संपादकीय

राजस्थानमधील सत्तासंघर्ष काँग्रेसच्या मुळावर

पायलट यांची कृती पाहिल्यानंतर काँग्रेस पक्षात दाखवले जाते तसे सगळे काही आलबेल नसल्याचेच चित्र समोर येत आहे

विजय चोरमारे

राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकांना अवघे आठ महिने उरले असताना पक्षाचे नेते सचिन पायलट यांनी आपल्याच सरकारविरोधात केलेले उपोषण म्हणजे काँग्रेससाठी जुन्याच दुखण्याने पुन्हा डोके वर काढण्यासारखे आहे. राजस्थानमध्ये सत्तेवर आल्यापासून सुरू झालेले हे दुखणे थांबणार आहे की, राज्यातील सत्ता घालवूनच ते शांत होणार आहे, याचे उत्तर काळच देणार आहे. एकूण पायलट यांची कृती पाहिल्यानंतर काँग्रेस पक्षात दाखवले जाते तसे सगळे काही आलबेल नसल्याचेच चित्र समोर येत आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी पायलट यांचे असलेले मतभेद वारंवार समोर आले असून यावेळी पायलट यांनी ते नव्या मुद्द्यांसह ऐरणीवर आणले आहेत. राजस्थानमध्ये भाजपच्या राजवटीवेळी वसुंधरा राजे यांच्या काळात झालेल्या घोटाळ्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी सचिन पायलट आपल्याच पक्षाच्या अशोक गेहलोत सरकार विरोधात उपोषणास बसले होते. पायलट हे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. राहुल गांधी यांनी वायनाडचा दौरा ठेवला होता, त्याच दिवशी सचिन पायलट यांनी उपोषण करणे हा निव्वळ योगायोग होता की ठरवून तारीख निश्चित करण्यात आली होती, याचा शोध घेतला तर अंतर्गत राजकारणाचे अनेक पापुद्रे उलगडले जातील. पायलट यांनी वसुंधरा राजे सरकारवर ४५ हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. अशोक गेहलोत यांनी सत्तेवर आल्यानंतर त्याची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु सव्वा चार वर्षे उलटून गेली तरी सरकारने कोणतीही कारवाई केली नाही, असा पायलट यांचा आरोप आहे. याचाच अर्थ एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न पायलट यांनी केला आहे. विरोधी भाजपला त्यांनी घायाळ केलेच आहे, परंतु त्याचवेळी अशोक गेहलोत यांची डोकेदुखी वाढवली.

काही महिन्यांपूर्वी पायलट यांच्या एका प्रचार मोहिमेवरून पायलट-गेहलोत संघर्ष पेटला होता. कोणत्याही नेत्याने पक्षाच्या प्रचारासाठी किंवा संघटना बांधणीसाठी प्रचार मोहीम राबवण्यामध्ये काही गैर नाही. परंतु पक्षशिस्त नावाची काही एक गोष्ट असते आणि त्या चौकटीतच नेत्याने वर्तन करावयाचे असते. परंतु पायलट यांनी आपली प्रचारमोहीम पक्षनेतृत्वाशी विचार विनिमय न करता जाहीर केल्यामुळे त्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. सरकारच्या विरोधातील एखाद्या प्रश्नावर सरकारमधील नेत्याने सावधपणे भूमिका घ्यावयाची असते आणि सरकारची बाजू लढवायची असते. परंतु त्याही संकेताचा भंग करून सचिन पायलट यांनी मधल्या काळात शिक्षकांच्या सामान्य ज्ञान परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला होता. कधी प्रश्नपत्रिका फुटतात, कधी परीक्षा रद्द होतात हे सगळे वेदनादायी आणि त्रासदायक आहे. मुलांना आणि त्यांच्या पालकांना त्यावरून होणा-या त्रासाची कल्पना करता येत नाही, अशा शब्दात पायलट यांनी सरकारला आणि मुख्यमंत्री अशोक गेलहोत यांना लक्ष्य केले होते.

राजकीय निरीक्षकांकडून पायलट यांच्या प्रचार दौ-याचे अनेक अर्थ काढले जात असताना पायलट यांचे समर्थक मात्र त्यांचा हा दौरा पक्षाच्या मजबुतीसाठी असल्याचा दावा करीत होते. पायलट यांनी या दौ-यात राज्यातील जाट आणि शेतकरीबहुल प्रदेशावर लक्ष केंद्रित केले होते. राजस्थानच्या राजकारणाचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे दर पाच वर्षांनी सत्तांतराची परंपरा होती. परंतु ही परंपरा तोडून गेल्यावेळी काँग्रेसने सलग दुस-यांदा सत्ता मिळवली होती आणि आता तिस-यांदा सत्ता मिळवण्याचे स्वप्न पाहिले जात आहे. पक्षातील दोन प्रमुख नेत्यांमधील संघर्ष संपण्याची चिन्हे दिसत नसताना तिथे कशी काय सत्ता मिळणार, असा सामान्य काँग्रेसजनांपुढील प्रश्न आहे. कारण पायलट आणि गेहलोत यांच्यातील वाद मिटवण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने अनेकदा प्रयत्न केले, परंतु त्यात त्यांना यश आले नाही. पक्षनेतृत्वाने दिलेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द पाळावा, यासाठी पायलट प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आणि पायलट यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंत न पोहोचू देण्यासाठी गेहलोत राजकीय डावपेच खेळतात. याचा फटका पक्षसंघटनेला बसताना दिसतो.

