

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनच्या आईच्या घरातून २५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका ४८ वर्षीय मोलकरणीला अटक केली आहे. राशी छाब्रिया असे अटक केलेल्या महिला आरोपीचे नाव असून, तिला रवीना टंडन यांच्या आईची काळजी घेण्यासाठी कामावर ठेवण्यात आले होते. जुहू पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी महिलेला बेड्या ठोकल्या.
आरोपी महिला २०२० पासून टंडन कुटुंबाच्या संपर्कात होती आणि तिने हळूहळू कुटुंबाचा विश्वास संपादन केला होता. ती रवीना टंडन यांच्या ८६ वर्षीय वृद्ध आईची काळजी घेण्यास मदत करायची, तसेच त्यांच्यासाठी जेवणही बनवायची. घरात नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने फिर्यादीच्या खोलीतील कपाटातील दागिने चोरले होते.