दृष्टिक्षेप
उत्तम जोगदंड
आधी छुप्या आणि नंतर उघड पद्धतीने आपला फोडा आणि राज्य करा हा फॉर्म्युला राबवायला सुरुवात केली. गेल्या दहा-पंधरा वर्षांत हिंदू-मुस्लिम विद्वेष फैलावून सत्ता काबीज केली. आता त्यांनी आपला मोर्चा आपल्या व्यवस्थेला, वर्चस्वाला आव्हान देणाऱ्या जातींकडे वळवला आहे.
'फोडा आणि राज्य करा’ (Divide and rule) हे धोरण अवलंबून इंग्रजांनी आपल्यावर सुमारे १९० वर्षे राज्य केले असे म्हणतात. ५६५ संस्थानांमध्ये आधीच विभाजित (Divided) असलेल्या भारतवर्षातील हिंदू आणि मुस्लिम धर्मीय संस्थानिक जेव्हा इंग्रजांविरुद्ध एकत्र आले तेव्हा त्यांच्यात धार्मिक आधारावर दुही माजवणारी धोरणे राबवून राज्य केले हा ज्ञात इतिहास आहे. यातून असा समज होऊ शकतो की ‘फोडा आणि राज्य करा’ हे इंग्रजांचेच धोरण आहे. परंतु हे धोरण आपल्याच संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे हे आपल्या इतिहासावर आणि वर्तमानावर एक दृष्टिक्षेप टाकल्यास लक्षात येईल.
हे आठवण्याचे कारण आहे, सध्या महाराष्ट्रात अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरणावरून मातंग आणि महार-बौद्ध या प्रमुख अनुसूचित जातींमध्ये सुरू असलेला (खरे तर फूट पाडून लावलेला) तीव्र संघर्ष. त्याकडे वळण्याआधी ‘फोडा आणि राज्य करा’ हे धोरण आपल्या पुरातन संस्कृतीचे अविभाज्य अंग कसे, ते पाहू या.
‘श्रम विभागणी’ (Division of Labour) या आधुनिक अर्थशास्त्रीय संकल्पनेचे पौराणिक रूप म्हणून गौरविली जात असलेली, ब्राह्मणी धर्माने लादलेली वर्ण व्यवस्था हे मानवी इतिहासातील ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणाचे प्राचीन उदाहरण असावे. वास्तवात ही श्रम विभागणी नव्हती तर आपले वर्चस्व राखण्यासाठी समाजाची विषमतेवर, अन्यायावर आधारित केलेली विभागणी होती. या व्यवस्थेतील एकेका वर्णाच्या ‘जन्मस्थाना’पासून आणि कामापासून या विषमतेची सुरुवात होते. ब्रह्माच्या ‘वरच्या’ अवयवातून म्हणजे मुखातून जन्मलेल्या ब्राह्मण वर्णाकडे बुद्धीचे म्हणजे ज्ञान देण्याचे, शिकवण्याचे आणि विचार करण्याचे काम असते. बाहूंपासून जन्मलेल्या क्षत्रिय वर्णाचे काम शौर्याचे, समाजाच्या रक्षणाचे असते, मांड्यांपासून जन्मलेल्या वैश्य वर्णाचे काम व्यापाराचे, तर सर्वात ‘खालच्या’ अवयवातून, म्हणजे पायातून जन्मलेल्या शूद्र वर्णाचे काम ‘वरच्या’ तीनही वर्णांची सेवा करण्याचे असते. खरे म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या अशा अवयवांतून कोणीही जन्म घेऊ शकत नाही. परंतु वर्णांचा आणि त्यांच्या कामांचा स्तर, दर्जा दर्शविण्यासाठी ही मांडणी केलेली असावी.
वर्ण व्यवस्था कर्माधारित असल्याचा दावा फसवा आहे. कारण ज्या वर्णात जन्म झाला त्याच वर्णात आमरण राहणे अनिवार्य असलेली ही जन्माधारित व्यवस्था आहे. ती कर्माधारित असती तर क्षत्रियांशी २१ वेळा ‘युद्ध’ करणारे भगवान परशुराम आपल्या कर्माने (युद्धे करणे) क्षत्रीय वर्णात गणले गेले असते. एकलव्य हा आदिवासी योद्धा क्षत्रीय झाला असता आणि शूद्र शंबुक हा ब्राह्मणवर्णीय झाला असता. आधुनिक काळात उत्पादन प्रक्रियेत श्रम विभागणीनुसार काम करणारे लोक ‘वरच्या’ पदावर पदोन्नती मिळवू शकतात. परंतु वर्ण व्यवस्थेत ही सोय नाही. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर या व्यवस्थेला जीना नसलेला मनोरा असे म्हणत.
या वर्ण व्यवस्थेत कुठेही न बसणारे, धर्मातून पूर्णतः बहिष्कृत केले गेलेले दोन मोठे वर्ग आपल्याकडे पूर्वीपासून आहेत. ते म्हणजे अस्पृश्य जाती आणि आदिवासी. आपल्या संविधानानुसार त्यांना अनुक्रमे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती असे नाव दिलेले आहे. महात्मा फुले अस्पृश्यांना अतिशुद्र असे म्हणत. वर्ण व्यवस्थेतून जातीव्यवस्था आकारास आली असे डॉ. आंबेडकर यांचे संशोधन सांगते. भारतात जातींची संख्या प्रचंड आहे. आरक्षणप्राप्त जातींमध्ये ११०९ अनुसूचित जाती, ७०० पेक्षा अधिक अनुसूचित जमाती, तर २६५० इतर मागास जाती (ओबीसी) येतात. (ओबीसी हे वर्ण व्यवस्थेतील शूद्र या वर्णात मोडतात.) यांची, म्हणजे ‘बहुजनांच्या’ जातींची बेरीज ४४५९ होते. अन्य वर्णीयांच्याही हजारो जाती आहेत.
या जातीव्यवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जात अन्य कोणत्यातरी जातीपेक्षा ‘वरची’ आणि ‘खालची’ही असते. यास अपवाद आहे ब्राह्मण जात. त्यांच्यावर कोणतीही जात नसते. जाती-जातींमध्ये रोटी-बेटी व्यवहार होत नाहीत. अस्पृश्य जातींचा तर स्पर्शही वर्ज्य असतो. त्यांची वस्ती गावाबाहेर असते आणि त्यांना कसलेही मूलभूत मानवी अधिकार नव्हते. पशुपेक्षाही हीन जीवन ते जगत होते. विशेष म्हणजे या सर्व जातीतील लोक त्यांच्या जातीच्या गुलामीत पद्धतशीरपणे अडकवले गेले आहेत. त्यांना आपल्या जातीबाहेरचे काम करण्याची किंवा जात बदलण्याची मुभा नव्हती. शूद्र, अतिशूद्र लोकांनी ज्ञानार्जन करणे हा घोर अपराध होता. अशा या विभाजित, ‘फोडलेल्या’ समाजावर ब्राह्मण वर्ण राज्य करत होता आणि आहे.
