प्रासंगिक
सुरेश काकाणी
निवृत्ती ही कर्तृत्वाचा शेवट नसतो. ती केवळ औपचारिक सेवेची समाप्ती असते. एका नव्या पर्वाची सुरुवात असते. मुंबई महापालिकेचे निवृत्त आयुक्त भूषण गगराणी हे साहित्य-कलेचे जाणकार रसिकही आहेत. त्यांच्यातील साहित्य-कला आता अधिक बहरू शकेल.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदावरून निवृत्त झालेल्या डॉ. भूषण गगराणी यांनी ३१ मार्च २०२६ रोजी भारतीय प्रशासकीय सेवेतील आपला प्रदीर्घ प्रवास पूर्ण केला. त्यांनी आपल्या प्रशासकीय सेवेत कार्यकुशलतेचा, दूरदृष्टीचा आणि प्रामाणिकतेचा ठसा उमटविला आहे. ते सेवेतून निवृत्त होत असताना, माझ्यासारख्या अधिकाऱ्याच्या मनात त्यांच्या प्रेरणादायी कार्याच्या असंख्य आठवणी जाग्या झाल्या. त्या शब्दबद्ध करताना मनात अनेक भावना दाटून आल्या. लेखणी हातात घेताच त्या सहजपणे कागदावर उतरू लागल्या. त्या भावनांचा प्रामाणिक आविष्कार म्हणजेच हा लेखप्रपंच.
प्रशासकीय सेवा ही केवळ नोकरी नसून ती एक साधना आहे, हे ज्या थोडक्या अधिकाऱ्यांनी आपल्या आचरणातून सिद्ध केले, त्या मांदियाळीत ‘डॉ. भूषण गगराणी’ हे नाव अग्रक्रमाने आणि आदराने घेतले जाते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेपासून त्यांचा हा प्रवास सुरू झाला. या परीक्षेमध्ये देशात तृतीय क्रमांक मिळवत त्यांनी असंख्य तरुणांच्या आशा-आकांक्षांना नवी दिशा दिली. मराठी भाषा विषय घेऊन देशातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेतही यश संपादन करता येते, हे त्यांनी ग्रामीण भागातील तरुणांना आत्मविश्वासाने दाखवून दिले. प्रशासकीय ‘करियर’च्या प्रारंभीच त्यांनी मराठीचा ठसा राष्ट्रीय स्तरावर उमटविला. पुढे मराठी भाषा विभागाचे सचिव म्हणून काम करताना, मराठीला 'अभिजात' भाषेचा दर्जा मिळवून देण्यात त्यांनी दिलेले योगदान हा एक सुवर्णयोग ठरला. सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून त्यांनी कला क्षेत्राला दिलेली ऊब आणि मायबोलीची केलेली सेवा अविस्मरणीय आहे.
प्रशासनातील अभ्यासू, संयमी आणि दूरदर्शी नेतृत्व म्हणून गगराणी यांची ओळख महाराष्ट्रभर दृढ झाली होती. अनेकांना त्यांच्यासोबत काम करण्याची संधी लाभली; मला ती प्रत्यक्ष मिळाली नसली तरी त्यांच्या कार्यशैलीचे निरीक्षण आणि ऐकिव अनुभवांतून मला स्वत:ला खूप काही आत्मसात करता आले. १९९० च्या सुमारास त्यांच्या यशाने ते सर्वपरिचित झाले होते; मात्र आमची प्रत्यक्ष ओळख १९९४ मध्ये झाली आणि ऋणबंध दृढ होत गेले.
गगराणी यांनी तीन दशकांहून अधिक काळ प्रशासकीय सेवेत निष्ठेने आणि कौशल्याने कार्य केले. त्यांच्या गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांच्यावर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या गेल्या. कारकीर्दीच्या प्रारंभीच ‘चांदा ते बांदा’ असा संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी विविध ‘पोस्टिंग’च्या निमित्ताने पिंजून काढला. चंद्रपूर जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांच्यावर पहिली जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर एक-एक पायरी यशस्वीपणे चढत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, सचिव, प्रधान सचिव, व्यवस्थापकीय संचालक, अपर मुख्य सचिव अशा विविध पदांवर आपली छाप उमटवली.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, सिडको, एमआयडीसी, पर्यटन विभाग, मुख्यमंत्री सचिवालय अशा विविध विभागांमध्ये काम करताना त्यांनी प्रत्येक पदाला वेगळी उंची प्राप्त करून दिली. छत्रपती संभाजीनगर (तत्कालीन औरंगाबाद) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांनी केलेले काम सर्वश्रुत आहे. सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा तयार केला. तो अंमलात आणला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान मिळवून दिले. कालांतराने पर्यटन विभागात कार्यरत असताना त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाचे महत्त्व अबाधित राहावे किंबहुना त्यात वाढ व्हावी म्हणून प्रयत्न केले.
सिडकोमार्फत महानगर नियोजन असो वा एमआयडीसीद्वारे औद्योगिक धोरणांची आखणी असो, प्रत्येक विषयाच्या मुळाशी जाऊन तांत्रिक बारकावे समजून ते पुढची दिशा निश्चित करत असत. सिडकोत व्यवस्थापकीय संचालक असताना त्यांनी नवी मुंबई विमानतळ प्रकल्पातील बाधितांच्या प्रश्नांचे अत्यंत संयमाने निराकरण केले. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या जागेवर जाऊन भेटी घेतल्या. त्यांच्याशी थेट चर्चा केली. त्यातून त्यांच्या संवेदनशीलतेची प्रचिती आली. एमआयडीसीमध्ये ‘सिंगल विंडो सिस्टिम’ सुरू करून त्यांनी उद्योगवाढीला चालना दिली. त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे उद्योग उभारणीतील अडथळ्यांची शर्यत दूर झाल्याने अनेक उद्योग महाराष्ट्राकडे आकर्षित होण्यास मदत झाली. त्यामुळे राज्यातील उद्योगांचे जाळे विस्तारण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे, हे इथे नमूद करणे निश्चितच अगत्याचे आहे.
