शिवसेनेत फूट पडली ती काही महत्त्वाच्या कारणांनी पडलेली नाही. त्यांच्यात फारशी नाराजीही नव्हती, प्रश्न होता ‘ईडी’च्या कारवाईचा अन् आणखी काही मिळवण्याच्या लालसेनं! त्यामुळंच एकापाठोपाठ एकेक आमदार या फुटीर गटाला जोडला जाऊ लागला. जो राज्यमंत्री होता त्याला कॅबिनेट हवं होतं. जो कॅबिनेट होता त्याला आणखी मलईदार खातं हवं होतं, तर कुणाला पोलिसी कारवाईपासून संरक्षण हवं होतं. जे काही मंत्रिपदापासून वंचित राहिले होते, ज्यांना वगळण्यात आलं होतं, अशांचा असंतुष्टांचा हा मेळा जमला. त्यावेळी फुटिरांना सांगितलं गेलं, आश्वासन दिलं गेलं की, ‘आपलं’ सरकार बनेल आणि सगळ्यांना मंत्रिपदं मिळतील. अशा फुटिरांच्या म्होरक्याकडं मुख्यमंत्रिपद आलं.
या फुटिरांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंना मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. त्या उत्स्फूर्त प्रतिसादानं फुटीर आमदार-खासदार अस्वस्थ झालेत. आदित्य आपल्या भाषणांतून विचारतात, ‘आम्ही यांना काय दिलं नाही? जे जे शक्य होतं ते ते आम्ही त्यांना दिलं. रिक्षाचालकला, पानटपरीवाल्याला पदं दिली, आमदार, खासदार केलं, मंत्रिपद दिलं. आणखी काय हवं होतं? सारं काही यांनाच दिलं तर सामान्य शिवसैनिकांना काय द्यायचं?’ या त्यांच्या भाषणांतून अपेक्षित परिणाम साधला जात असल्याने या आमदारांमध्ये आपण फसले गेलोत असं वाटू लागलंय. इथं बच्चू कडू यांचं वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं ठरतं, ‘जितका मोठा दगाबाज, तितका मोठा नेता, सर्वात मोठा दगाबाज सगळ्यात मोठं मंत्रिपद हे आता महाराष्ट्राचं राजकारण ठरतेय...!’ यातून त्यांचं वैफल्य दिसून येतं. कारण कॅबिनेटच्या लोभानं ते आपलं राज्यमंत्रिपद गमावून बसलेत, आता त्यांना मंत्रिपद मिळेल की नाही, याची शाश्वती नाही. शिवसेनेनं या फुटिरांना परतण्याचं आवाहन केलंय. ‘मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत,’ असं आदित्य सांगताहेत. फुटिरांना पश्चाताप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शिवसेना हा एक कौटुंबिक पक्ष आहे. कुटुंबाचा पक्ष नाहीये! वारसा हक्कानं आलेले पक्षनेतृत्व आणि इथलं नेतृत्व यात फरक आहे. शिवसेना एका कुटुंबाप्रमाणे चालते. दिल्लीतल्या पत्रकारानं सांगितल्याप्रमाणे, दिल्लीत उद्धव ठाकरे यांच्याबरोबर रश्मी ठाकरे आल्या होत्या. त्यावेळी त्या पत्रकारानं रश्मी यांना विचारलं होतं, त्यावेळी ‘सरकार’ सिनेमा आला होता. सरकार सिनेमा हा ठाकरे परिवारावर आधारित असल्याचं म्हटलं जातंय हे कितपत खरं आहे? असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘मी या परिवारात सून म्हणून आलेय, तेव्हा मी येण्यापूर्वी इथं काय घडलं, याचे मी कसं सांगू?’ त्यावर ‘पण शेवट सांगू शकाल का?’ या प्रश्नावर हसून म्हणाल्या, ‘हो, आता जी परिस्थिती मी पाहतेय, त्यावरून काही सांगू शकेन!’ त्यावेळी त्यांनी एक घटना सांगितली, ‘ज्यावेळी छगन भुजबळ शिवसेना सोडून गेले, तेव्हा उद्धवच्या आई मीनाताई या अखंड रडत होत्या, दोन दिवस त्यांनी जेवणही घेतलं नव्हतं, कारण भुजबळांचं सारं कुटुंब हे ठाकरे कुटुंबाचाच एकभाग असल्यासारखं होत!’ मला आश्चर्य वाटलं, राजकीय पक्षात लोक येत-जात असतात. यात दुःख करण्याचं कारण काय? त्याचा असा कसा संवेदनशील परिणाम होऊ शकतो? मीनाताई यांच्या निधनानंतर रश्मीजींवर सारं घर, कुटुंब सांभाळायची जबाबदारी आली. दरम्यान, शिवसेनेचे मोहिते नावाचे एक खासदार शिवसेना सोडून गेले. रश्मीजींनी सांगितलं की, ‘मी त्यावेळी खूप रडले!’ त्यांना विचारलं की, ‘तुम्ही का रडलात?’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘त्या साऱ्या गोष्टी आठवताहेत, त्यांची पत्नी, मुलं घरी मातोश्रीवर येत असत, माझ्यासोबत किचनमध्ये स्वयंपाक करायला मदत करत असत. त्यांची मुलं आमच्या सोबत जेवण घेत, मला ती मुलं काकू म्हणत, आमचे कौटुंबिक संबंध होते. आता हे कुटुंब पक्ष सोडल्यानं पुन्हा मातोश्रीवर येणार नाही. भेटणारही नाही, मुलांशी असलेलं प्रेम, ओढा यापुढं कसा राहणार?’ शिवसेना ही अशाप्रकारे बांधली गेलेलीय. प्रत्येक नेत्यांशी असे कौटुंबिक संबंध ठाकरेंचे राहिलेले आहेत. म्हणून उद्धव यांच्या आईला शिवसैनिक माँसाहेब म्हणून संबोधत असत. त्यांनी मातृत्वाच्या भावनेनं साऱ्यांना जवळ केलेलं होतं. शिवसेनाप्रमुख एखाद्याला बोलायचे; पण तेही पितृत्वाच्या भावनेनं. शिवसेनाप्रमुखांचा अनेक नेत्यांशी वाद झाला; पण नंतर त्यांच्यात समेट घडला तो मीनाताईंच्यामुळं! अउद्धव ठाकरे यांचा मृदू स्वभाव, संयम, कार्यकुशलता, कुटुंबप्रमुखाप्रमाणे त्यांचं वागणं हे केवळ लोकांनाच भावलेलं नाही, तर सर्वोच्च न्यायालय, विविध संस्था, सरकारं यांनी त्यांना उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून गौरवलेलंय; मात्र ज्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून नाव, पैसा, अमाप संपत्ती असं खूप काही कमवलं अशांनीच उद्धव हे रुग्णालयात असताना शिवसेनेवर घाव घातला; पण रस्त्यावरच्या सामान्य शिवसैनिकाला, मराठी माणसाला हे आवडलेलं नाही ते शिवसेनेसोबत आहेत. उद्धव यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारताना मंत्रालयात अभूतपूर्व गर्दी झाली होती. त्यांनी राजीनामा दिला त्यावेळी, वर्षा बंगला सोडला त्यावेळीही लोकांनी परतीच्या मार्गावर दुतर्फा गर्दी केली होती. आदित्यच्या दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळतोय. म्हणूनच फुटिरांनी विधिमंडळ अधिवेशनात आदित्यला लक्ष्य केलं. भाजपला शिवसेनेला संपवायचं असल्यानं अधिवेशनकाळात शिवसेनेतल्या दोन्ही गटाला एकमेकाविरोधात उभं केलं होतं. यापुढं मुंबई महापालिका निवडणुकीत फुटिरांच्या खांद्यावरून शिवसेनेला लक्ष्य केलं जाणारंय. शिवसेनेला सहानुभूती मिळणार नाही याची दक्षता भाजप घेतेय; मात्र फुटिरांची अवस्था ना इकडचे ना तिकडचे, अशी होणारंय. कारण महाराष्ट्राची मानसिकता ही दलबदलूना साथ देणारी नाही. या ४० फुटिरांपैकी चार-पाच जण सोडले, तर इतरांचं राजकीय भवितव्य अंधारात आहे. फुटिरांच्या या करणीनं मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला धक्का बसू