काही कुडमुडे इतिहासकार असा दावा करताहेत की ‘फोडा आणि राज्य करा’ हे धोरण अंमलात आणण्यासाठी जातीव्यवस्था इंग्रजांनी निर्माण करून समाजात फूट पाडली. पण हा दावा धादांत खोटा आहे. कारण, इंग्रजांच्या आधी शेकडो वर्षे मोगल-मुसलमान राजवटींचे आपण गुलाम होतो. तेव्हा जातीव्यवस्था अस्तित्वात नव्हती का? इंग्रज राजवटीच्या काही शतके आधी अस्पृश्य जातीतल्या संत चोखोबांना पंढरपूरच्या विठोबा मंदिराबाहेर मरेपर्यंत कोणी तिष्ठत ठेवले? आंतरजातीय लग्न लावून देणाऱ्या लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर यांचा छळ कोणी आणि का केला? संत एकनाथ महाराजांनी उन्हात भाजत असलेले महाराचे मूल उचलले म्हणून त्यांच्यावर बहिष्कार कोणी आणि का टाकला? उदाहरणे खूप आहेत. बरे, इंग्रज अशी कथित जातीव्यवस्था निर्माण करून धार्मिक व्यवस्थेत ढवळाढवळ करत होते तेव्हा धर्माचे नियंत्रक आणि नियामक असलेल्या ब्राह्मण वर्णाने इंग्रजांचा असा हस्तक्षेप का चालवून घेतला? उलट त्यांनी इंग्रजांची मनोभावे चाकरी करण्यात धन्यता मानली असा इतिहास आहे. इंग्रजांनी तर जातिभेद न पाळता सर्व जातीच्या लोकांना शिक्षण खुले केले. म्हणून शूद्र-अतिशूद्र तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेऊ शकले. इंग्रजांनी जातीव्यवस्था आणली असा दावा या व्यवस्थेचे लाभधारक आपल्या पूर्वजांचे भेदभावाधारित व्यवस्थेच्या निर्मितीचे पाप लपवण्यासाठी करतात.
आपण स्वीकारलेल्या संविधानानुसार देशात समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता इत्यादी मूल्ये स्थापित झाली. या मूल्यांचे वर्ण व्यवस्थेला प्रचंड वावडे आहे. धार्मिक, जातीय, भाषिक, वांशिक विविधता असलेला भारतीय समाज संविधानामुळे एकत्र बांधला गेला. त्याची फळे भारतीय समाज चाखत होता. परिणामी ब्राह्मणी वर्चस्वच धोक्यात आले. मग त्यांनी आधी छुप्या आणि नंतर उघड पद्धतीने आपला फोडा आणि राज्य करा हा फॉर्म्युला राबवायला सुरुवात केली. गेल्या दहा-पंधरा वर्षांत हिंदू-मुस्लिम विद्वेष फैलावून, त्यांच्यात दुही माजवून सत्ता काबीज केली. आता त्यांनी आपला मोर्चा आपल्या व्यवस्थेला, वर्चस्वाला आव्हान देणाऱ्या जातींकडे वळवला आहे. मराठा- ओबीसी यांच्यात दरी निर्माण करून झाली. या दोन्ही जाती एकमेकांशी भांडून आता बऱ्यापैकी निष्प्रभ झालेल्या आहेत. आता ते वळले आहेत अनुसूचित जातींकडे. डॉ. आंबेडकर यांचा मार्ग अनुसरून बौद्ध-महार समुदाय ब्राह्मणी व्यवस्थेला आव्हान देत आहे. त्यांच्या विरोधात मातंग (मांग) जातीला उपवर्गीकरणाच्या बहाण्याने भिडवून दिले आहे. उपवर्गीकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे. त्यानुसार सरकार काय निर्णय घ्यायचा तो घेईल. परंतु या दोन पूर्वास्पृश्य जातींमध्ये आता एवढे वितुष्ट आले आहे की उपवर्गीकरण राहिले बाजूला, एकमेकांच्या जातीवर, महापुरुषांवर अत्यंत अश्लाघ्य भाषेत चिखलफेक सुरू झाली आहे. हाणामारीच्या बाता होऊ लागल्या आहेत. त्यांच्यात कधीही भरून येणार नाही अशी दरी निर्माण झालेली आहे. पुढेमागे दंगलीही घडवून आणल्या जाऊ शकतात. अन्य जातींचा नंबर देखील लागणार आहे. अशा प्रकारे इथल्या व्यवस्थेचे ‘फोडा आणि राज्य करा’, हे सनातन धोरण कार्यरत राहून समाजाची शकले करीत राहणार आहे.