील या व्यक्तीची अक्षरशः लॉटरी लागली असून सध्या त्याची जगभर चर्चा आहे.
युद्ध कोणासाठी विनाश घेऊन येते, तर काहींसाठी ते अनपेक्षित आर्थिक संधींचे दालन खुले करते. इतिहास साक्षी आहे की, जेव्हा-जेव्हा भू-राजकीय संघर्षांमुळे जागतिक पुरवठा साखळी कोलमडते, तेव्हा काही मोजकेच दूरदर्शी खेळाडू त्या संकटाचे सोने करून दाखवतात. फेब्रुवारी २०२६ च्या उत्तरार्धात अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे आणि त्यानंतर इराणने जागतिक तेल व्यापाराची मुख्य धमनी असणारी होर्मूझची खाडी बंद केल्यामुळे जगभरात जे प्रचंड ऊर्जा संकट ओढवले, त्याने पुन्हा एकदा याच नियमावर शिक्कामोर्तब केले आहे. या अभूतपूर्व जागतिक संकटामुळे आफ्रिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्ती अलिको डँगोट यांच्या नेतृत्वाखालील नायजेरियाच्या २० अब्ज डॉलर्सच्या महाकाय ‘डँगोट रिफायनरी’चे भाग्यच पालटले आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क टाइम्ससह विविध आंतरराष्ट्रीय वृत्त माध्यमांनी डॅंगोट रिफायनरीच्या या अद्भूत व्यावसायिक यशावर सविस्तर प्रकाश टाकला आहे. एका अर्थाने, हे संकट डँगोट यांच्यासाठी जागतिक पटलावर एका नव्या ऊर्जा महासत्तेचा उदय घडवून आणणारे ठरले आहे.
फेब्रुवारी २०२६ च्या अखेरीस इराणविरुद्ध झालेल्या लष्करी संघर्षानंतर जागतिक स्तरावर खनिज तेलाच्या आणि शुद्ध केलेल्या इंधनाच्या पुरवठा साखळीत भूकंपाचे धक्के बसले. जगातील एकूण खनिज तेलाच्या पुरवठ्यापैकी सुमारे एक-पंचमांश हिस्सा अत्यंत संवेदनशील होर्मूझच्या खाडीतून प्रवास करतो. ही मार्गिका अचानक बंद झाल्याने मध्य पूर्व आशियातील तेलाचा पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला. या एकाच झटक्याने आशिया, युरोप आणि आफ्रिकेतील अनेक देशांसमोर ऐनवेळी इंधनाची तीव्र टंचाई उभी ठाकली.
दुसरीकडे, युक्रेनकडून रशियन रिफायनरी आणि टँकर्सवर सतत होत असलेल्या हल्ल्यांमुळे आफ्रिकेत येणाऱ्या रशियन पेट्रोलियम उत्पादनांचा प्रवाह देखील आकुंचन पावला. या दुहेरी संकटामुळे आफ्रिका खंड, ज्याचे पूर्व व उत्तर भाग आपल्या गरजेच्या इंधनासाठी मोठ्या प्रमाणावर मध्य पूर्व आशियावर अवलंबून होते, एकाएकी उघड्यावर पडले. परंतु, नेमक्या याच जागतिक संकटाच्या काळात नायजेरियातील लागोस येथे उभी राहिलेली डँगोट रिफायनरी जागतिक बाजारासाठी एक तारणहार ठरली.
युद्ध सुरू होण्याच्या काही आठवडे आधीच डँगोट यांची २० अब्ज डॉलर्स खर्चून उभारलेली महाकाय रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत झाली होती. जेव्हा जागतिक पुरवठा विस्कळीत झाला, तेव्हा जगभरातील खरेदीदार आणि सरकारांनी पर्यायी पुरवठ्यासाठी डँगोट रिफायनरीशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. एस अँड ग्लोबल एनर्जीच्या अहवालानुसार, एप्रिल आणि मे २०२६ मध्ये डँगोट रिफायनरी ही जगातील सर्वात मोठी जेट इंधन निर्यातक बनली.
डँगोट इंडस्ट्रीजच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, जुलै महिन्यात ही रिफायनरी युरोपची सर्वात मोठी जेट इंधन आणि डिझेल पुरवठादार ठरली. विशेष म्हणजे, या वर्षी प्रथमच या रिफायनरीतून अमेरिकन बाजारातही जेट इंधनाची निर्यात करण्यात आली. या अभूतपूर्व मागणीमुळे आफ्रिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्ती अलिको डॅंगोट यांच्या संपत्तीत फेब्रुवारीपासून ५ अब्ज डॉलर्सहून अधिकची भर पडली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या आधारे ही वाढ सुमारे ४.८६ अब्ज डॉलर असल्याचे नमूद करण्यात आले असून, त्यांची एकूण संपत्ती ३४.८ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
अलिको डँगोटे हे नायजेरियातील उद्योगपती आणि आफ्रिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ते डँगोटे ग्रुपचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांच्या व्यावसायिक साम्राज्याची सुरुवात १९७८ मध्ये तांदूळ, साखर आणि सिमेंटच्या व्यापारातून झाली. पुढे त्यांनी व्यापारापेक्षा उत्पादन क्षेत्रावर भर देत मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विस्तार केला. डँगोटे समूहाचा व्यवसाय आज सिमेंट, साखर, खत, मीठ, ऊर्जा आणि तेलशुद्धीकरण अशा विविध क्षेत्रांत असून आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये त्याचे अस्तित्व आहे. समूहाचा प्रमुख व्यवसाय असलेल्या डँगोटे सिमेंटची वार्षिक उत्पादन क्षमता सुमारे ४८.६ दशलक्ष मेट्रिक टन आहे. फोर्ब्सनुसार, मार्च २०२६ मध्ये त्यांची संपत्ती २८.५ अब्ज डॉलर होती.
एका बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारात डँगोट रिफायनरीचा दबदबा वाढत असताना आणि अब्जावधी रुपयांचा नफा कमावला जात असताना, नायजेरियाच्या अंतर्गत वर्तुळात मात्र काहीसा असंतोष आणि गंभीर आव्हाने कायम आहेत. परंतु, युद्धाच्या काळामुळे इंधन किमतींवर झालेला जागतिक परिणाम आणि अंतर्गत बाजारपेठेतील पुरवठा यामुळे नायजेरियन जनतेला महागाईचा चटका सहन करावा लागला आहे. जागतिक बाजारातील दर वाढल्यामुळे नायजेरियातील पेट्रोलच्या पंप किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या. काही टीकाकारांचा असा आरोप आहे की, डँगोट यांच्या कंपन्यांना सरकारी पातळीवर झुकते माप मिळते आणि त्यामुळे देशात ते मक्तेदारी चालवत आहेत. याउलट, डँगोट प्रशासनाचे म्हणणे आहे की, सरकारी नियम आणि स्थानिक पातळीवर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात येणाऱ्या अडथळ्यांमुळे काही काळ अडचणी निर्माण झाल्या, परंतु कंपनीने नेहमीच राष्ट्राच्या हिताला प्राधान्य दिले आहे.
या प्रचंड यशाच्या जोरावर डँगोट रिफायनरी आता आणखी एका ऐतिहासिक व्यावसायिक टप्प्यासाठी सज्ज होत आहे. अलीकडेच दुबईस्थित एका गुंतवणूक समूहाकडून १ अब्ज डॉलरचे भक्कम वित्तीय समर्थन मिळवण्यात आले आहे. यामध्ये ६०० दशलक्ष डॉलर्सचा खाजगी प्लेसमेंट आणि आगामी आयपीओसाठी ४०० दशलक्ष डॉलर्सच्या अंडररायटिंग यांचा समावेश आहे.
डँगोट रिफायनरीने नायजेरियाच्या स्टॉक एक्सचेंजमध्ये आपल्या शेअर्सची विक्री (आयपीओ) करण्यासाठी अधिकृत अर्ज केला असून, हा आफ्रिकेच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा इक्विटी सार्वजनिक भरणा ठरेल असा अंदाज आहे. यातून येणारा निधी रिफायनरीची क्षमता सध्याच्या प्रतिदिवशी ६,५०,००० बॅरलवरून वाढवून प्रतिदिवशी १.४ दशलक्ष बॅरलपर्यंत नेण्यासाठी वापरला जाणार आहे. इराण युद्धाने निर्माण केलेले जागतिक ऊर्जा संकट अनेकांसाठी डोकेदुखी ठरले असले, तरी अलिको डँगोट यांच्यासाठी ऐतिहासिक संधी ठरले आहे. युरोप, अमेरिका आणि आफ्रिका खंडातील इतर देशांच्या इंधनाची गरज भागवून जागतिक ऊर्जा पटलावर एक नवीन महासत्ता म्हणून आपले स्थान प्रस्थापित केले आहे.
हे लक्षात घेतले पाहिजे की, डँगोट यांनी युद्ध सुरू झाल्यानंतर रात्रीतून ही रिफायनरी उभारलेली नाही; युद्धाच्या अनेक वर्षे आधी केलेली २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक संकटाच्या काळात अत्यंत उपयुक्त ठरली आहे. ज्या प्रकल्पाला अनेकांनी महाकाय आर्थिक जोखिम म्हटले होते, तोच प्रकल्प आज आफ्रिकेच्या ऊर्जा सुरक्षेचा आणि जागतिक अर्थकारणाचा कणा बनला आहे. डँगोट रिफायनरी आगामी काळात जागतिक बाजारातील एक अत्यंत प्रभावी आणि निर्णायक खेळाडू म्हणून ओळखली जाईल, यात शंका नाही.
bhavbrahma@gmail.com
संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र संबंध अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार