छायाचित्र : एक्स (एकनाथ शिंदे)
संपादकीय

एकनाथ शिंदे पॉवरफुल्ल नेते होतायत!

एकनाथ शिंदे यांची ताकद वाढली आहे. शिंदे हे पक्षवाढीकरिता तुफान मेहनत घेत आहेत. सामान्यांचे प्रश्न केवळ फोनवर सोडवत आहेत. वेळप्रसंगी ते देवेंद्र फडणवीस यांच्याही पुढे जातील, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

अरविंद भानुशाली

सह्याद्रीचे वारे

अरविंद भानुशाली

एकनाथ शिंदे यांची ताकद वाढली आहे. शिंदे हे पक्षवाढीकरिता तुफान मेहनत घेत आहेत. सामान्यांचे प्रश्न केवळ फोनवर सोडवत आहेत. वेळप्रसंगी ते देवेंद्र फडणवीस यांच्याही पुढे जातील, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

महायुतीमध्ये सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गेम पॉवरफुल ठरला असून दिल्ली दरबारी त्यांचे वजन वाढले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) च्या सहा खासदारांना आपल्याकडे खेचण्यात शिंदे यांना यश आले. शिवसेनेमधील शिंदे यांनी घडवलेले हे दुसरे बंड यशस्वी झाले असून आता सर्वांचे लक्ष उबाठाचे आमदार व नागरसेवकांकडे लागले आहे. मुंबई महापालिकेतील २० ते २२ नगरसेवक शिंदे यांच्याकडे येऊ शकतात. मात्र त्यांना फूट यशस्वी करण्याकरिता ४६ ते ४८ नगरसेवकांची आवश्यकता आहे, तर उबाठाच्या २० आमदारांपैकी १५ आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे खात्रीलायकरीत्या सांगण्यात येते. फुटलेल्या सहा खासदारांपैकी दोन खासदार हे उबाठाकडे परत येणार होते. परंतु उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शिवीगाळ केल्याने हे दोन खासदार शेवटी शिंदे यांच्या गटातच राहिले.

शिवसेनेला बंड हे काही नवीन नाही. शिवसेनाप्रमुख हयात असताना बंड झाले, परंतु ते बाळासाहेबांनी मोडून काढले. सुरुवातीला शिंगरे बंधू यांनी बंड केले होते. त्यावेळी शिवसेनेची दहशत एवढी प्रचंड होती की शिंगरे बंधूंना चिलखत चढवून फिरावे लागले होते. हेमचंद्र गुप्ते, १९९१ मध्ये छगन भुजबळ, २००२ मध्ये नारायण राणे, २००४ मध्ये राज ठाकरे व त्यानंतर २०२२ मध्ये सत्तेत असताना आठ मंत्री व ४० आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी ७५ टक्के शिवसेना फोडली. त्या दिवसापासून शिवसेनेला खऱ्या अर्थाने घरघर लागली. निवडणूक आयोगाने तर शिवसेना ही पूर्णपणे एकनाथ शिंदेंच्या दावणीला बांधली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ मध्ये उभारलेली शिवसेना ही आयोगाने एकनाथ शिंदेंच्या हातात सोपवली. एवढेच नाही, तर त्यांची धनुष्यबाण ही निशाणी एकनाथ शिंदे यांना देऊन टाकली. त्यामुळे खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे हे पोरके झाले. ही अधोगती पुढे कायम राहिली. शिंदेंच्या बंडाने उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपदही गेले आणि त्यांना विधानसभेला सामोरे न जात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता ९ पैकी ६ खासदार फुटले व शिंदेंच्या कळपात जाऊन बसले. अशा तऱ्हेने उबाठाचे पानिपत झाले आहे. मुख्य म्हणजे एवढे सगळे होऊनही उद्धव ठाकरे हे आत्मचिंतन करण्यास तयार नाहीत. उलट ते आपली शिवसेना काँग्रेसच्या कळपात नेऊन बांधायला इच्छुक दिसतात. कारण शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे-काँग्रेसमध्ये विलीनीकरण करून देशात एक नवी राजकीय शक्ती निर्माण केली पाहिजे, अशी भावना व्यक्त केली होती. शिवसेना नेस्तनाबूत करण्याचे काम संजय राऊत करत आहेत. उबाठाचे चारच खासदार शिंदेंच्या संपर्कात आहेत, असे बोलले जात होते. काठावर बसलेल्या दोन खासदारांना उबाठामध्ये परत आणणे अशक्य नव्हते. परंतु उद्धव यांनी त्याकरिता ठोस प्रयत्न तर केले नाहीच. पण संजय राऊत यांनी टीव्ही कॅमेऱ्यांसमोर या खासदारांना शिवीगाळ करून खेळ खराब केला. हीच परिस्थिती २०२२ मध्ये ४० आमदार फुटून बाहेर गेले तेव्हा झाली होती. त्यावेळीही संजय राऊत यांनी या आमदारांना रेड्याची उपमा देऊन त्यांना गुवाहाटी येथे बळी देण्यासाठी नेले असल्याची भाषा केली. त्यामुळे या आमदारांमध्ये संताप व्यक्त केला गेला. प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय पक्षात विलीन व्हावे ही भूमिका राऊत यांनी मांडण्याची आवश्यकता नव्हती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीरपणे म्हटले होते की, 'माझी शिवसेना काँग्रेस झाली तर मी ती बरखास्त करून टाकेन.' परंतु येथे तर मित्रपक्ष भाजपची साथ सोडून शिवसेनेने काँग्रेस पक्षाच्या मदतीने मुख्यंमत्रीपद मिळवले. तेथूनच खऱ्या अर्थाने शिवसेनेची घसरगुंडी झाली.

सन २०१९ मध्ये भाजप व शिवसेना यांनी एकत्रित विधानसभेची निवडणूक लढवली होती. उद्धव यांनी हिंदुत्व सोडून सर्वधर्म समभाव या आधारावर सत्ता स्थापन केली. अडीच वर्षे कोरोना काळात सत्ता उपभोगली. परंतु त्यानंतर शिवसेनेचा ऱ्हास होत गेला. अडीच वर्षांत मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे मंत्रालयातही जाऊ शकले नाहीत. अशी सत्ता व मुख्यमंत्रीपद मिळवून उद्धव यांनी काय साध्य केले?

शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन उद्धव ठाकरे यांनी षण्मुखानंद सभागृहात, तर एकनाथ शिंदे यांनी गोरेगावमध्ये साजरा केला. ६० वा वर्धापन दिन म्हणजे पोक्त विचार आणि वृद्धत्वाकडे वाटचालीचे वर्ष. परंतु या दोन्ही मेळाव्यात ठाकरे-शिंदे यांनी निव्वळ परस्परांवर आरोप-प्रत्यारोप केले. उद्धव ठाकरे यांनी तर शेवटी भावविवश होऊन तुम्ही सांगा मी घरी बसतो, असे उदगार काढले. शिंदे यांनी प्रत्युत्तर देताना 'ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है' असे सांगून पुढील फुटीचे सूतोवाच केले. उद्धव ठाकरे म्हणाले की, सुरुवातीच्या काळात आम्हाला काँग्रेसने त्रास दिला. मात्र त्यानंतर काँग्रेसशी आमचे चांगले संबंध राहिले. त्याला प्रत्युत्तर देताना शिंदे यांनी काँग्रेसने शिवसेना कशी फोडली, याची उदाहरणे दिली. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे रजनी पटेल यांचा उल्लेख केला. रजनी पटेल त्यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांनी शिवसेना हा फॅसिस्ट पक्ष आहे व त्यावर बंदी आणावी, अशी मागणी केली होती. दिल्लीत त्यावेळी इंदिरा गांधींची सत्ता होती. शिवसेनेवर बंदी येणार हे जवळ जवळ निश्चित झाले होते. परंतु मुरली देवरा, बॅ. अंतुले यांनी मध्यस्थी केल्याने ती बंदी टळली. त्याच्या बदल्यात शिवसेनाप्रमुखांनी जाहीरपणे आणीबाणीचे समर्थन केले.

छगन भुजबळ यांनी काही आमदारांसह शिवसेना सोडली तेव्हा नागपूर अधिवेशनात सुधाकरराव नाईक यांनी भुजबळ यांना व त्यांच्या समर्थकांना संरक्षण दिले. भुजबळ मंत्रीही झाले. पुढे मुख्यमंत्री राहिलेले नारायण राणे यांनी शिवसेना सोडली ती काँग्रेसच्या आशीर्वादानेच. शिवसेना सोडताना त्यांना महसूल मंत्रीपद दिले. अशी अनेक उदाहरणे देता येतील. या सभेत एकनाथ शिंदे यांनी सहा खासदार फुटून आले यावर फारसा जोर दिला नाही. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. तत्पूर्वी महायुतीने ६ जागा बिनविरोध जिंकल्या आहेत, तर ११ जागांवर विरोधकांचे पानिपत होईल असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेनेचा पाया प्रथम मुंबईपुरता मर्यादित होता. प्रारंभी उडप्याच्या विरोधात आंदोलन केले. त्यांच्या हॉटेल व व्यवसायांवर दगडफेक केली. मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी असल्याने मुंबई महापालिकेवर शिवसेनेने अनेक वर्षे कब्जा केला होता. परंतु २०२५ मध्ये मुंबईतील शिवसेनेची सत्ता धुळीला मिळाली आणि तेथे भाजपने सत्ता ताब्यात घेतली. तीच परिस्थिती राज्यातील १९ महापालिकांमध्ये झाली. शिवसेनेकडे मुंबईनंतर संभाजीनगरची सत्ता होती. मोरेश्वर सावे हे एकेकाळी शिवसेनेचे पहिले महापौर झाले. परंतु मातोश्रीच्या वाढत्या नियंत्रणामुळे सावे शिवसेना सोडून गेले. आता त्यांचे चिरंजीव अतुल सावे भाजपचे मंत्री आहेत. असे अनेक मोहाेरे शिवसेना सोडून गेले. मनोहर जोशी यांना कुठलेही कारण नसताना मुख्यमंत्रीपदावरून काढले. रातोरात ते दादरला निघून गेले. एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्याला शिवाजी पार्कच्या सभेत अपमानित केले गेले. स्टेजवरून उतरताना त्यांचे डोळे पाणावले होते. हा इतिहास उद्धव यांच्या काळातला आहे. ज्यांनी आयुष्यभर बाळासाहेबांची साथ सोडली नाही त्यांची अवस्था अशी झाली होती. अशी असंख्य उदाहरणे देता येतील.

नारायण राणे, राज ठाकरे हे शिवसेना सोडून बाहेर पडले. राज यांनी माझ्या विठ्ठलास बडव्यांनी घेरले असल्याचा उल्लेख केला होता. आता तीच स्थिती उद्धव ठाकरे यांची आहे. शिवसैनिकांमध्ये संजय राऊत यांच्याबद्दल तीव्र नाराजी आहे. परंतु एवढे झाल्यानंतरही उद्धव ठाकरे आत्मचिंतन करण्यास तयार नाहीत. एकनाथ शिंदे यांची ताकद वाढली आहे. शिंदे हे पक्षवाढीकरिता तुफान मेहनत घेत आहेत. सामान्यांचे प्रश्न, चिठ्ठ्या-चपाट्या, नुसत्या फोनवर काम करून देतात. हे लोकांच्या लक्षात आल्याने त्यांच्यामागे प्रचंड गर्दी असते. वेळ प्रसंगी ते देवेंद्र फडणवीस यांच्याही पुढे जातील, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

आजचे राशिभविष्य,२२ जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

मांड्या-पोटावरील चरबी कमी करायची? रोज सकाळी जिऱ्याचं पाणी पिण्याची सवय लावा

Pune Rain : उकाड्याने हैराण पुणेकरांना पावसाचा दिलासा! शहरातील अनेक भागांत बरसल्या सरी

NEET UG 2026 Re-Exam : उशिरा पोहोचल्याने दोन विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारला; गेट बंद होताच गोंधळ

BEST संपामुळे महामुंबई मेट्रोचा नवा विक्रम; एका दिवसात ३ लाख ५७ हजारांहून अधिक प्रवाशांचा प्रवास