शिक्षणनामा
रमेश बिजेकर
समाजातील जातरचनेचा मोठा परिणाम देशातील शिक्षण क्षेत्रावर झाला आहे. त्यामुळे गावापासून मोठ्या शहरांपर्यंत आंतरराष्ट्रीय शाळा निर्माण झाल्या आहेत. या शाळात सुविधांची तफावत मोठी आहे.
स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षाच्या शिक्षण प्रवासात जातवर्गीय दृष्टिकोन प्रभावी राहिला आहे. वसाहतीच्या काळातच हा दृष्टिकोन स्वीकारला गेला. मेकॉलेचा वर्गीय दृष्टिकोन आणि उच्च जातींचा ब्राह्मणी दृष्टिकोन याचा समन्वय स्वातंत्र्यापूर्वीच झाला होता. स्वातंत्र्यानंतर तो विकसित होऊन जातवर्गीय एकात्म दृष्टिकोन बनला. भारतातील भांडवलदार वर्ग वैश्य जातींमधून उदयाला आला. बनिया जातींची भांडवलदारी टिकवण्यासाठी त्यांना जातीव्यवस्था टिकवणे गरजेचे होते. बदलत्या औद्योगिक उत्पादन संबंधात जाती संबंध टिकवणे उच्च जातींची गरज होती. हे दोन्हीं उत्पादन संबंध व हितसंबंध परस्पर हितसंबधी बनले. बहुस्तरीय व बहुपदरी समाजरचनेत सामाजिक व भौतिक विषमता बहुस्तरीय बनली. बहुस्तरीय भौतिक शोषणाला अधिमान्यता मिळवण्यासाठी सांस्कृतिक व शैक्षणिक रचना उभी करण्यात आली. त्यासाठी भेदत्व आणि एकत्व असे दुहेरी सूत्र जातवर्गीय व्यवस्थेने वापरले. जातवर्ग म्हणून भेदत्व आणि धर्म म्हणून एकत्व अशी रचना आकाराला आणली. जाती - जातीत व उच्च - निम्न वर्गात भेदत्व अस्तित्वात आले आहे. या रचनेचा प्रभाव शिक्षण व्यवस्थेवर झाला आहे.
बहुस्तरिय शाळा, महाविद्यालयाची रचना हे भेदत्व आणि ब्राह्मणीभांडवली लिंगभावी शिक्षण आशय हे एकत्व अशी शिक्षण व्यवस्था आकाराला आली आहे. ग्रामपंचायती पासुन ते आंतरराष्ट्रीय शाळांपर्यंत शाळा अस्तित्वात आल्या आहेत. या शाळांचा केवळ आस्थापनांचा हा प्रश्न नाही, तर सामाजिक, आर्थिक स्तरीकरणाचा प्रश्न आहे. या शाळांमधील भौतिक सुविधा व सामाजिक स्तरांत टोकाची भिन्नता आहे. गरीबीरेषेखालील, गरीब, निम्न वर्गीय, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय व उच्चवर्गीय असे आर्थिक सामाजिक स्तर आकाराला आले आहे. सामाजिक स्तराप्रमाणे शाळांचे स्तर आकाराला आले. आंतरराष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय समकक्ष, केंद्रिय विद्यालय (भारत सरकारच्या शाळा), राज्य सरकारच्या व खाजगी शाळा अस्तित्वात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय व केंद्रिय शाळांमध्ये जाणारा विद्यार्थी वर्ग उच्चजातवर्गीय आहे. भारत सरकाच्या शाळांमध्ये केंद्रिय विद्यालय, नवोदय विद्यालय, पीएमश्री विद्यालय असे स्तरिकरण आहे. एकुण केंद्रिय शाळा १०.