संपादकीय

रत्नांचे मायाजाल आणि अंधश्रध्दा निर्मूलन

जमिनीच्या पोटात अनेक दुर्मिळ मूलद्रव्य, खनिजे म्हणजेच मूल्यवान रत्ने सापडतात. जसे की, माणिक, पोवळे, पाचू, पुष्कराज, हिरा. या रत्नांचा आणि आपल्या जीवनातील चांगल्या वाईट गोष्टींचा संबंध विश्वातील अनंत पसाऱ्यातील आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र यांच्याशी जोडून दिला जातो.

नवशक्ती Web Desk

- भ्रम विभ्रम

डॉ. दीपक माने

जमिनीच्या पोटात अनेक दुर्मिळ मूलद्रव्य, खनिजे म्हणजेच मूल्यवान रत्ने सापडतात. जसे की, माणिक, पोवळे, पाचू, पुष्कराज, हिरा. या रत्नांचा आणि आपल्या जीवनातील चांगल्या वाईट गोष्टींचा संबंध विश्वातील अनंत पसाऱ्यातील आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र यांच्याशी जोडून दिला जातो. रत्नांचा आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र, राशी यांचा काय संबंध येतो? कोणत्या बोटात कोणत्या दिवशी कोणते रत्न वापरल्यास संकटे, दुःखे नष्ट होऊन सुख, धन, आरोग्य प्राप्त होते. ही अंधश्रध्देची धारणा रत्नांचे मायाजाल वाढवत राहिली आहे.

मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास हा जिज्ञासा, कुतहल, चौकसपणा, प्रयत्नवाद, भविष्याचा वेध यांनी व्यापला आहे. आपला भवताल, निसर्ग यासर्वांबाबत विविध माहितीचे संकलन करतच विविध ज्ञान शाखा निर्माण झाल्या. भूगर्भाबाबत माहिती घेत, ज्ञानसंग्रह करीत भूगर्भशास्त्र/खनिज शास्त्र निर्माण झाले. जमिनीच्या पोटात अनेक मूलद्रव्य, खनिजे सापडत गेली. त्यातील काही दुर्मिळ, मौल्यवान, आकर्षक रंग असणारी, दीर्घ टिकाऊपणानुसार व प्रचंड किंमत असलेली खनिजे म्हणजेच रत्न होय.

रत्नांचे विज्ञानाने नामकरण केले आहे. जगभरात त्यांना स्थानिक नावे देखील आहेत. तसेच भारतीयांनी महारत्ने /नवरत्ने व उपरत्ने असे भाग केले ते काल्पनिक नवग्रहांचे प्रतीक समजून उपाधी नवरत्ने ही दिली. साधारणपणे दुर्मिळ वस्तूंचा संग्रह करण्याचा मानवी स्वभाव ओळखून आपल्याकडील काही स्वयंघोषित रत्नपारखी, जेमोलॉजिस्ट, जेम्स स्पेशलिस्ट अशी भिन्न आकर्षक नावे घेऊन वैद्यकीय शाखेतील समांतर नावे धारणकर्ते असतात, तसे एक व्यापारी छदमज्ञानी समूह निर्माण झाला. यासमुहाने मूळ रत्ने त्यांच्या शास्त्रीय माहितीला विज्ञानाचे शब्द जोडून भ्रमित करणारी ग्लोबलस तंत्राने विचारधारा सर्व समाजात वापरत जम बसवला.

समाजातील भिन्न मानसिकतेच्या लोकांपैकी काही आपल्या दैनंदिन जीवनातील समस्या, घटना यांना सामोरे न जाता पळवाट/ जवळचा मार्ग शोधतात अशांना हेरून ज्येष्ठ कवी मंगेश पाडगांवकर यांच्या शब्दात- "माणसे खपाट खंगलेली, आतून आतून भंगलेली, कोणीतरी हवा जबरीबुवा, जो काढील त्यांच्या उवा चिंतांच्या...... आम्ही भिडायची नाही संकटांना". या मानसिकतेच्या मोठ्या समूहास ध्यानात ठेवून व्यापार चक्र निर्माण झाले. दैनंदिन समस्यावर झटपट उपाय पटवून देत त्याची व्याप्ती वाढत गेली. आपल्या जीवनातील चांगल्या वाईट गोष्टींचा संबंध विश्वातील अनंत पसाऱ्यातील आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र यांच्याशी जोडून दिला. हजारो वर्षांपूर्वी बॅबेलोनियन संस्कृती ते वैज्ञानिक क्रांतीपर्यंत जगभर प्रत्येकाचे कुवतीनुसार प्राप्त माहितीच्या आधारे जन्मदिवस, नक्षत्र, रासनुसार एकेक खडा (रत्न) अंगावर अलंकारामध्ये धारण केल्याने येणारी संकटे, दुःखे नष्ट होऊन सुख, धन, आरोग्य प्राप्त होते हा समज पसरवत कोणत्या बोटात कोणत्या दिवशी कोणता खडा वापरल्यास त्याला शकुन, अपशकुन जोडून निर्माण केलेली धारणा हा उद्योग वाढवत राहिली.

नवरत्ने - माणिक, मोती, पोवळे, पाचू, पुष्कराज, हिरा, इंद्रनील, वैडर्थं, कोमेद आणि उपरत्ने सूर्यकांत, चंद्रकांत, पिरोज, अकिक ही आहेत.

रत्नांबाबत काही प्रचलित समज असे १) हिरा -शत्रूशी लढण्यास धैर्य देतो, २) नील - लोकांचा विश्वास मिळवतो, सापाचे विष उतरवतो. ३) माणिक - मनशांती, प्रेम देतो. ४) पाचू यश प्राप्ती संसार सुख देतो. ५) गोमेद- उष्णता विकार, मुळव्याध नष्ट करतो. असे अनेक रोगांपासून संरक्षण, खेळात यश, अनंत दावे रत्नांचे बाबतीत केले जातात. रत्ने आणि त्यापासूनचे लाभ याचा कार्यकारणभाव तपासता त्यांचा परस्पराशी काहीही संबंध नसल्याचे दिसून येते. विज्ञानाने माणसाला स्वतःकडे, विश्वाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिला त्याच्या वापराने रत्नांची सत्यता अशी आहे. रत्ने (जेम्स) हा भूगर्भीय खनिजांचा प्रकार आहे. त्यांचे रासायनिक घटक, स्पटिक रचना, प्रकाश गुणधर्म, घनता यांचा अभ्यास या शास्त्रात केला त्याला खनिज शास्त्र म्हणतात त्याची विकसित शाखा 'रत्न' आहे. पदवीधरच रत्नशास्त्रज्ञ असतो, पण खेडोपाडी जसे समांतर वैद्यक व्यवसायिक तसे रत्न विशारद, रत्नपारखी पावसाळ्यातील भूछत्राप्रमाणे निर्माण झाले. रत्ने दुर्मिळ, अल्प असल्याने त्यांची प्रचंड किंमत असते. उदाहरणार्थ, हिरा (डायमंड) दहा ग्रॅम तीस लाख पेक्षा जास्त, माणिक दहा लाख पेक्षा जास्त.

खरी रत्ने सामान्य जनांचे आवाक्यात नसल्यामुळे 'दुधाची तहान ताकावर' या म्हणीनुसार काचेची रत्ने जी शिसे युक्त काच व कॅल्शियम युक्त क्राऊन काच यांची बनतात. शिसे प्रमाणानुसार दर्जा ठरत असतो. अशी प्रतिरत्ने बाजारात आणून त्याला मूळ किंमत असणाऱ्या रत्नांची नावे देत हजारांच्या किंमतीत विकली जातात. जमिनीत २ हजारहून जास्त खनिजे मिळतात. त्यापैकी मोजक्याच खनिजांना रत्न म्हणून मान्यता आहे. खनिजांची टिकाऊपणा, आकर्षक रंग, दुर्मिळता यावर गुणवत्ता ठरते. रत्नांची शास्त्रीय माहिती रासायनिक संघटन, स्फटिक प्रणाली, कठीणता, गुरुत्व, रंग, पारदर्शकता यावर वैज्ञानिक तपासणी ठरत असते. या तपासणीत कुठेही ग्रह, तारे, रास, नक्षत्र यांचा काडीचाही संबंध येत नाही. रत्नांचे प्रमाणीकरण तपासणीद्वारे ठरते. रत्नांची किंमत कठीणता, रंग, यावर म्हणजे हिरा-कठीणतेमुळे सर्वात मौल्यवान, नील व माणिक हे रंगछटामुळे, पाचू - दुर्मिळतेमुळे किंमती आहे.

भारतात तेराव्या शतकात सापडलेला १०५ कॅरेटचा, कठीणता दहा व २.४ प्रनमनांक असलेला कोहिनूर हा जगातील सर्वात किमती हिरा आहे. भारतात रत्न कमी मिळत असल्यामुळे आयात करून पैलू पाडले जातात, त्याचे प्रतिवर्षी अठरा ते वीस हजार दशलक्ष डॉलर परकीय चलन आपणास मिळते. रत्नाबाबत अनेक अंधश्रद्धा आहेत, पैकी जन्मतारखेनुसार उदा. एक, दहा तारीख जन्म असलेस रवी ग्रह, खरे तर रवी हा तारा आहे. मराठी महिन्यांनुसार जेष्ठ महिन्यात जन्म पाचू, इंग्रजी महिन्यानुसार एप्रिल जन्म हिरा, नावातील प्रथम अक्षर उदा. - हा, हो नीलम, भाग्यरत्नासाठी भाग्य दिवस व बोट अशी मांडणी आहे. अशी महिने, वार, बोटे, नक्षत्र सारखी कोष्टके मांडून त्यांच्या वापरामुळे भाग्य उजळेल, नोकरी लागेल, जुनाट आजार बरे होतील, अशा मनपसंद गोष्टी, घटना जोडून फसवेविज्ञान मांडणी केलेली असते. साधे विज्ञानाचे नियम लावल्यास कोणत्याच पातळीवर हे दावे खरे ठरत नाहीत. एक सत्य घटना अशी ९०चे दशकात बोलका 'पत्थर' नावाने पानभर जाहिरात देत 'संकट मुक्तीची ढाल लकी स्टोन' सांगत गुजरातमधून वीस रुपयाला १०० गारगोटीचे खडे घेऊन ते महाराष्ट्रात वीस रुपयाला एक प्रमाणे विकले जात असे लाखो खडे विकल्याची जाहिरातीत कबुली असे. सातारा, सांगली, रत्नागिरी, नाशिक या ठिकाणी वैज्ञानिक, जाणिवाधारक महा.अं.नि.स. चळवळीतील प्रमुख कार्यकर्त्यांनी आव्हान देत, कोर्ट केसचा सामना करत गारगोटीच्या खड्यांचा बिमोड केला होता. सध्या समाज माध्यमावर असे विपुल दावे छायाचित्रे देत, गुण आल्याची मुलाखत देत, मानसिक गुलामगिरी पसरवत आहेत का? रत्नाचे फायदे सांगताना बेकारी जाईल, धंदा दुप्पट होईल, कोर्टकेसमध्ये सरशी होईल, असे सांगतात. आता एक दावा तार्किकतेवर तपासू. कोर्ट केसमधील वादी-प्रतिवादी यांनी रत्नांची खड्यांची अंगठी वापरल्यास सरशी कोणाची होईल? असे साधे प्राथमिक विज्ञान पातळीवरील प्रश्न हव्यासापोटी, विनाकष्ट प्राप्ती पायी लोक विसरतात व त्याची किंमत त्यांना मोजावी लागते. रत्नांचा आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र, राशी यांचा काय संबंध येतो? विज्ञान सांगे आकाशातील अनेक चांदण्यांपैकी पाच चांदण्या या आपल्या सूर्यमालेतील ग्रह आहेत. ते रोज डोळ्यांनी दिसतात उर्वरित चांदण्या दुसऱ्या सूर्यमाला अथवा तारे आहेत. चांदण्यांचा समूह म्हणजे रास व नक्षत्र. आपल्याकडे चंद्र त्या तारखा समूहात जवळ दिसला की, आज ते नक्षत्र असते ही भारतीय कालगणना आहे. चंद्र रोज एका नक्षत्रात असतो. मुळात आकाशातील ग्रह कोटी किलोमीटरवर आहेत त्यांचा मानवाच्या दैनंदिन आयुष्यावर सतत आणि वेगवेगळा परिणाम होतो हे मानणेच अशास्त्रीय आहे. प्रति रत्नांची जाहिरात सोने-चांदी दुकानातून दिसते. कारण ती एक परस्पर व्यापारपूरक शैली आहे.

आपल्या देशात सन १९६६ मध्ये रत्नांची व्यापार, निर्यात करता शासकीय संस्था निर्माण केली. तिचे नाव जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट कौन्सिल, दिल्ली. तिच्यामार्फत गुणवत्तानियंत्रण, प्रमाणीकरण, रत्न निर्मिती, निर्यातीचे, कुशल कारागीर निर्मितीचे कार्य अशी कामे की जातात. परंतु नाव साधर्म ठेवून दिल्ली, जयपूर येथे अत्यंत साध्या पत्र्याचे शेडमधून आंतरराष्ट्रीय नावे घेऊन सर्टिफिकेशन वाटप केले जाते. हजारो लोकांचे लुटीस हातभार लावला जातो की काय? असा प्रश्न पडतो.

संत तुकाराम महाराज यांचे शब्दात आम्हा घरी शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे म्हणत आपण सर्वांनी याबाबत कालसुसंगत असे प्रबोधन करणे जरुरीचे वाटते. प्रयत्नवाद नष्ट करणारा, कष्टाचे अवमूल्य करणारा व त्यातून अपयश आल्यामुळे नैराश्य, चिंता, आत्महत्या अशा गोष्टीने समाजव्यवस्था उध्वस्त करणारी ही परावलंबी वृत्ती संपुष्टात येणे गरजेचे आहे.

(लेखक अंधश्रध्दा निर्मूलन कार्यकर्ता आहेत.)

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले