- ॲड. हर्षल प्रधान
मत आमचेही
गणरायाचे आगमन या आठवड्यात होत आहे. गणपती किंवा गणेश म्हणजे गणाचा स्वामी. गण म्हणजे समुदाय. या गणाचा अर्थात समुदायाचा स्वामी म्हणजे रक्षणकर्ता. म्हणून गणपतीचे महत्त्व सर्व देवतांमध्ये अधिक. कोणत्याही शुभ कार्यामध्ये आधी वंदन गणेशाचे करतात आणि कोणतेही विघ्न असह्य झाले की ते विघ्न दूर करून समुदायाची रक्षा करण्याची याचनाही गजाननाकडेच केली जाते. महाराष्ट्रातील जनता आज हेच आर्जव करत आहे. ज्या राज्यातील सरकार महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही स्वमतलबी वारे आपमतलबी कंत्राटदार आणून त्यांच्या पुतळ्याची दुरवस्था झाल्यावरही राजकारण करते त्यांना सहन करणे आता जनतेला अशक्य झाले आहे. त्यामुळे या राज्याला या भ्रष्ट सरकारच्या तावडीतून मुक्त करा, अशीच याचना राज्यातील जनता गणरायाकडे करत आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केली. खरे तर गणेशाची पूजाअर्चा शिवकाळापासून घरोघरी करण्यात येत असे. गणेश उत्सव देखील त्या काळात उत्साहात साजरा होत असे. मात्र त्याचे स्वरूप घरगुती स्वरूपाचे होते. काही इतिहास संशोधक असे दाखले देतात की, गणेश विसर्जनाच्या दिवशी त्या त्या गावातील घराघरातील गणपती एका शिस्तबद्ध पद्धतीने ओळीने विसर्जित होत असत आणि सगळ्यात पुढे त्या त्या गावचा पाटील वा प्रमुख असे. हे देखील एक सार्वजनिक रूपच म्हणायला हवे. स्वातंत्र्यपूर्व काळात पुण्यात काहींनी सार्वजनिक मंडपात गणेशाची मूर्ती आणली तेव्हा टिळकांनी ही कल्पना उचलून धरली. केसरी अंकात त्यांनी गणेशाच्या सार्वजनिक आगमन आणि विसर्जन उत्सवाचे स्वागत करणारे लेखनही केले. १८९३ पासून टिळकांनी गणेशोत्सवाचा वापर राष्ट्रवादी विचारांचा प्रसार-प्रचार करण्यासाठी केला. १८९६ मध्ये त्यांनी शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाला देखील सुरुवात केली. त्याच वर्षी टिळकांनी विदेशी कपड्यांवरील बहिष्काराची चळवळ देखील सुरू केली होती. १९०४-०५ पर्यंत गणेशोत्सवाचा वापर राष्ट्रभक्तीच्या कार्यासाठी केला जात आहे, याची कल्पना देखील इंग्रजांना आलेली नव्हती. १९०८ मध्ये टिळकांना राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्यात सहा वर्षांची शिक्षा झाली. टिळक मंडालेला गेल्यानंतर देखील गणेशोत्सवाचे स्वरूप काही अंशी तसेच राहिले. जून १९१४ ला ते मंडालेहून परत आले. त्यावेळी त्यांना कुणी भेटायला येऊ नये म्हणून इंग्रजांनी वटहुकूम काढला होता. त्यांच्या वाड्याबाहेर पोलीस तैनात करण्यात आले होते. त्यानंतर काही महिन्यांतच गणेशोत्सव येईल आणि त्यामध्ये टिळक आपल्याविराेधात कारवाया करतील, अशी इंग्रजांना धास्ती होती. गणेशोत्सवाचा फायदा टिळकांना होऊ नये म्हणून इंग्रजांनी पावले उचलली होती.
इतिहास हेच सांगतो की गणेशच विघ्न हरतो
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाला महत्त्व प्राप्त करून दिले आणि राज्यभर गणेशोत्सव आनंदाने साजरा होऊ लागला. त्याचप्रमाणे टिळकांनीच सुरू केलेला शिवजयंती उत्सवही असाच लोकप्रिय होऊ लागला. त्यातूनच क्रांतीच्या ज्वाला फुलल्या आणि गणेशानेच इंग्रजांचे विघ्न देशावरून दूर केले. देशाला स्वातंत्र्य मिळायला थोडा उशीरच झाला. लोकमान्य टिळक यांच्या हयातीत देशाला स्वातंत्र्य मिळायला हवे होते. तसे झाले असते तर देशाचे आजचे चित्र वेगळे असते. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणारी आजच्यासारखी बांडगुळे पैदाच झाली नसती. राष्ट्राभिमानी तेजस्वी ज्वाला जी छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रात रोवून साता समुद्रापार नेऊन दाखवली तशी राष्ट्राभिमानी राजकारणी जमात आज अस्तित्वात असती. पण तसे झाले नाही. सत्तेसाठीचा लोचटपणा पुढच्या पिढ्यांमध्ये दिसू लागला. त्यातूनच आजची राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मतलबी वाऱ्यामुळे आणि आपमतलबी कंत्राटदारांच्या मैत्रीमुळे, आपल्या भ्रष्ट कारभारामुळे कोसळतो त्याचे या सरकारला काहीच वाटत नाही. हे एक प्रकारे राज्यावरील विघ्नच म्हणायला हवे. त्यामुळे गणरायाचे आगमन होताच राज्यावरील हे विघ्न आणणारे सरकार आम्हाला नको, त्यांचे विसर्जन करा आणि या राज्याला छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांपासून मुक्त करा, अशी याचना राज्यातील जनता करत आहे. हे विघ्न गणराया नक्की दूर करेल, याचीही खात्री आपल्या सर्वसामान्य गणेशभक्तांना आहे.
छत्रपतींचे गड-किल्ले आणि न बाधणारे खारे वारे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांची यादी पाहिली आणि वाचली तरी अंगावर शहारा येतो. त्यांच्या अवघ्या जेमतेम पस्तीस वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी शेकडो किल्ले बांधले. यामध्ये डोंगरी किल्ले, भुईकोट व सागरी किल्ल्यांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू व गोवा या सध्याच्या राज्यातील किल्ल्यांचाही समावेश आहे. यापैकी सुमारे १११ किल्ले शिवाजी महाराजांनी बांधल्याची नोंद एका बखरीत आहे. तसेच त्यांनी ४९ किल्ल्यांची डागडुजी करून त्यात आवश्यक ते बदल केले व ते अभेद्य बनविले. या किल्ल्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अखत्यारित असलेल्या, शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या तसेच शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांचा समावेश आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सुरुवात बारा मावळ या प्रदेशातून केली. हा प्रदेश जरी लहान होता तरी तो जंगल-झाडी, डोंगर व नद्या यांनी युक्त होता. तेथे आठ किल्ले होते. हा प्रदेश लष्करी दृष्टीतून अजिंक्य असाच होता. शिवाजी महाराजांचा कल अजिंक्य भूभागावर किल्ले बांधण्याचा होता. त्यांनी घाट तेथे किल्ला हे धोरण अंगिकारले. हे किल्ले म्हणजे एक प्रकारच्या तपासणी चौक्याच होत्या. तेथून कोणीही आत प्रवेश करू शकत नव्हते. प्रवेश केलाच तर परत जाण्याची हमी नव्हती. अंबाघाट-रसाळगड, कामथाघाट-कांगोरी, कुंडीघाट-मौजगड, कुंभार्ली घाट-जयगड, कुसूर घाट-भिवगड-टाकगड, पिपरी घाट-सुधागड, माताघाट-भवानगड, रणतोंडी घाट-प्रतापगड, विशालगड घाट-विशालगड-माचाळगड, शेवल्या घाट-मानगड. हे किल्ले म्हणजे एक प्रकारचे पहारेकरीच होते. तसेच त्यांनी समुद्रावरून मारा होऊ नये म्हणून प्रत्येक किनारपट्टीही सुरक्षित केली. त्यांनी तेथे प्रत्येक दहा ते बारा मैलांवर सागरी किल्ला बांधला. एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात त्यांचे ५२ किल्ले होते. पुण्यात ३० डोंगरी व दोन भुईकोट असे ३२ किल्ले होते. ज्या रस्त्याने शत्रू येण्याची शक्यता होती त्या मार्गात जास्त किल्ले बांधले गेले. स्वराज्य अजिंक्य राहावे म्हणून त्यांनी किल्ल्यांची रिंगणे तयार केली. बारा मावळ क्षेत्रात असलेल्या आठ किल्ल्यांना अशेरी किल्ला, विशाळगड, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, रायगड, तोरणा, तळा, घोसाळा आणि सुधागड अशा बाहेरच्या रिंगणातील किल्ल्यांचे संरक्षण होते. यास पूरक म्हणून त्यांनी त्याबाहेरही साल्हेर, मुल्हेर, रोहिडा, रांगणा असे रिंगण तयार केले. त्यासोबतच त्यांनी सागरी किल्ल्यांचीही एक साखळी तयार केली. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग, खांदेरी, कुलाबा, सुवर्णदुर्ग यांनी स्वराज्य अभेद्य ठेवले. एकदा त्यांना पंत अमात्यांनी अर्ज केला की, ‘किल्ले बहुत जाहले. त्यांच्यामागे पैका विनाकारण खर्च होत आहे.’
महाराजांचे उत्तर होते - ‘जसा कुणबी शेतात माळा घालून ते राखतो तसे किल्ले हे राज्याच्या रक्षणासाठी आहेत. तारवास खिळे मारून बळकट करतात तशी राज्यास बळकटी किल्ल्यांची आहे. किल्ल्यांच्या योगाने औरंगशहासारख्याची उमर गुजरून जाईल, पण तो आम्हाला जिंकू शकणार नाही. त्याची स्वारी आमच्यावर झाली तर त्याला जुने-नवे असे तीनशेसाठ किल्ले आहेत. एक एक किल्ला तो एक वर्ष लढला तरी त्यास ३६० वर्षे लागतील.’
महाराजांची दूरदृष्टी किती व्यापक होती, याचा विचारही आपण पामर करू शकणार नाही. मात्र आजचे राजकारणी किती नतद्रष्ट आहेत. म्हणे समुद्राचे खारे वारे पुतळ्याला लागले म्हणून पुतळ्याची दुरावस्था झाली. या नतद्रष्ट राजकारण्यांना आणि त्यांच्या पिढ्यांना महाराजांच्या किल्ल्यांची उजळणी करायला लावून पुढील तीनशेपासष्ट वर्ष राजकारणापासून अलिप्त ठेवण्याची शिक्षा करायला हवी. राज्यावर आलेले हे विघ्न दूर करण्याचे एकच कार्य गणेशाने करावे एवढीच श्रीचरणी याचना. गणपती बाप्पा मोरया! राज्याला या भ्रष्ट सरकारकडून मुक्त करा!
(लेखक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख आहेत.)