शकतो. आजवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेला काही परप्रांतीय मतं मिळत होती, तशी ती काँग्रेसलाही मिळत होती. आता मात्र ती भाजपकडं वळालीत. मारवाडी-गुजराती हे शिवसेनेसोबत होते. ती त्यांना संरक्षण देणारी होती. सुरक्षेच्या दृष्टीनं आश्वासक होती. आता त्यांना वाटतंय की, आमचा संरक्षक दिल्लीत बसलाय. तो सर्व सत्ताधीश असल्यानं आता शिवसेनेची गरजच काय! आजवर शिवसेनेचा मुख्य आधार राहिलाय तो मराठी मतदार, त्यातही प्रामुख्यानं कोकणातला विशेषतः तळ कोकणातला रत्नागिरी, सिंधुदुर्गातला! तिथलं राजकीय समीकरणं जसं बदलतं तसं इथलं बदलत जातं. हे जिल्हे कट्टर शिवसैनिकांचे. सिंधुदुर्गात भाजपच्या ताकदीनं नारायण राणे यांनी शिवसेनेच्या विरोधात कंबर कसलीय. केसरकरही तिथलेच, रत्नागिरीत उदय सामंत, रामदास कदम यांनी आवाज टाकलाय. त्यामुळं मुंबई महापालिका निवडणुकीत त्याचा परिणाम जाणवेल. शिवसेनेसाठी हे सारं त्रासदायक ठरणारं आहे; मात्र लोकसभा-विधानसभा निवडणुका भाजप, फुटिरांना अवघड जाणार आहे. तसा एक सर्व्हेही आलाय.शिवशाही, पेशवाई आणि मराठी माणूस याचा इतिहास मराठी माणसाच्या सतत डोळ्यासमोर असतो. जातीवादी उल्लेख करू नये; पण महाराष्ट्रात मराठा आणि ब्राम्हण समाजात कायम तेढ असते. इतिहासाच्या काळापासून दिल्लीपुढं नमायचं नाही, गुडघे टेकायचे नाहीत. हा शिवरायांचा स्वाभिमान आजवर मराठी नेत्यांनी जोपासलाय. शरद पवारांची दिल्लीत जी पीछेहाट झालीय ती दिल्लीकरांना मुजरा न केल्यानं! पण राज्यात फुटिरांचं आणि भाजपचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांना एका महिन्यात सात वेळा दिल्लीत लोटांगण घालायला जावं लागलंय, काही वेळा तासन्तास थांबूनही भेट मिळालेली नाही. नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि काही केंद्रीय मंत्र्यांचा एकत्रित फोटो काढण्यात आला. त्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेत उभं केलं होतं. हा त्यांना खरंतर अपमान वाटायला हवा होता. देशात सर्वाधिक महसूल देणाऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिलेली ही वागणूक महाराष्ट्राचा अपमान करणारी होती. शिवरायांना आग्राभेटीत दरबारात दुसऱ्या रांगेत उभं केलं म्हणून शिवराय तिथून नाराजी व्यक्त करत रागानं बाहेर पडले होते. हा इतिहास यानिमित्तानं राज्यात सांगितला जातोय. शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात शिवशाही अवतरली होती; पण शिवाजीराजांच्या निधनानंतर शिवशाहीवर हळूहळू पेशवाईनं ताबा मिळवला आणि पेशवाईचा कारभार मराठी माणसांना भोगावा लागला. या इतिहासाची जणू पुनरावृत्ती महाराष्ट्रात होताना दिसतेय. मुख्यमंत्रिपदावर मराठा समाजाच्या माणसाला बसवून त्याच्या हाती सत्तेची सारी सूत्रं दिली आहेत, असं भासवलं गेलं, तरी मात्र सत्तेची सारी सूत्रं ही पेशव्यांच्याच ताब्यात आहेत. मुख्यमंत्री हे केवळ ‘पपेट’ असल्याचं दिसून आलंय. कारण त्यांनीच घेतलेले अनेक निर्णय केवळ पेशव्यांसाठी बदललेत. त्यांच्या सोयीचे आणि त्यांच्या अजेंड्यावरचे विषय राबवले जाताहेत. हे सारं कशाचं लक्षण आहे?