मुंबईवरील २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या वेळी त्यांनी दाखविलेली धीराची भूमिका विशेष उल्लेखनीय आहे. अंधाधुंद गोळीबारात त्यांचा वाहनचालक जखमी झालेला असताना त्या भीषण रात्री त्यांनी मंत्रालय गाठून वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव या नात्याने वैद्यकीय यंत्रणेचे नेतृत्व केले. जखमींना तातडीने उपचार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने त्यांनी सर्व व्यवस्था सज्ज केली.
गगराणी यांच्या गाठीशी असलेल्या बहुविध अनुभवांमुळे ध्येय-धोरणे ठरविण्याच्या दृष्टीने राज्याच्या नेतृत्वाला ते नेहमीच हवे असायचे. त्यामुळेच बहुतांश मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर मुख्यमंत्री सचिवालायतील महत्त्वाची जबाबदारी वेळोवेळी सोपविली होती. कारकीर्दीच्या उत्तरार्धात त्यांच्यावर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. गुंतागुंतीच्या समस्यांनी वेढलेल्या या महानगरात त्यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर पायाभूत सुविधा, सार्वजनिक आरोग्य आणि प्रशासनिक कामकाजात सुसूत्रता आणल्याने लक्षणीय सुधारणा घडवून आणल्या. महापालिका आयुक्त म्हणून ते प्रत्येक दिवाळी सफाई कामगारांसोबत साजरी करत असत. असे विविध उपक्रम राबवून छत्रपती शाहू महाराजांची शिकवण आचरणात आणल्याने कोल्हापूरच्या मातीशी असलेले त्यांचे नाते आपोआप अधोरेखित झाले. कोल्हापूरच्या संस्कारातून आलेल्या समतेच्या मूल्यांना त्यांनी कृतीत उतरवले. त्यांच्या नेतृत्वातील मानवतावादी दृष्टिकोन, शिस्त आणि दूरदृष्टी पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मुंबई आणि मुंबई उपनगर असे दोन जिल्हे सामावलेले आहेत. दोन्ही जिल्ह्यांना स्वतंत्र जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यरत होते; परंतु भारत निवडणूक आयोगाने प्रथमच गेल्या विधानसभा निवडणुकांपूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांना दोन्ही जिल्ह्यांचा मिळून एकच ‘जिल्हा निवडणूक अधिकारी’ म्हणून घोषित केले. तो पहिला मान गगराणी यांना मिळाला. तिथेही त्यांनी आपल्या शिस्तप्रिय आणि नियोजनबद्ध कार्यशैलीची छाप उमटवली आणि विधानसभेच्या निवडणुका निर्धोकपणे पार पाडल्या. त्याबद्दल भारत निवडणूक आयोगाने त्यांचा राष्ट्रीय स्तरावर विशेष गौरव केला.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अलीकडेच पार पडलेल्या बहुप्रतीक्षित निवडणुकांच्या निमित्ताने माझा त्यांचाशी अधिक संपर्क आला. मी राज्य निवडणूक आयोगाचा सचिव म्हणून कार्यरत असल्यामुळे मला त्यांच्या कामाची शैली अधिक जवळून पाहता आली. राज्य निवडणूक आयोगाचे वेगवेगळे आदेश आणि विविध कायद्यांच्या चौकटीत राहून बृहन्मुंबईसारख्या महाकाय महानगरपालिकेची निवडणूक त्यांनी व्यवस्थापकीय कौशल्याच्या जोरावर पार पाडली. त्यानिमित्ताने मी अनुभवलेली त्यांची कार्यशैली निश्चितच प्रेरणादायी वाटली.
गगराणी एखाद्या प्रश्नाच्या किंवा समस्येच्या तळाशी जाऊन त्याची उकल करायचे आणि तो प्रश्न कितीही क्लिष्ट असला तरी तो कायद्याच्या चौकटीत राहून सोडविता येतो, हे त्यांनी वारंवार दाखवून दिले होते. कठीण प्रसंगांमध्येही शांतचित्ताने आणि धैर्याने निर्णय घेण्याचे कसब त्यांच्या अंगी होते. या गुणवैशिष्ट्यांमुळे अशक्यप्राय वाटणारे प्रकल्पही ते पूर्णत्वास नेण्यात त्यांचा हातभार लागत असे. ते केवळ आदेश देणारे अधिकारी नव्हते, तर उत्तम मार्गदर्शक होते. गगराणी यांच्याविषयी माझ्या हृदयात असलेल्या भावनांच्या पराकाष्ठेचे ते सूचक आहे. त्यांच्या अनुभवसंपन्न ज्ञानाचा व्यक्तिश: मला आणि त्यांच्या इतरांनाही लाभ होत राहील. कारण निवृत्ती ही कर्तृत्वाचा शेवट नसतो. ती केवळ औपचारिक सेवेची समाप्ती असते. ते साहित्य-कलेचे जाणकार रसिकही आहेत. त्यांच्यातील साहित्य-कला आता अधिक बहरू शकेल. पुढील आयुष्यासाठी त्यांना माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा!
(लेखक राज्य निवडणूक आयोगाचे सचिव आहेत)