२२ लाख आहेत. यापैकी २ टक्के विद्यार्थी केंद्रीय, नवोदय व पीएमश्री शाळेत शिकतात. निरज जैन यांनी मोदी काळांतील १० वर्षाच्या बजेटचा लेखाजोखा त्यांच्या पुस्तकात मांडला आहे. त्यांच्या अभ्यासातून केंद्रिय शाळांच्या निधर वितरणात तफावत असल्याचे स्पष्ट केले आहे. भारत सरकारच्या एकुण शालेय शिक्षण अर्थसंकल्पापैकी केंद्रिय शाळातील (उच्च जातवर्गीय विद्यार्थ्यांसाठी) २ टक्के विद्यार्थ्यांसाठी २९ टक्के आणि ९८ टक्के विद्यार्थ्यांसाठी ७१ टक्के खर्च केला जातो. भारत सरकारचे उच्च पदस्थ अधिकारी ते चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांची मुले या शाळांमध्ये शिकतात. या प्रचंड तफावतीत केंद्रिय उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपासून ते चतुर्थ श्रेणी कर्मचा-यापर्यंत विद्यार्थ्यांचा आर्थिक वाटा भिन्न आहे. प्रशासकिय स्तरावर जाती उतरंड दिसुन येते. उच्च पदस्थ अधिकारी ते चतुर्थ श्रेणी कर्मचा-याचे जात वास्तव लक्षात घेतल्यास जातीनिहाय आर्थिक वाटा कसा निश्चित होतो हे लक्षात येते. ही भिन्नता उच्चजातवर्गीय व कनिष्ठ जातवर्गीय इथपर्यंत मर्यादित नाही, तर वर्गांतंर्गत भिन्नताही दिसुन येते. उच्चवर्गीय विद्यार्थ्यांचे केंद्रिय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि पीएमश्री शाळा यांच्या आर्थिक तरतुदीत भिन्नता आहे. या तिन्ही शाळांतील विद्यार्थी समान आर्थिक लाभार्थी नाहीत. भारतातील वर्ग एकजिनसी नसल्याचे हे प्रतिक आहे. जातीप्रभूत्वातून वर्ग अस्तित्वात आल्यामुळे भारतातील वर्ग एकजिनसी नाहीत हे स्पष्ट होते. शाळांच्या स्तरिकरणातून जातवास्तवाची उकल आणि वर्गातील आंतरद्वंद उघड होतो. भारत सरकारचे शिक्षण धोरण एकात्म जातवर्गीय आहे हा निष्कर्ष यातून काढू शकतो.
शिक्षण हक्क कायद्यात दुर्बल व वंचीत घटकांसाठी २५ टक्के आरक्षणाची तरतुद केली. ती अमान्य करुन त्या विरोधात खाजगी शाळांचे व्यवस्थापन न्यायालयात गेले होते. २५ टक्के आरक्षणामुळे आमच्या शाळेची गुणवत्ता घसरेल व ही मुले शाळेत समायोजन करु शकणार नाहीत अशी भूमिका त्यांनी घेतली होती. हजारो वर्षापासुन गुणवत्तेची व्याख्या वर्ण व जाती आधारावर ठरत आलेली आहे. एकलव्य कितीही गुणवान असला तरी त्याचा आंगठा कापुन त्याला गुणवत्तहीन ठरवला गेला. ही नेणीव आजही काम करते. शोषक आणि शोषीतांची संस्कृती भिन्न असते. ती कधी, परस्पर विरोधीही असते. त्या एकमेकांशी समायोजन करु शकत नाहीत, एकमेकांशी संघर्ष करुन नव्या संस्कृतीकडे जावु शकतात. यालाच अभिसरणाची प्रक्रिया म्हणतात. त्यात विरोध आणि मैत्री या दोन्हींचा संयोग असतो. जाती समर्थनाचा दृष्टिकोन अशा अभिसरणाला संमती देत नाही. न्यायालयात या मंडळींनी खुलेपणाने आर्थिक प्रश्न उभा केला नाही. परंतू तो त्यात अंतर्भूत होता. सरकार जेवढी फी प्रतिपुर्ती करणार होती त्यापेक्षा अधिक फी या शाळा आकारत होत्या. त्यामुळे आर्थिक लुटीची चिंता त्यांना होती.
ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हापरिषद, खाजगी अनुदानित, आश्रम शाळा, स्वंय अर्थसहाय्यीत, खाजगी व सरकारी शाळा महाराष्ट्रात आहेत. गरिबी रेषेखालील ते उच्च वर्गातील विद्यार्थी यात विभागले जातात. या शाळांमधील सोयी व सामाजिक स्तर भिन्न आहेत. स्वातंत्र्यापासुन आजतागायत ही रचना कार्यरत आहे. या विद्यार्थांचा समान हक्क मान्य करुन समान शाळा पध्दतीचा पुरस्कार केला नाही, तर जातवर्गीय रचनेचा पुरस्कार करुन, खाजगीकरण, बाजारिकरणाचे धोरण स्विकारले. सरकारी शाळांची कोंडी केली. डबघाईस आणली आता त्या मरनासन्न अवस्थेला पोहोचल्या आहेत. गरिबी रेषेखालील, गरीब व निम्न वर्गीयांसाठी नगर पालिका, जिल्हापरिषद महानगरपलिका व अनुदानित शाळा आणि मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय व उच्चवर्गीयांसाठी स्तरानुसार खाजगी शाळा, आंतरराष्ट्रीय शाळांची व्यवस्था अस्तित्वात आली आहे. वर्ग एकजिनसी नसल्यामुळे खाजगी शाळाही एकस्तरिय आकाराल्या आल्या नाहीत. ग्रामीण, शहरी झोपडपट्टी, मजुर, हॉकर्स इत्यादी घटकातील जात वास्तव निम्न व मध्यम जातींचे आहे. खाजगी विविध स्तरातील शाळा रचना भेदत्व प्रतिबिंबित करते. शिक्षण आशयात मात्र एकत्वाची भूमिका घेते. जातवर्गीय लिंगभावी शिक्षण आशयाचा पुरस्कार सरकारी व खाजगी शाळांमध्ये केला जातो. भाषा, मूल्य शिक्षण, सामाजिक शास्त्र, प्रतिके, वर्गखोलीत बसण्याची रचना, अभ्यासक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, शिक्षकांची विचारसरणी व संस्कृती, विद्यार्थ्याची सामाजिक पार्श्वभूमी व अभिसरण या सर्व घटकाच्या एकत्रिकरणातून शिक्षण आशय आकार घेतो. बोली भाषेला हद्दपार करुन शिक्षणात अभिजनांची (जातवर्गीय प्रभूत्व) भाषा स्वीकारली गेली आहे. ब्राह्मणी (जात प्रभूत्व) प्रभूत्वाची राज्यभाषा आणि आंतरराष्ट्रीय (वर्गीय प्रभूत्व) इंग्रजी भाषेचा पुरस्कार केला जात आहे. मूल्य शिक्षणात धार्मिक व परंपरावादी मूल्य संस्कृतीचे धडे दिले जातात. वैज्ञानिक दृष्टिकोन, स्त्री-पुरुष समानता, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय इत्यादी मुल्यांची रुजवणूक झालेली नाही. प्रतिकांतून नेणीव घडवली जाते. शिक्षणात जातवर्गीय सामाजिक, राजकीय, धार्मिक, पितृभावी प्रतिकांचा पुरस्कार केला जात आहे. संशोधक, व्यवस्था परिवर्तकांची प्रतिके अपवादाने सापडतात. शिक्षकांच्या विचार व संस्कृतीचा प्रभाव विद्यार्थ्यांवर पडतो. बहुसंख्य शिक्षक पारंपारिक असतात. प्रचलित व्यवस्थेशी समायोजन करुन जगत असतात. त्यामुळे जाणते - अजाणते ते जातवर्ग पितृसत्ताक व्यवस्थेचे समर्थक असतात. राहणीमान भांडवली व नितीमूल्य ब्राह्मणी याचा संयोग त्यांच्या विचारसरणी व संस्कृतीत झालेला असतो.
rameshbijekar2@gmail.com