संपादकीय

नृत्यविदूषीचा सन्मान

संध्या पुरेचा या केवळ भरतनाट्यम नृत्यांगना नाहीत, तर त्या नृत्यविदूषी, नृत्य संरचनाकार आहेत.

प्रा. डॅा.प्रकाश खांडगे

भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागातील शिखर संस्था असलेल्या संगीत नाटक अकादमीवर डॉ. संध्या पुरेचा यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली आहे. त्यांच्या या नेमणुकीने केवळ महाराष्ट्रातील नव्हेच, तर संपूर्ण भारतातील कलाक्षेत्रातील मान्यवरांनी आनंद व्यक्त केला. संध्या पुरेचा या केवळ भरतनाट्यम नृत्यांगना नाहीत, तर त्या नृत्यविदूषी, नृत्य संरचनाकार आहेत. तसेच त्या शास्त्रीय नृत्याच्या संदर्भात मौलिक ग्रंथनिर्मिती करणाऱ्या संशोधक, अभ्यासकदेखील आहेत.

नाट्यशास्त्राच्या पठडीतून भरतनाट्यमचे सिद्धांत आणि प्रत्यक्ष नृत्य अंगिक अभियानाच्या दृष्टीने सखोल चिंतन करीत त्यांनी डॉक्टरेट ही पदवी संपादन केली. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूर यांच्याशी संलग्न असणाऱ्या भरत कॉलेज ऑफ फाइन आर्ट्स अॅण्ड कल्चर या आपल्या संस्थेद्वारे त्यांनी शास्त्रीय नृत्यातल्या प्रशिक्षणाचे अखंड सेवा व्रत घेतलेले आहे. भारतीय कला आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी सरफोजी राजे भोसले सेंटर या संस्थेची उभारणी डॉ. संध्या पुरेचा यांनी केली. त्याद्वारे त्यांनी कलाक्षेत्रासाठी प्रशिक्षण, संशोधनाचे कार्य अविरत सुरू ठेवले आहे. भरतनाट्यम सारख्या शास्त्रीय नृत्यशैलीला राष्ट्रीय पातळीवर सैद्धांतिक बैठक प्राप्त करून देणाऱ्या लेखक, प्रयोगशील नृत्य संरचनाकार डाॅ. संध्या पुरेचा यांच्या गुरू पार्वती कुमार असून, त्या यांच्या पट्टशिष्या आहेत. आपल्या गुरूंच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्या दरवर्षी कार्यक्रम आयोजित करतात.

डाॅ. संध्या पुरेचा यांनी आजवर सुमारे ५००० विद्यार्थिनींना भरतनाट्यमचे शिक्षण दिले आहे. इतकेच नव्हे, शास्त्रीय नृत्याच्या क्षेत्रात त्या सातत्याने नवे नवे प्रयोग करीत असतात. परंपरा आणि नवता यांचा सुंदर समन्वय म्हणजे संध्या पुरेचा यांचा कलाविष्कार. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीतर्फे विद्यानगरी कलिना येथे परंपरा महोत्सवाचे आयोजन केले जाते. या परंपरा महोत्सवात एक वर्षी संध्या पुरेचा यांच्या आणि माझ्या संकल्पनेतून शास्त्रीय नृत्य आणि लोकनृत्य यांचा सुंदर समन्वय घडविणारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर, छाया माया खुटेगावकर, झेलम परांजपे, राजश्री शिर्के अशा मान्यवर कलावती एकत्र आल्या. त्यांनी आपल्या नृत्य सादरीकरणातून शास्त्रीय नृत्य आणि लोकनृत्य यांच्या सीमारेषा पुसून टाकल्याची आठवण आजही ताजी आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या एका महोत्सवात गेटवे ऑफ इंडिया समोर संध्या पुरेचा यांनी सुंदर कार्यक्रम सादर केला होता. त्यात राजश्री शिर्के, झेलम परांजपे, स्वतः संध्या पुरेचा, छाया माया खुटेगावकर सहभागी झाल्या होत्या. त्या कार्यक्रमात कथ्थक, भरतनाट्यम आणि मोहिनीअट्टम तसेच लावणीची सादर केलेली जुगलबंदी प्रेक्षकांना खूपच आवडली होती.

संध्या पुरेचा एक प्रयोगशील ज्येष्ठ कलावंत आहेत. कलेच्या क्षेत्रात विशेषता शास्त्रीय नृत्याच्या क्षेत्रात कोणतेही नृत्य हे उच्च पातळीवरचे अथवा कनिष्ठ पातळीवरचे नसते. नृत्य ही नटराजाची देणगी आहे. भरताच्या नाट्यशास्त्राचा वारसा तिला लाभलेला आहे, ही ठाम भूमिका संध्या पुरेचा यांनी घेतली आहे. नृत्यक्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल त्यांना २०१९ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्राप्त झाला.

१९८६ साली अभिनय दर्पणमधील श्लोकांवर त्यांनी कार्यक्रम सादर केला. अभिनय दर्पण वरील हा कार्यक्रम त्यांनी आपल्या गुरू पार्वती कुमार यांना अर्पण केला. संस्कृत भाषा भरताचे नाट्यशास्त्र सरफोजी राजे भोसले यांचे वाङ्मय हे डॉ. संध्या पुरेचा यांच्या अभ्यासाचे आणि आस्थेचे विषय राहिले आहेत. संस्कृत काव्यरचनांचे शास्त्र आणि संप्रदाय यांचे अनोखे सादरीकरण डॉ. संध्या पुरेचा यांनी घडविले आहे.

ताज फेस्टिवल, अजंठा फेस्टिवल, एलिफंटा फेस्टिवल तसेच संगीत नाटक अकादमीचे महोत्सव अशा अनेक राष्ट्रीय महोत्सवांमध्ये डॉ. संध्या पुरेचा यांनी आपली कला सादर केली आहे. राष्ट्रीय महोत्सवांसोबत आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये तसेच नेदरलँड, दुबई, ब्रिटन, रशिया, अमेरिका अशा देशांमध्ये त्यांनी आपली कला सादर केली आहे. इतकेच नव्हे, त्यांनी राष्ट्रीय पातळीसह आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपला शिष्य संप्रदाय वाढविला आहे. डॉ. संध्या पुरेचा या भरतनाट्यम नृत्यशैलीसाठी ओळखल्या जात असल्या तरी त्यांना सर्वच शास्त्रीय नृत्यप्रकार आणि लोकनृत्य प्रकार या संबंधात विशेष आस्था आहे. त्यांनी भरतनाट्यम, कथ्थक, मोहिनीअट्टम आणि लावणी या शास्त्रीय नृत्य आणि लोकनृत्यातून साकार झालेला कार्यक्रम गेटवे ऑफ इंडिया येथे सादर केला होता. केवळ शास्त्रीय नृत्याच्या नव्हे, तर लोकनृत्याच्या कार्यशाळांमध्ये देखील त्या आपला सहभाग नोंदवित असतात.

भरताच्या नाट्यशास्त्रावर त्यांनी लिहिलेला ग्रंथ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रसिद्ध केला आहे. तंजावरच्या सरफोजी राजे भोसले यांच्या परंपरेचा डॉ. संध्या पुरेचा यांचा विशेष अभ्यास आहे. त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. लोकरंग सांस्कृतिक मंच या ठाण्यातील संस्थेने त्यांच्या शास्त्रीय नृत्यक्षेत्रातील योगदानाची दखल घेत ज्येष्ठ नाटककार, गीतकार अशोक परांजपे पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे.

संगीत नाटक अकादमीच्या अनेक परिषदांमध्ये मौलिक शोधनिबंधांचे वाचन, अनेक ग्रंथांचे संपादनही डॉ. संध्या पुरेचा यांनी केले आहे. अभिनय दर्पणच्या ३२४ श्लोकांचा दृक-श्राव्य प्रकल्प त्यांनी साकार केला आहे. या संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष झाल्याने महाराष्ट्राला त्यांचा विशेष अभिमान आहे. शास्त्रीय नृत्य आणि लोकनृत्य, लोककला यांचा सन्मान वाढविण्याचे काम डॉ. संध्या पुरेचा संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्ष म्हणून निश्चित करतील. संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्ष झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन!

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?