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका सुरू असताना आणि राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राजस्थानात येण्याच्या तोंडावर मुख्यमंत्री गेहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली होती. `एक गद्दार कधीही मुख्यमंत्री बनू शकत नाही. ज्याने पक्षाविरुद्ध बंड केले, पक्षाला धोका दिला त्याला पक्षश्रेष्ठी कधीही मुख्यमंत्रीपदी बसवणार नाहीत.` अशा शब्दात त्यांनी पायलट यांच्यावर हल्ला केला होता. भारत जोडो यात्रा मध्यप्रदेशात असताना सचिन पायलट यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबतचा फोटो ट्विट केला होता, त्याचवेळी गेहलोत यांनी पायलट यांच्यावर टीका केली होती. अनुभवी नेते असलेल्या गेहलोत यांच्याकडून प्रगल्भ वर्तनाची अपेक्षा असताना एखाद्या उथळ नेत्यासारखी त्यांनी आपला संताप व्यक्त केला होता. त्यावेळी सचिन पायलट मात्र आपल्यावरील तीव्र हल्ल्यानंतरही शांत राहून पक्षनेतृत्वाच्या सूचनेचे पालन करताना दिसत होते. गेहलोत आणि पायलट यांच्यातील हा सत्तासंघर्ष कोणत्या वळणाने जाणार आणि त्याचा शेवट कशामध्ये होणार आहे, याचा अंदाज आजदेखील कुणाला बांधणे कठीण आहे. राजस्थान विधानसभेच्या २०१८च्या निवडणूक काळात काँग्रेस नेतृत्वाने सचिन पायलट यांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता. परंतु गेहलोत यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या आग्रहामुळे नेतृत्वाला माघार घ्यावी लागली आणि सचिन पायलट यांची समजूत काढून त्यांना काही दिवस थांबण्यास सांगण्यात आले. एकीकडे हे होत असताना दुसरीकडे मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंदिया यांनी भाजपशी संगनमत करून तेथील काँग्रेसचे सरकार सत्तेवरून खाली खेचले होते. त्याचवेळी सचिन पायलट हेही सिंदिया यांच्या मार्गाने जाणार असल्याची चर्चा होती. २०२० मध्ये पायलट यांनी बंड करून तो अंदाज खरा ठरवला होता. आपल्या समर्थक १९ आमदारांना घेऊन ते दिल्लीजवळील एका पंचतारांकित रिसॉर्टमध्ये थांबले होते.

पक्षनेतृत्वाशी चर्चा झाल्यानंतर माघार घेऊन त्यावेळी ते पुन्हा सत्तेत सहभागी झाले होते. त्या बंडाची खोलवर जखम गेहलोत यांच्या मनावर झाली असून त्यांनी ती वेळोवेळी उघड केली आहे. बंड केले तेव्हा पायलट हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. पक्षाच्या अध्यक्षाने पक्षाचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करण्याचे हे देशातील एकमेव उदाहरण असावे, असे गेहलोत म्हणतात ते त्यामुळेच. गेहलोत यांनी त्यापुढे जाऊन, पायलट यांच्या बंडाला भारतीय जनता पक्षाने अर्थपुरवठा केल्याचा तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते त्यात सहभागी असल्याचाही आरोप केला होता. अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार निश्चित झाले तेव्हा आपण राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदीही राहणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. परंतु एक व्यक्ती एक पद या धोरणानुसार गेहलोत यांना मुख्यमंत्रीपदावर राहता येणार नसल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. त्यानंतर मग गेहलोत यांनी सचिन पायलट यांचे नाव मुख्यमंत्रिपदी येऊ नये, यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. काँग्रेस अध्यक्षपदाकडे पाठ फिरवून राजस्थानचे मुख्यमंत्रिपद कवटाळणारे गेहलोत आजही त्याच आटोकाट प्रयत्नात आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये तरुण नेतृत्वाला संधी नाही,असा एक संदेश जातो आहे आणि तो काँग्रेससाठी देशपातळीवर नुकसानकारक ठरणारा आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?