मत आमचेही
केशव उपाध्ये
शिवसेनेबरोबर भाजपने युती केली आणि ती तीस वर्षे चालवली. युतीमुळे भारतीय जनता पक्ष एकदा सत्तेत आला हे जरी खरे असले तरी पक्षाच्या वाढीला युतीमुळे स्वाभाविक मर्यादा पडल्या होत्या. भाजपचे सध्याचे यश हे जनसंघापासून केलेल्या मेहनतीचे फळ आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकीत २० महापौर, ११७ नगराध्यक्ष, महापालिका व नगरपालिकांमधील सुमारे चार हजार नगरसेवक, शेकडो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य. भाजपचे हे २०२६ मधील महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील यशाचे चित्र आहे. अगदी १९९०च्या दशकापर्यंत भाजपचे महाराष्ट्रात हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक असत, यावर नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही. महाराष्ट्रातील या यशासाठी कार्यकर्त्यांच्या अनेक पिढ्या खपल्या आहेत. त्यांच्या परिश्रमाच्या आणि त्यागाच्या जोरावर आज भाजप हा राज्यातील क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. इतर राजकीय पक्षांपेक्षा भाजपचे वेगळेपण आहे. इथे राष्ट्र प्रथम, नंतर संघटना आणि शेवटी स्वतः हा विचार भाजपचा आत्मा आहे. याच विचारांनी प्रेरित झालेले देशात ११ कोटींपेक्षा अधिक भाजपचे सदस्य आहेत. त्याशिवाय भाजपच्या या विचारावर निष्ठा असलेले कोट्यवधींचे हात प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरीत्या भाजपचा झेंडा उंचावत आहेत. पाच वर्षांपूर्वी चीनमधील कम्युनिस्ट पक्ष जगात सर्वात मोठा होता. त्या पक्षाचे साडेसात कोटी सदस्य होते. आज जगात सर्वात मोठा राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष आहे. कारण या पक्षाचे ११ कोटींपेक्षा अधिक सदस्य आहेत. गाव, वाड्या, वस्त्या तांड्यावरही आज भाजपचा झेंडा फडकतो आहे.
सुरुवातीच्या काळात भटा-बामणांचा पक्ष अशी अवहेलना व्हायची. महाराष्ट्रातील विशेषतः प. महाराष्ट्रासारख्या भागात तर जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी नमस्कार केला तर त्याला नमस्कार का केलास म्हणून थप्पड खायला लागायची. असा अपमान, अवहेलना सहन करीतच पक्षवाढीसाठी कार्यकर्ते झगडले, झिजले. सत्ता व संपत्ती व प्रस्थापित यांच्या विरुद्ध लढणे इतके सोपे नव्हते. परंतु जसजशी लोकशाही प्रगल्भ होत गेली, शिक्षणाचा प्रसार झाला, तसतसे सर्वसामान्य दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय राजकीयदृष्ट्या साक्षर झाले. राजकीय पक्ष, राजकारण त्यांना कळू लागले आणि खेड्यापाड्यातील लोकही राजकारणात पर्याय शोधू लागले. काँग्रेसला कंटाळलेल्या लोकांनी भाजपला पर्याय म्हणून निवडले. भाजप भटा-बामणांचा पक्ष असा जाणीवपूर्वक गैरसमज पसरविणाऱ्यांचा बुरखा फाडण्याचे काम भाजपच्या अनेक बहुजन समाजातील कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी केले. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजप संपला अशी समजूत करून देण्यात आली. परंतु भाजपने पराभवाचे परिशीलन केले, चिंतन केले आणि नव्या जोमाने पुनःश्च हरिओम म्हणत कार्यकर्ते पक्ष संघटनेच्या मजबुतीच्या कामाला लागले. १९८४ साली अटलबिहारी वाजपेयींसह सर्व शीर्षस्थ नेते पराभूत झाले होते. सगळ्या देशाला अपरिचित असलेले केवळ दोन सदस्य निवडून आले. पक्षाच्या इतिहासातला तो सर्वात अवघड कालखंड होता.
