(संग्रहित छायाचित्र)
संपादकीय

नागरी प्रश्नांवर ‘अळी मिळी गुप चिळी!’

डोंबिवलीतील अनेक नागरी प्रश्न, समस्यांवर येथील सेलिब्रिटी, मान्यवरांनी कायमच 'अळी मिळी गुप चिळी' भूमिका घेतली आहे. विविध कार्यक्रमांतून दिसणारे हे 'आंब्याचे टहाळे' शोभेपुरतेच आहेत. वर्षानुवर्षे असलेली ही परिस्थिती दुर्दैवी, खेदजनक आणि संतापजनकही आहे.

नवशक्ती Web Desk

विशेष

शेखर जोशी

डोंबिवलीतील अनेक नागरी प्रश्न, समस्यांवर येथील सेलिब्रिटी, मान्यवरांनी कायमच 'अळी मिळी गुप चिळी' भूमिका घेतली आहे. विविध कार्यक्रमांतून दिसणारे हे 'आंब्याचे टहाळे' शोभेपुरतेच आहेत. वर्षानुवर्षे असलेली ही परिस्थिती दुर्दैवी, खेदजनक आणि संतापजनकही आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक २०२६ आता जवळच आली आहे. पण डोंबिवली शहरातील प्रश्न मात्र जैसे थे आहेत. हे प्रश्न, अडचणी या या निवडणुकांमुळेतरी कमी होतील असे चित्र दिसेल असे वाटत होते पण अजूनही उदासीनताच आहे. डोंबिवली म्हणजे सांस्कृतिक वारसा लाभलेलं शहर. शोभयात्रेचे माहेरघर. तरीही डोंबवलीतील नागरी प्रश्न का सुटत नाहीत हा मात्र जनतेसमोरचा गहन प्रश्न आहे. अनेक बडे लोक डोंबिवलीमध्ये येतात, चमकतात, बड्या बाता करतात पण तो दिवस संपला की मग केलेली ही बडबड त्या क्षणातच विरून जाते. मग ही बडी मंडळी डोंबिवलीला विसतात का?

मोठेपण सण, उत्सव, शोभायात्रेपुरते..?

साहित्य सांस्कृतिक नगरी म्हणून डोंबिवलीची ओळख आहे. इथे दर दोन/चार दिवसांत किंवा शनिवारी/ रविवारी विविध कार्यक्रम होतात. श्रोत्यांअभावी एखादा कार्यक्रम पडला, असे कधीही होत नाही. कोणत्याही शुभ कार्यात आंब्याचे टहाळे जसे आवश्यक असतात, तसे डोंबिवलीतील कोणत्याही कार्यक्रमात हे सेलिब्रेटी, मान्यवर आंब्याचे टहाळे म्हणून उपस्थित असतात. या मंडळींच्या उपस्थितीबद्दल कोणताही आक्षेप असण्याचे कारण नाही. या सर्व मंडळींनी जिद्द, मेहनत, चिकाटी, हुशारी आदी गुणांमुळे समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात आपले नाव कोरले आहे, मोठे केले आहे.‌ मात्र त्यांचे हे मोठेपण सण, उत्सव, शोभायात्रा, पुरस्कार, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मिरविण्यापुरतेच उरले आहे, असे खेदाने म्हणावे लागतेय. आणि हे कटू असले तरी सत्य आणि वास्तव आहे. ‘दादा थोर तुझे उपकार’ हा प्रयोग डोंबिवलीत नेहमीच रंगतो. हे सेलिब्रिटी, मान्यवर, आंब्याचे टहाळे या प्रयोगात नेहमीच उत्साहाने सहभागी होत असतात.

नागरी प्रश्नांवर मिठाची गुळणी

मुद्रीत किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून, समाज माध्यमातून डोंबिवली शहरातील गंभीर प्रश्न, नागरी समस्यांवर वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध होतात. समाज माध्यमातून वेगवेगळ्या पोस्ट लिहिल्या जातात. मात्र या प्रश्नांवर या सेलिब्रिटी, मान्यवरांनी कायमच मूग गिळून गप्प बसणे पसंत केले आहे. कोणत्याही जाहीर कार्यक्रमात, प्रसार माध्यमातून, समाज माध्यमातून याविषयी चकार शब्द काढलेला नाही, कधीही वैयक्तिक भूमिका मांडलेली नाही. या मंडळींनी उठसूठ बोलावे, व्यक्त व्हावे असे नाही. परंतु एखादा विषय/ समस्या वृत्तपत्रातून लावून धरली जाते, त्याचा पाठपुरावा केला जातो, तो विषय ज्वलंत असतो किमान तेव्हा तरी या मंडळींनी बोलावे नव्हे बोललेच पाहिजे.

समर्थनार्थ किंवा विरोधात पण बोला

ही मंडळी अशा एखाद्या नागरी प्रश्नावर, सत्ताधारी भाजप व शिवसेना महायुतीचे स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निष्क्रियतेवर विरोधात बोलत नाही पण त्यांचे समर्थनही करत नाहीत. तुम्ही समर्थनार्थ किंवा विरोधात पण काहीतरी बोला, भूमिका घेणे आवश्यक आहे. पण आजवर ती कधीच घेतली गेलेली नाही. समाजात तुमचे नाव आहे, मान आहे, तुमच्या शब्दाला किंमत आहे. तुम्ही शहरातील महत्त्वाच्या समस्येसाठी, गंभीर नागरी प्रश्नावर सत्ताधारी लोकप्रतिनिधी, राज्यस्तरीय बडे नेते यांच्याकडे शब्द टाकला, अमूक समस्या सोडविण्यासाठी हट्ट धरला तर सत्ताधारी नक्कीच तुमच्या शब्दाचा मान ठेवतील, तो प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतील, दखल घेतील काहीतरी हालचाल नक्कीच होईल. पण तिथेही या आंब्याच्या टहाळ्यांची अनास्था, उदासीनता आहे.

नागरी समस्या, ज्वलंत विषय

नागरी समस्या, ज्वलंत विषयावर या मंडळींनी एखादे निवेदन, पत्र जाहीरपणे लिहिले तरी खूप आहे. डोंबिवलीत रेल्वे स्थानकाला पडलेला अनधिकृत फेरिवाल्यांचा विळखा, मुजोर, बेशिस्त, मनमानी भाडे आकारणी करणारे रिक्षाचालक, त्यांच्यावर कोणताही अंकुश नसलेले सत्ताधारी लोकप्रतिनिधी, वाहतूक पोलीस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, न झालेली रिक्षा मीटरसक्ती, अनधिकृत बांधकामे, सध्या गाजत असलेला ६५ अनधिकृत इमारतींचा प्रश्न, वाहतूक कोंडी, पाणी पुरवठा समस्या, रस्ते अडवून, वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने साजरे होणारे सार्वजनिक दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, यावेळी निघणाऱ्या आगमन विसर्जन मिरवणुका, कानठळ्या बसतील असा डीजे, कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी, सक्षम नसलेली कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन सेवा, जीवघेणा रेल्वे प्रवास हे आणि असे अनेक गंभीर विषय, समस्या आज शहरात आहेत. मात्र या सेलिब्रिटी, मान्यवरांनी यापैकी कोणत्याही विषयावर कधीही तोंड उघडलेले नाही. त्यामुळे आपल्या शहराच्या समस्या सोडविण्यासाठी, गंभीर नागरी प्रश्नाकडे कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रशासनातील अधिकारी यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी रस्त्यावर उतरणे, धरणे आंदोलन करणे, निषेध मोर्चा काढणे दूरच राहिले. मुंबईत काही वर्षांपूर्वी दिवंगत ज्येष्ठ साहित्यिका दुर्गाबाई भागवत आणि अन्य काही साहित्यिक मंडळी विशिष्ट विषयावर ठोस भूमिका घेऊन रस्त्यावर उतरली होती. डोंबिवलीकर असलेले ज्येष्ठ साहित्यिक भाषाप्रभू दिवंगत पु. भा. भावे यांनीही आपली लेखणी तेव्हा न पटणा-या गोष्टींविरोधात चालवली होती, ठाम भूमिका घेऊन ते आपले म्हणणे मांडत होते, हे विसरून चालणार नाही.

