संपादकीय

जैन तत्त्वज्ञानाचे योगदान

समाजाच्या ऐतिहासिक विकासक्रमात ज्ञानाची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. वेदांतिक (ब्राह्मणी) परंपरेच्या पारलौकिक तत्त्वज्ञानास जैन व बौद्ध तत्त्वज्ञानांनी तर्कशुद्ध विचारसरणीने आव्हान दिले. जैन तत्त्वज्ञानाने अनेकांतवाद व सर्वजीववादाच्या माध्यमातून समता, अहिंसा आणि न्याय यांसारख्या मूलभूत संकल्पनांचा पुरस्कार केला.

नवशक्ती Web Desk

शिक्षणनामा

रमेश बिजेकर

समाजाच्या ऐतिहासिक विकासक्रमात ज्ञानाची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. वेदांतिक (ब्राह्मणी) परंपरेच्या पारलौकिक तत्त्वज्ञानास जैन व बौद्ध तत्त्वज्ञानांनी तर्कशुद्ध विचारसरणीने आव्हान दिले. जैन तत्त्वज्ञानाने अनेकांतवाद व सर्वजीववादाच्या माध्यमातून समता, अहिंसा आणि न्याय यांसारख्या मूलभूत संकल्पनांचा पुरस्कार केला. वर्णव्यवस्थेवर आधारित विषमता नाकारत, जैन शिक्षण पद्धतीने समान शिक्षणाचा प्रसार केला. लोकभाषेतील शिक्षण व तर्काधारित अध्यापन पद्धतीचा पुरस्कार हा जैन ज्ञान परंपरेचा वैशिष्ट्यपूर्ण पैलू राहिला.

ढोबळमानाने स्त्रीसत्ताक-मातृसत्ताक-त्रैवर्ण-चातुर्वर्ण असा समाजविकासाचा क्रम राहिला आहे. या प्रत्येक टप्प्यातील परिवर्तनात ज्ञानाची भूमिका मध्यवर्ती राहिल्याचे इतिहास आपल्याला सांगतो. स्त्रीसत्ताक व मातृसत्ताक काळातील तंत्र व सांख्य (अब्राह्मणी) तत्त्वज्ञानातून स्वातंत्र्य, समता, लोकशाही हे मूल्य व संस्कृती समाज व्यवस्थेचा भाग बनली. सामूहिक उत्पादन व समान वितरण हा मुख्य गाभा स्त्रीसत्ताक-मातृसत्ताक समाज व्यवस्थेचा होता. अतिरिक्त उत्पादन या समाजात होत नव्हते. अतिरिक्त उत्पादनाची उणीव चातुर्वर्ण व्यवस्थेने भरून काढली असली, तरी स्तरीकरणाची समाज रचना चातुर्वर्ण व्यवस्थेत अस्तित्वात आली. स्वातंत्र्य, समता, लोकशाही ही मूल्ये व भौतिक समता क्रमाक्रमाने नष्ट झाली. स्वामी-दास संबंध अस्तित्वात येऊन गुलामगिरी प्रथेपर्यंत सामाजिक रचना लयाला गेली. वेदांत (उत्तर मीमांसा) (ब्राह्मणी) तत्त्वज्ञान वर्णव्यवस्थेचा तात्त्विक आधार होता. चातुर्वर्ण व्यवस्थेत खासगी मालमत्ता व पुरुषप्रधान कुटुंब व्यवस्था अस्तित्वात आली. खासगी मालमत्तेच्या उदयामुळे टोकाची शोषण व्यवस्था अस्तित्वात आली. ही व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी वेदांतिक तत्त्वज्ञानांनी परलोकवादी माया उभी केली. इहलोकाला नश्वर ठरवले. भौतिक विश्व, त्यातून होणारे उत्पादन व विषम वितरण नश्वर ठरवून मोक्ष प्राप्ती हेच मानवी जीवनाचे सर्वश्रेष्ठ ध्येय, व्यक्तीचे व समाजाचे असल्याचे पुढे आणले. पुनर्जन्माच्या संकल्पनेतून या जन्माचे सुख-दु:ख, शोषण याची कारणमीमांसा मागच्या जन्माच्या पाप-पुण्याशी अवास्तविकपणे जोडली गेली. ही मोक्ष प्राप्तीची ज्ञानपरंपरा रुजवण्यासाठी उत्पादक ज्ञानाला ज्ञान म्हणून नाकारण्यात आले. परिणामी ब्राह्मणी ज्ञान परंपरा मुख्य प्रवाहाची ज्ञान परंपरा बनली.

योगदान-उणिवांच्या एकजुटीतून आंतरद्वंद जन्माला येतात. त्यातून प्रचलित व्यवस्थेला नकार देऊन नव्या व्यवस्थेचे दर्शन मांडल्या जाते. वर्ण व्यवस्थेला नाकारणारी जैन व बौद्ध तत्त्वज्ञाने याच सूत्रानुसार उदयाला आलीत. तंत्र व सांख्य (अब्राह्मणी) तत्त्वज्ञानाशी संघर्ष होऊन (वेदांत) उत्तर मीमांसा (ब्राह्मणी) ज्ञान परंपरा उदयाला आली. या वेदांतिक अद्वैत, पारलौकिक ज्ञान परंपरेला जैन व बौद्ध परंपरेने आव्हान उभे केले. जैन परंपरेने अनेकांत सर्वजीववादी तत्त्वज्ञानातून आत्मा व परलोकवाद नाकारला. (राजर्षीसत्ताक) वर्ण व्यवस्थेत परब्रह्म (पारलौकिक) विचारसरणीचा प्रभाव होता. कर्मकांड या व्यवस्थेचे वैशिष्ट्य होते. या अनुत्पादक व विषमतेवर आधारित व्यवस्थेला जैन पंरपरेने अनेकांत सर्वजीववादाने खंडन केले. शरद पाटील म्हणतात... जैन तत्त्वज्ञान विश्वातील सर्व वस्तूंचे जीव व अजीव या दोन प्रकारात वर्गीकरण करतात... त्यांच्या या मूळ द्वैतवादी बैठकीत ते अजूनही सांख्याचे अपत्य आहे. हिरालाल जैन यांच्या मते, अनेकांतवादी जैन तत्त्वज्ञानाची पुढीलप्रमाणे दोन कारणे आहेत. १) नित्य व अनंत जीव, ज्यांनी हे चेतन व अचेतन भरले आहे. २) स्यादवाद नावाचे त्यांचे एकमेवाद्वितीय तर्कशास्त्र. यातून असा निष्कर्ष काढता येऊ शकतो, की जैन तत्त्वज्ञान केवळ माणसांचाच विचार करत नव्हते, तर चराचर विश्वाचा विचार करत होते. असे असले तरी चराचर विश्वाचा विचार करण्यास माणूस केंद्रवर्ती मानत होते. स्वाभाविकपणे निसर्ग-मानव, मानव-मानव यांचे सहसंबंध समजून घेण्यासाठी तर्क वापराची शिकवण जैन तत्त्वज्ञान देते. सर्वांना जगण्याचा अधिकार आहे हे तत्त्व ज्याप्रमाणे हिंसा नाकारते, त्याचप्रमाणे माणसाची गुलामगिरीही नाकारते. स्वामी-दास संबंध नाकारणे अनेकांतवाद तत्त्वज्ञानात अध्यारुत आहे. यातून जैन ज्ञान परंपरा निरीश्वरवादी, निसर्ग नियम व समतेचा पुरस्कार करणारी होती, असा निष्कर्ष काढू शकतो. या ज्ञान परंपरेचा प्रसार करण्यासाठी श्रमण व भिक्षु संघाची स्थापना तीर्थंकरांनी केली.

जैन ज्ञान परंपरेच्या उदयानंतर शिक्षण व्यवस्थेत काही बदल झाला का, हे पाहण्यासाठी जैन परंपरेचे सिद्धांत आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न केला. जैन ज्ञान परंपरेचा प्रसार दोन पातळ्यांवर होत होता. एक धार्मिक प्रसार व दोन औपचारिक शिक्षण. आपण औपचारिक शिक्षणाबद्दल जाणून घेणार आहोत. गुरुकुल शिक्षण पद्धतीपेक्षा जैन शिक्षण पद्धती वेगळी होती. सार्वत्रिक शिक्षण व मुक्तीदायी शिक्षण आशयाची भूमिका, जैन शिक्षण पद्धतीचा मुख्य आधार होता. वर्ण-जाती, श्रेष्ठ-कनिष्ठ, स्त्री-पुरुष असा भेद न करता प्रवेश दिला जात होता. व्यक्ती व समाजाची मुक्ती हे उद्दिष्ट शिक्षणाचे होते. मुक्तीदायी शिक्षण आशय व शिक्षण सर्वांसाठी खुले असणे हे प्रमुख वैशिष्ट्य या ज्ञान परंपरेचे होते. शिक्षणासाठी स्वतंत्र केंद्रे अस्तित्वात आली होती. शिक्षण केंद्राला चैतालय व जैनालय म्हणत असत. पुढे-पुढे या केंद्रांचा विस्तार झाला. राजा, धनाढ्य व्यक्ती ही केंद्रे बांधून देऊ लागले. बांधून देणाऱ्याच्या नावानेही हे केंद्रे ओळखली जाऊ लागली. या केंद्रांमध्ये किंवा आचार्यांच्या घरी विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात होते. शिक्षकांना तम्माडी, उपाध्याय, गुरुवादी आचार्य ही संबोधने होती. ही संबोधने त्यांनी संपादन केलेल्या ज्ञानाशी व समर्पनाशी संबंधित होती. आर्ट आणि सायन्स शिकवणाऱ्या शिक्षकांना कलाचार्य, आर्ट आणि आर्किटेक्चर शिक्षकाला शिल्पाचार्य व धार्मिक शिक्षण देणाऱ्यांना धर्माचार्य संबोधित असत. आचार्य-विद्यार्थ्यांचे जैविक नाते होते. या नात्याची एक वैशिष्ट्यपूर्ण नोंद डॉ. अरुण कुमारांनी त्यांच्या संशोधनात घेतली आहे. त्यांच्या मते विद्यार्थी चुकल्यास शिक्षक नाराज होत, अशावेळी विद्यार्थ्यांना स्वत:च्या चुकीची जाणीव (आत्मचिंतन) स्वत: करावी लागे व शिक्षकांना अशी चूक पुन्हा न करण्याची कबुली विद्यार्थ्यांना द्यावी लागे. अहिंसेच्या तत्त्वामुळे विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक शिक्षा निषिद्ध होती.

वयाची पाच वर्षं पूर्ण किंवा त्याहून अधिक वयाच्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जात होता. वर्ण व्यवस्थेतील उतरंडीचा नियम इथे लागू नव्हता. स्त्रियांनाही प्रवेश होता. लोकभाषेत शिक्षण देणे हे या शाळांचे वैशिष्ट्य होते. शिक्षण अभिजनासाठी बंदिस्त नसल्यामुळे लोकभाषेचा पुरस्कार शिक्षणात केला गेला होता. भाषा माध्यमाचा प्रश्न प्रस्थापितांच्या हितसंबंधाच्या चौकटीत काम करत आलेला आहे. मोजक्यांचे हितसंबंध की, सर्वांचे हितसंबंध हा प्रश्न महत्त्वाचा असतो. जैन परंपरेने माध्यम भाषेची घेतलेली भूमिका सर्वांच्या हितसंबंधाची व न्याय्य होती.

जैन शिक्षण पद्धतीतील शिक्षण आशय धार्मिक समावेशक व मूलभूत ज्ञान शाखांच्या अभ्यासावर भर देणारी होती. जैन शिक्षण पद्धतीच्या वेगवेगळ्या टप्प्यात अभ्यासकांनी वेगवेगळी अनुमाने मांडली आहेत. त्यात प्रमुख बाब म्हणजे, जैन धर्मासह इतर धर्माचा अभ्यास शिकवला जात होता ही आहे. प्राचीन, मध्ययुगीन व अर्वाचीन काळतील संदर्भात काही बदल लक्षात घेऊनच निष्कर्ष काढणे योग्य ठरेल; मात्र अभ्यासकात पुढील बाबींवर एकमत आढळते. निघंटु, अलंकार, आयुर्वेद, तारका, सिद्धांत, व्याकरण हे विषय शिकवले जात होते. विज्ञान, गणित, विधी (Law) व्याकरण, राजकारण, गृहनिर्माण, अर्थशास्त्र, या मूलभूत ज्ञान शाखांचा व संगीत, नृत्य, नाट्य, शिल्प या कला शाखांचा सहभाग शिक्षण आशयामध्ये केला गेलेला होता. जैन अध्यापन पद्धती पाठांतरावर आधारित नव्हती, तर तर्काधिष्ठित होती. विचारशक्तीला प्रोत्साहित करणारी होती. अध्यापन पद्धतीत वाचन, वादविवाद, प्रश्नोत्तरे, संवाद, चर्चा यांचा सहभाग असायचा. जैन ज्ञान परंपरेच्या उदयानंतर गुरुकुल शिक्षण पद्धतीला प्राचीन इतिहासात प्रथमत: जैन शिक्षण पद्धतीने मूलगामी आव्हान उभे केले.

जनतेचा शिक्षण जाहीरनामा, शिक्षण बचाव समन्वय समिती, महाराष्ट्र.

ramesh bijekar@gmail.com

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्यातील बहुतांश जिल्ह्यात २५ जुलैपर्यंत जोरदार पाऊस

१२ निरपराधांचा सगळा उमेदीचा काळ जेलमध्ये गेला, महाराष्ट्र ATS च्या 'त्या' अधिकाऱ्यांवर सरकार कारवाई करणार का? - ओवैसी

2006 Mumbai Local Train Blasts: मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता, HC चा निकाल

“महाराष्ट्रात वाईट अनुभव'' ED च्या कारभारावर सर्वोच्च न्यायालयाचा संताप; सरन्यायाधीश म्हणाले, ''तोंड उघडायला लावू नका''

राज्यात पोलिसांविरोधातील तक्रारींमध्ये वाढ; सहा महिन्यांत ४८७ तक्रारी, केवळ ४५ प्रकरणांचा निकाल