महाराष्ट्रात तर परिस्थिती अधिक अवघड होती. महाराष्ट्र हा खऱ्या अर्थाने त्या काळातला काँग्रेसचा बालेकिल्ला होता. १९७२ साली जनसंघाचे केवळ पाच सदस्य महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेले होते, तर १९७८ साली झालेल्या निवडणुकीत जनता पक्षाला फक्त ९९ जागा जिंकता आल्या होत्या, त्यात साधारणपणे ३० जण पूर्वाश्रमीच्या जनसंघाशी नाते सांगणारे होते. १९८० साली भाजपची स्थापना करताना जनता पक्षाच्या आमदारांपैकी ३४ जण भाजपमध्ये सामील झाले. त्याच वर्षी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. ‘भारतीय जनता पक्ष’ हे नाव आणि ‘कमळ’ हे नवे चिन्ह घेऊन लढवलेली ही देशातली पहिली निवडणूक! त्या निवडणुकीत आमच्या पदरात फक्त १४ जागा आणि ९.४ % मते पडली होती. त्यावेळेला पक्षाचे नाव व निशाणी लोकांपर्यंत घेऊन जाण्याच्या उद्देशाने आम्ही जास्तीत जास्त जागा लढवण्याचा प्रयत्न सर्व ताकत लावून केला होता. त्यानंतर सुद्धा आम्ही केवळ १४५ उमेदवारच उभे करू शकलो होतो. जवळ जवळ १५ वर्षे आमची ही परिस्थिती कायम होती. १९९० मध्ये पहिल्यांदा आम्ही ४२ जागांवर पोचलो, पण मतांचा वाटा मात्र ११% च्या खालीच होता. त्याच काळात आम्ही शिवसेनेबरोबर युती केली आणि ती ३० वर्षे चालवली. युतीमुळे आम्ही एकदा सत्तेत आलो हे जरी खरे असले तरी पक्षाच्या वाढीला युतीमुळे स्वाभाविक मर्यादा पडल्या होत्या. त्या युतीमुळे विधानसभेच्या केवळ ४०% व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्याहीपेक्षा कमी साधारण ३०% जागा आमच्या वाट्याला येत असत. पक्ष स्थापन झाल्यानंतर ३४ वर्षांनी पहिल्यांदा २०१४ साली आम्ही महाराष्ट्रात विधानसभेच्या सर्वाधिक म्हणजे २६१ जागा स्वबळावर लढवल्या. त्या निवडणुकीत २८% मते मिळवून व १२२ जागा जिंकून आम्ही पहिल्या क्रमांकावर आलो. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेबरोबर पुन्हा युती केल्यामुळे आम्ही फक्त १६४ जागा लढवल्या व त्यातल्या १०५ जिंकल्या. आम्ही आमचा पहिला क्रमांक टिकवला हे खरे असले तरी युतीमुळे आम्ही मतांची टक्केवारी आणि जागा गमावल्या हे वास्तव होते. पण याच काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमचा पाया मोठ्या प्रमाणात विस्तारण्यात आम्ही यश मिळवले. विधानसभेत १३४ आमदार त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था या सर्व स्तरावर आज आम्ही पहिल्या क्रमांकावर आहोत.
अर्थात हे दिवस सहजासहजी आलेले नाहीत. सर्वोच्च नेत्यापासून तळागाळातल्या सामान्य कार्यकर्त्यापर्यंत सर्वांचे कमालीचे कष्ट त्यामागे आहेत. जनसंघाच्या उभारणीसाठी त्या काळात जे परिश्रम सर्वांनी घेतले आहेत त्याची कल्पना सुद्धा आज कोणी करू शकणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात एकाच जातीचे, सग्यासोयऱ्यांचे, नात्यागोत्याचे वर्चस्व होते. त्याला सुरुंग लावण्यात गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजनांना यश आले. महाराष्ट्रातील समाजकारणाची जाण असलेल्या तपस्वी वसंतराव भागवतांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने छोट्या-मोठ्या मराठेतर जातींना आपल्या झेंड्याखाली आणण्याचे काम केले. त्यामुळे आपले नेते, आपला पक्ष, ही भावना लहान लहान जातींच्या मनात दृढ झाली. धनगर, वंजारी, माळी, साळी, कोळी, कुणबी, आग्री, दलित, आदिवासी समाजाचे असंख्य कार्यकर्ते, शेकडो नेते भाजपशी जोडले गेले. वसंतराव भागवतांसारख्या नि:स्वार्थी योग्याचे मार्गदर्शन, प्रमोद महाजनांसारख्या मेहनती, मुत्सद्दी नेत्याचे संघटन कौशल्य आणि बहुजन चेहरा गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या मेहनती, अभ्यासू व धाडसी नेतृत्वामुळे भाजप बहुजनांपर्यंत पोहचला. त्याचाच परिपाक १९९५ साली शरद पवारांसारख्या बलाढ्य शक्तीचा पराभव करीत महाराष्ट्रात भाजप युतीची सत्ता आली. प्रस्थापितांना फार मोठा हादरा बसला. त्यानंतर पुन्हा भाजपने मागे वळून पाहिलेच नाही. या वाटचालीसाठी योगदान दिलेल्या सर्व ज्ञात, अज्ञात कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन...
प्रदेश उपाध्यक्ष, भाजप