लोकमान्य टिळक पुतळा परिसर सुशोभिकरण

एकच ठळक उदाहरण देतो. डोंबिवली पूर्व विभागात टिळकनगर परिसरात लोकमान्य टिळक यांचा पूर्णाकृती पुतळा गेली अनेक वर्षे आहे. काही महिन्यांपूर्वी सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली लोकमान्य टिळकांचा पुतळा त्या जागेवरून हटविण्यात आला. अनेक महिन्यांपासून ते काम रखडले होते. लोकमान्य टिळक यांची जयंती, पुण्यतिथीही पुतळ्याविना गेली. सुशोभीकरणाचे हे काम खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हाती घेतले होते. कामाच्या ठिकाणी हे काम कोण कंत्राटदार करतोय, ते कधी सुरू केले, कधी पूर्ण होणार आहे, कामाचा एकूण खर्च किती आहे? याबाबत माहिती देणारा फलक लावणे अपेक्षित होते.

गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या या कामाबाबत समाजमाध्यमातून मी सातत्याने पाठपुरावा केला. त्याबाबत लेख, पत्रे लिहिली. काही दिवस तर लोकमान्य टिळकांचा पुतळा मृतदेह गुंडाळून ठेवावा तसा पांढ-या कापडात गुंडाळून जागेवर आणून उभा केला होता. ही बाब तर अत्यंत गंभीर व चीड येणारी होती. मात्र त्यावेळी टिळकनगरात राहणारा एकही सेलिब्रेटी, मान्यवर, गणपती उत्सव साजरे करणारे मंडळ, मंडळाचे पदाधिकारी यांनी चकार शब्दाने याविषयावर जाहीर भाष्य केले नाही की खासदार डॉ. शिंदे, स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांचे जाहीरपणे लक्ष वेधले नाही. सुशोभीकरण रखडल्याबद्दल जाहीर निषेधही व्यक्त केला नाही. जाहीरपणे जाऊ दे, एका व्हॉट्स ॲप ग्रुपवरही हे लेख पाठवत होतो, त्या ठराविक लोकांपुरत्या मर्यादित असलेल्या समुहावर एकानेही या गंभीर विषयावर आपली प्रतिक्रिया दिली नाही किंवा मत व्यक्त केले नाही. सगळे मुग गिळून गप्प बसले होते.

तर भावी पिढी क्षमा करणार नाही

सुमारे २५/३० वर्षांपूर्वी एका दैनिकात डोंबिवली विशेष अंकात एक लेख लिहिला होता. विविध नागरी समस्या, प्रश्नांसाठी शहरात राहणाऱ्या आणि विविध क्षेत्रात नामवंत असलेल्या, काम करणाऱ्या डोंबिवलीकरांनी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. रस्त्यावर उतरून राज्यकर्ते, स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्यावर दबाव आणून, निषेध व्यक्त करून शहरातील नागरी समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. प्रयत्न केले पाहिजेत.‌ अन्यथा भविष्यात या समस्या अधिक गंभीर स्वरूप धारण करतील आणि भावी पिढी आपल्याला क्षमा करणार नाही, असे लिहिले होते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आज इतक्या वर्षांनंतरही तीच परिस्थिती कायम आहे आणि त्यात जराही बदल दिसत नाही हीच शोकांतिका आहे. त्यामुळे आंब्याचे टहाळे सुकून गेलेत असे वाटते.

shejo66@gmail.com

Thane : निवडणुकीआधी शिवसेना शिंदे गटाला धक्का; ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा

Nashik : महापालिका निवडणुकीआधी भाजपमध्ये मोठे पक्षप्रवेश; देवयानी फरांदे म्हणाल्या, "काही दलाल आणि स्वार्थी लोकांनी...

एकनाथ शिंदेंच्या 'त्या' वक्तव्यावर सुषमा अंधारेंचा पलटवार; म्हणाल्या, "तुम्हाला आनंद दिघेंची शपथ...

Tarique Rahman : १७ वर्षांनंतर बांगलादेशात घरवापसी करणारे तारिक रहमान नेमके कोण?

उबर-ओला-रॅपिडोसाठी केंद्र सरकारचा नवा नियम; महिला प्रवाशांसाठी खास सोय, राईडआधी टिप मागितली तर...