

नीट (NEET) परीक्षेसाठी काही मिनिटांचा उशीर दोन विद्यार्थ्यांच्या चांगलाच अंगलट आला. रविवारी (दि.२१) देशभरात NEET परीक्षा सुरू असताना, परळ येथील महर्षी दयानंद महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचलेल्या दोन विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.
परीक्षा केंद्र प्रशासनाने नियमानुसार ठरलेल्या वेळेनंतर मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवले. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी केंद्राबाहेर नाराजी व्यक्त केली. प्रवेश नाकारण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी कुर्ला येथील तर दुसरा डोंबिवली परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, अशीच घटना कर्नाटकमधील बेंगळुरूमध्येही घडली. तेथे चार विद्यार्थ्यांना दुपारी १.३० नंतर परीक्षा केंद्रावर पोहोचल्यामुळे प्रवेश मिळाला नाही. वाहतूक कोंडी आणि काँग्रेसच्या रॅलीमुळे उशीर झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
१.३० वाजताच गेट बंद
एएनआयच्या वृत्तानुसार, दुपारी १.२९ वाजता परीक्षा केंद्रावरून शेवटच्या क्षणाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर नेमके १.३० वाजता NEET च्या नियमांनुसार मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
यावेळी तीन विद्यार्थिनी दुपारी १.३२ वाजता केंद्रावर पोहोचल्या. मुख्य गेट बंद असल्याचे पाहून त्यांनी रेलिंग ओलांडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र परीक्षा हॉलकडे जाणारे आतील गेटही बंद असल्याने त्यांना प्रवेश मिळू शकला नाही. आणखी एका विद्यार्थ्यालाही अवघ्या एका मिनिटाच्या उशिरामुळे परीक्षा देता आली नसल्याचे सांगितले जात आहे.
पालकांचा संताप
बेंगळुरूमधील विद्यार्थ्यांच्या पालकांनी रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसच्या रॅलीमुळे वाहतूक विस्कळीत झाली होती आणि वाहतूक नियंत्रणासाठी पुरेसे पोलिस कर्मचारी तैनात नव्हते, असे त्यांचे म्हणणे आहे.
“आम्ही वेळेत घरातून निघालो होतो. मात्र वाहतूक कोंडीत अडकलो. आमच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे,” अशी प्रतिक्रिया एका पालकाने दिली.
पालकांनी परीक्षा केंद्र प्रशासनाकडे विनंती करूनही विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला नसल्याचा आरोप केला आहे. रेलिंग ओलांडून आत गेल्यानंतरही विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश मिळाला नाही.
नियमांमध्ये कोणतीही सवलत नाही
परीक्षा अधिकाऱ्यांनी मात्र राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आल्याचे स्पष्ट केले. दुपारी १.३० नंतर कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश देता येत नाही, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, देशभरात कडक सुरक्षा व्यवस्थेत NEET-UG परीक्षा पार पडत असून, परीक्षा प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.