संपादकीय

मालक समजणाऱ्यांना लोकच धडा शिकवतील

घरात आलेल्या सुनेला आपल्याकडे मुलीचा दर्जा असतो. मात्र ‘महिला धोरणाचे शिल्पकार’ असे स्वतःला म्हणवणाऱ्या शरद पवारांनी या संदर्भात आपली विचारसरणी किती कुचकामी आहे हेच आपल्या सुनेबद्दलच्या ‘बाहेरून आलेले पवार’ यासारख्या अशोभनीय वक्तव्यांमधून दाखवून दिले आहे.

Swapnil S

- केशव उपाध्ये

मत आमचेही

नेत्यांची पुढची पिढी कर्तृत्त्वहीन असेल तर राजाच्या अंबारीवर बसलेल्या माकडासारखी त्यांची गत होते. लोकोत्तर नेत्यामुळे लोकांकडून मिळणारा मान वास्तविक आपल्याच कर्तृत्त्वासाठी आहे, असा गंड ही नवी पिढी बाळगू लागते आणि स्वतःला त्या लोकांचे मालकच समजायला लागते. स्वतःला महाराष्ट्राचे मालक समजणाऱ्या लोकांना महाराष्ट्र यंदाच्या निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

स्वत्तःच्या क्षमतांबद्दल गंड बाळगणाऱ्यांनी ‘इंदिरा इज इंडिया’ अशी घोषणा दिली होती. आणीबाणीचे दुःशासन पर्व हे त्या घोषणेतून येणाऱ्या सत्तापिपासूपणाची अपरिहार्य परिणती होती. कोविड काळात महाराष्ट्राने असाच एक सत्तालोलूप राज्यकर्ता अनुभवला. स्वतःच्या क्षमतांबद्दल अवास्तव कल्पना आणि राज्यकारभारासाठी आवश्यक कौशल्यांचा पूर्ण अभाव असला की राज्याचा कसा बट्ट्याबोळ होतो हे महाराष्ट्राला त्या काळात पाहायला मिळाले. आपल्या वडिलांना त्यांच्या कर्तृत्वामुळे मिळालेले लोकांचे प्रेम म्हणजे आपल्याला हवे तसे वागण्यासाठी मिळालेला परवानाच आहे, असे मानणाऱ्या त्या नेतृत्वाने सत्तालोभामुळे जनतेचा कौल साफ नाकारला. आपल्या वडिलांनी आयुष्यभर ज्या दुष्प्रवृत्तींच्या विरोधात रान पेटवले, त्या प्रवृत्तींचे मूर्तिमंत रूप असलेल्या गणंगांना महाराष्ट्राच्या सत्तेत पुन्हा स्थापित करण्याचे पाप केले. आता त्याच नेतृत्वाच्या मागे फरपटत जाण्याची वेळ स्वतःला राष्ट्रीय पक्ष म्हणवणाऱ्या काँग्रेस आणि आधी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असलेल्या आणि मग त्या पक्षातले दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार गमावणारे शरद पवार यांच्या पक्षावर आली आहे हे गेल्या आठवडाभरातल्या घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे. अर्थात यातले सारेच स्वतःला महाराष्ट्राचे मालक आणि इथल्या नागरिकांना स्वतःचे गुलाम समजणारे आहेत. त्यामुळे त्यांची आपसातली सुंदोपसुंदी फारशी मनावर घेण्याचे कारण नाही. लोकांच्या भल्याशी ज्याचा मुळीच संबंध नाही अशा त्यांच्या राजकारणाचा येत्या निवडणुकीत मतदार शेवट करणार आहेत, ही तर काळ्या दगडावरची रेघ आहेच. मात्र प्रचाराच्या निमित्ताने त्यांनी उधळलेल्या मुक्ताफळांमुळे या साऱ्यांचे बराच काळ जपलेले बुरखेही टराटरा फाडले जात आहेत, ही त्यातल्या त्यात बरी बाब आहे.

घरात आलेल्या सुनेला आपल्याकडे मुलीचा दर्जा असतो. मात्र ‘महिला धोरणाचे शिल्पकार’ असे स्वतःला म्हणवणाऱ्या शरद पवारांनी या संदर्भात आपली विचारसरणी किती कुचकामी आहे हेच आपल्या सुनेबद्दलच्या ‘बाहेरून आलेले पवार’ यासारख्या अशोभनीय वक्तव्यांमधून दाखवून दिले आहे. महिलांच्या हिताची खरी तळमळ असणाऱ्या कोणाच्याही तोंडून असे विधान कधी निघूच शकले नसते. त्यामुळे ती तळमळ वगैरे केवळ दिखाऊपणा होता, हेच आता सिद्ध झाले आहे.

आयुष्यभर फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्यांना आता अर्धशतकाहून अधिक काळ ज्यांच्याशी वैर धरले त्यांचे उंबरे झिजवायची वेळ आली आहे. जनताद्रोही राजकारणाची अपरिहार्य फळं म्हणून याकडे पाहता येईल. मात्र मूल्यहीन राजकारणाला एवढीशी शिक्षा खूप कमी होईल. मूल्यहीन राजकारण करण्याची शक्ती पूर्ण खच्ची होणे हीच अशा राजकारण्यांना खरी शिक्षा असेल आणि ती देण्याइतके महाराष्ट्रातले मतदार नक्कीच सूज्ञ आहेत.

महिलांबाबतचा पवारांचा कळवळा जितका दिखाऊ तितकाच छत्रपतींच्या गादीबद्दलचा शिवसेनेचा आदरही दिखाऊ आहे, हेही याच आठवड्यातल्या त्यांच्या नेत्यांच्या मुक्ताफळांमुळे सिद्ध झाले आहे.

शिवसेनेच्या वाचाळ नेत्यांनी आपल्या बेताल वक्तव्यांतून छत्रपतींच्या गादीचा जो अपमान केला, तसाच अपमान काँग्रेसने त्यांचा राजकारणासाठी वापर करून केला, हा भाग मात्र फारसा लोकांसमोर येऊ न देण्यात काँग्रेसची नेतेमंडळी यशस्वी ठरली आहेत. राजकीय आव्हाने आपल्याला पेलवेनाशी झाली की, छत्रपतींची सोयीस्कर आठवण काढणे हा एका अर्थी महाराष्ट्रद्रोहच आहे आणि महाराष्ट्रातील मतदार हा द्रोह करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवतील, यात काही संशय नाही.

काही जिल्ह्यांपुरत्या मर्यादित झालेल्या दोन तथाकथित प्रादेशिक पक्षांची ही दुरवस्था असताना राष्ट्रीय पक्ष म्हणवल्या जाणाऱ्या काँग्रेसची राज्यातली अवस्था तर फारच बिकट आहे. त्यांच्याकडे खऱ्या अर्थाने कोणी नेताच उरलेला नाही. त्यामुळे प्रत्येकजण स्वतःलाच नेता मानू लागला आहे आणि त्यातून कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

या गोंधळलेल्या मन:स्थितीमुळेच ज्यांची विकासाची व्याख्या जेमतेम रुपयात पंधरा पैसे एवढी मर्यादित होती, शंभरातले अवघे पंधरा पैसे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू देणारा भ्रष्टाचार हाच ज्यांच्या कार्यकाळात शिष्टाचार होता, असा हा पक्ष वेगवान विकासाचे नवे मापदंड निर्माण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘विकासाचा हिशेब द्या’ म्हणून उद्दाम जाहिराती करू लागला आहे. त्यांच्या या उद्दामपणालाही त्याची खरी जागा मतदार मतपेटीतून दाखवून देतील, याची खात्री आहे.

(लेखक प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते आहेत.)

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन