प्रासंगिक
डॉ. श्रीराम गीत
‘नीट एलिजिबल’ होणाऱ्यांची संख्या कायम परीक्षा देणाऱ्यांच्या जेमतेम निम्मी असते. तरीही अट्टाहासाने नापास होणारे किंवा एलिजिबल नसणारे विद्यार्थी पुन्हा पुन्हा बसत राहतात याला आळा बसणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांच्या इयत्ता नववी, दहावी, अकरावी, बारावी शास्त्र, गणित आणि इंग्रजी याच्या मार्कांची सरासरी काढायची. काहींचे कदाचित अकरावी, बारावीला गणित नसेल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमातून शिकल्यामुळे इंग्रजी विषयाचे मार्क कमी असतील. आयसीएससीचे मार्क वाढलेले असतील किंवा सीबीएससीचे राज्य बोर्डांपेक्षा कमी असतील. यातून एक गोष्ट नक्की सिद्ध होईल.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या लांबलचक कालावधीसाठी विद्यार्थ्यांचे सातत्य किती आहे ते कळलेलं असेल. परीक्षेत पुढचा अभ्यास करून वैद्यकीय अभ्यासक्रमात कोणाचाच निभाव लागत नाही. तो सर्व अभ्यासक्रम इंग्रजीमधून असल्यामुळे इंग्रजी मार्कही महत्त्वाचे आहेत. वाचणे, समजून घेणे, व्यक्त होणे यासाठी मेडिकलमध्ये इंग्रजीशिवाय पर्याय नाही.
यानंतरचा टप्पा म्हणजे ही सरासरी ज्यांची ८० पेक्षा जास्त आहे यांचा एक वेगळा गट करून, त्याला प्राथमिक परीक्षा द्यायची गरज राहणार नाही. इतर सर्व विद्यार्थ्यांना एक चाळणी किंवा प्राथमिक परीक्षा अत्यावश्यक असेल. चाळणी परीक्षेत ५० percentile पेक्षा कमी मार्क असतील त्यांना पुन्हा नीट देण्यामधून कायम बंदी करायला हरकत नसावी. सध्या नीट किती वेळेला द्यावी? कोणी द्यावी? यावर कसलेही बंधन नाही. बारावी शास्त्रात जेमतेम ५० टक्के मार्क मिळालेला विद्यार्थी सुद्धा पाच वेळेला नीट देताना आढळतो.
कायमच ‘नीट एलिजिबल’ होणाऱ्यांची संख्या परीक्षा देणाऱ्यांच्या जेमतेम निम्मी असते. तरीही अट्टाहासाने नापास होणारे किंवा एलिजिबल नसणारे विद्यार्थी पुन्हा पुन्हा बसत राहतात याला आळा बसेल. पालक व विद्यार्थी यांची निराशा थांबेल. मात्र क्लासवाल्यांची कोल्हेकुई जोरात होईल. नीटचा निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवशी रिपीट बॅच सुरू करणारे अनेक क्लासेस आहेत. या पद्धतीत चाळणी परीक्षा आणि खरी परीक्षा यातून चांगले डॉक्टर निर्माण होण्याची शक्यता राहील. अनेक भाबड्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी काही आकडे लिहीत आहे. ७२० मार्कांची परीक्षा होते. एलिजिबिलिटीचा आकडा कायमच १२० ते १४० च्या दरम्यान राहिलेला आहे. एकूण १८० प्रश्नांपैकी ३० किंवा ३५ प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली तरीही १२० ते १४० मार्क मिळतात. असे डॉक्टर समाजाला उपयोगी नाहीत हे नक्कीच सर्वांना मान्य होईल. परीक्षा खूप कठीण असते यापलीकडे विद्यार्थी आणि पालक काही बोलत नाहीत म्हणून हा आकड्यांचा खेळ कुणालाही समजावा अशा शब्दांत येथे मांडत आहे.
वेगळ्या शब्दात ‘दूध का दूध पानी का पानी’ करण्यासाठी कठोर वाटला तरी हाच एक उपाय आहे. अनेक मुलांचे इयत्ता नववीचे आणि अकरावीचे मार्क ५० ते ६५% च्या दरम्यान रेंगाळत असतात, पण दहावीला हीच मुले ८०-८५ टक्के मिळाले म्हणून नीटच्या नादी लागतात. म्हणून नववी व अकरावी ही अभ्यास करण्याची वर्षे आहेत, हे पण सर्वांच्या मनावर ठसेल. ऑनलाइन परीक्षा हा उत्तम उपाय आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने तो मान्य केला तरीही वर लिहिलेली पद्धत जास्त उपयोगी पडेल असा माझा गेल्या ५५ वर्षांचा वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव आणि करियर कौन्सिलिंगचा तीस वर्षांचा अनुभव सांगतो.