बांधापासून महामार्गापर्यंतचा विकास प्रवास! 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
संपादकीय

बांधापासून महामार्गापर्यंतचा विकास प्रवास!

या दिवाळीत आपण केवळ आपल्या घरात दिवे लावू नयेत, तर एखाद्या गरजूच्या आयुष्यातही आनंदाचा दिवा लावूया. शेतकऱ्याच्या कष्टाचा सन्मान करूया, महिलांच्या स्वप्नांना बळ देऊया, तरुणांच्या आकांक्षांना संधी देऊया आणि आपल्या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येऊया.

नवशक्ती Web Desk

विशेष

एकनाथ शिंदे

या दिवाळीत आपण केवळ आपल्या घरात दिवे लावू नयेत, तर एखाद्या गरजूच्या आयुष्यातही आनंदाचा दिवा लावूया. शेतकऱ्याच्या कष्टाचा सन्मान करूया, महिलांच्या स्वप्नांना बळ देऊया, तरुणांच्या आकांक्षांना संधी देऊया आणि आपल्या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येऊया.

दिवाळी हा केवळ दिव्यांचा आणि रोषणाईचा सण नाही, तर आपल्या आयुष्यातील दुःख, अडचणी आणि संकटांवर मात करून नव्या उमेदीने पुढे जाण्याची प्रेरणा हा सण देतो.

मी जेव्हा बांधापासून महामार्गापर्यंत महाराष्ट्राचा कसा विकास झाला असं म्हणतो तेव्हा अर्थातच माझं पहिलं प्राधान्य हे आपल्या अन्नदात्याच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या बांधाला आहे.

काळी दिवाळी होऊ देणार नाही : दिवाळी आनंदात साजरी करत असताना शेतकऱ्याच्या घरावर दुष्काळाचे सावट आहे हे आपण विसरता कामा नये. कारण शेवटी शेतकरी आनंदी तर सगळी अर्थव्यवस्था आनंदी. त्याच्या कष्टावर आपले अन्नधान्य, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि समाजाचे जीवन अवलंबून आहे. कोविडच्या भयानक साथीमध्ये आपण याचा अनुभव घेतला आहे. गेली दोन-तीन वर्ष अतिवृष्टीमुळे त्रासून गेलेला शेतकरी सध्या दुष्काळात होरपळून निघाला आहे. निसर्गाच्या लहरीपणापुढे कोणाचं काय चालणार?

म्हणूनच शेतकऱ्याला केवळ मदत देऊन थांबणे पुरेसे नाही, तर त्याला संकटातून कायमस्वरूपी बाहेर काढणे गरजेचे आहे हे ओळखून महायुती सरकारने पूर्ण तयारीनिशी पावले उचलली आहेत. दुष्काळ पडल्यामुळे सरकारी चौकटीत जे जे काही करण्यासारखं आहे ते तर करतोच आहोत, शिवाय एक जबाबदार पक्ष म्हणून आज प्रत्येक शिवसैनिक शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचला आहे. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही हा निर्धार करून त्यांना आम्ही मोफत धान्याचे लाखो कीट दिले आहे, स्वयंरोजगारासाठी शेतकरी महिलांना शिलाई मशीन, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप केले आहे. शेती असेल तर गावात समृद्धी आहे. त्यामुळे जलसंधारण, शेततळी, पाणलोट विकास, सिंचन सुविधा आणि पाण्याचे योग्य नियोजन यांना प्राधान्य देऊन काम सुरू केले आहे. दुष्काळाचा सामना करण्यासाठी केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता गावागावांत पाण्याची शाश्वत व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. नुकतेच आम्ही मराठवाडा वॉटर ग्रीडच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत.

महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेच्या माध्यमातून ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांना मोफत वीज दिली जात आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी, पीक विमा, नैसर्गिक आपत्तीतील नुकसानभरपाई, सौर कृषिपंप, नैसर्गिक शेती आणि आता मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजना अशा विविध माध्यमांतून शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न सुरू आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांपासून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येकाला न्याय मिळावा, हीच आपली भूमिका आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य भाव मिळाला पाहिजे. त्याच्या शेतमालाला बाजारपेठ मिळाली पाहिजे. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली पाहिजे. आज कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक सिंचन पद्धती आणि सौरऊर्जा यांसारख्या सुविधा शेतीत नवे बदल घडवू शकतात. शेती परवडणारी, फायदेशीर आणि पुढच्या पिढीलाही आकर्षक वाटणारी झाली पाहिजे. बळीराजा आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला, तरच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र समृद्ध होईल.

सामान्य माणसाच्या कल्याणाचा ध्यास : महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करताना आमच्या राजकीय विचारांची दिशा स्पष्ट आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांनी सेवाभाव आणि माणुसकीचा आदर्श आमच्यासमोर ठेवला. आमच्यासाठी राजकारण हे सत्तेसाठी नसून जनतेची सेवा करण्याचे माध्यम आहे. राज्याचा विकास करताना गरीब, शेतकरी, कामगार, महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि समाजातील प्रत्येक घटकाचा विचार झाला पाहिजे. विकास हा केवळ मोठ्या इमारती, रस्ते किंवा उद्योगांपुरता मर्यादित नसतो. एखाद्या गरीब कुटुंबाला घर मिळणे, एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी मिळणे, एखाद्या महिलेला स्वतःच्या पायावर उभे राहता येणे आणि एखाद्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसणे, हाच खरा विकास आहे.

याच विचारातून महायुती सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, युवकांसाठी कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी, अशा विविध योजनांच्या माध्यमातून समाजातील वेगवेगळ्या घटकांना आधार देण्याचे काम केले आहे. आमच्या महायुती सरकारच्या काळात पायाभूत सुविधांच्या विकासालाही मोठी गती मिळाली आहे. अटल सेतू, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, मुंबईतील कोस्टल रोड, मेट्रोचे विस्तारणारे जाळे, महामार्ग आणि विविध नागरी विकास प्रकल्प यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळत आहे. या प्रकल्पांमुळे प्रवासाचा वेळ कमी होणार आहे, उद्योगांना चालना मिळणार आहे आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या शहरांबरोबरच राज्यातील लहान शहरे आणि ग्रामीण भागाचाही समतोल विकास झाला पाहिजे, यासाठी आमचा प्रयत्न आहे. गावात चांगले रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, शिक्षण आणि रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. ग्रामीण भागातील तरुणाला नोकरीसाठी शहरांकडे धाव घ्यावी लागू नये, तर त्याच्या गावातच रोजगार आणि उद्योगाच्या संधी निर्माण व्हाव्यात, हे आपले स्वप्न आहे.

गुंतवणूक, उद्योग आणि रोजगाराच्या नव्या संधी : महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक प्रगत आणि औद्योगिकदृष्ट्या पुढारलेले राज्य आहे. देश-विदेशातील गुंतवणूक महाराष्ट्रात यावी, नवीन उद्योग सुरू व्हावेत आणि आपल्या तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मी स्वतः दोन वेळेस दावोस इथे जाऊन आलो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा जाऊन अनेक करार करून आले. दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत झालेल्या गुंतवणूक करारांमधून महाराष्ट्रासाठी मोठ्या संधी निर्माण झाल्या. आज या करारातले ८५% करार कुठल्या आणि कुठल्या पातळीवर प्रत्यक्षात उतरत आहेत. गडचिरोलीसारख्या जिल्ह्याचा औद्योगिक विकास, विदर्भातील स्टील कॉरिडॉर, वाढवण बंदराचा विकास आणि विविध औद्योगिक धोरणे यामुळे राज्याच्या विकासाला नवी गती मिळणार आहे. विकासाचा हा प्रवास मुंबई-पुण्यापुरता मर्यादित न राहता विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणापर्यंत पोहोचला पाहिजे.

नव्या भरारीचा संकल्प : आज आम्ही विकासाची जी काही प्रेरणा घेतली आहे ती देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याकडून. त्यांनी आम्हाला फक्त स्वप्न पाहायला शिकवले नाही तर कसे जगायचे ते सांगितले. सार्वजनिक जीवनात २५ वर्षे देशाची सेवा करणारे मोदीजी आजही आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान आहेत आणि एखाद्या दीपस्तंभासारखे ते आम्हाला कायम मार्गदर्शन करत राहतील. आज आपण विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करत आहोत. त्यामध्ये महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. २०४७ पर्यंत विकसित महाराष्ट्र घडवण्याचा आणि राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्यासाठी आमची यशस्वी वाटचाल सुरू आहे. हा केवळ आकड्यांचा विषय नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावणे, प्रत्येक तरुणाला संधी मिळणे, प्रत्येक शेतकरी कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळणे आणि प्रत्येक गावात विकास पोहोचणे, हा या संकल्पाचा खरा अर्थ आहे.

येत्या काळात महाराष्ट्र उद्योग, तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य, शेती, पर्यटन आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात मोठी भरारी घेणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, डिजिटल तंत्रज्ञान आणि नव्या उद्योगांमध्ये महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल, असा मला विश्वास आहे. एक-दीड वर्षापासून आपण प्रशासनातही खूप बदल घडवले आहेत आणि अधिक कार्यक्षमता मिळवली आहे. हे सगळे करताना आपली संस्कृती, परंपरा, भाषा आणि सामाजिक एकोपा जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीचा हा प्रवास सरकारचे एकट्याचे काम नाही. त्यासाठी शेतकरी, कामगार, उद्योजक, शिक्षक, डॉक्टर, कर्मचारी, तरुण आणि महिलांसह प्रत्येक नागरिकाचे योगदान आवश्यक आहे. सरकार योजना तयार करू शकते, सुविधा निर्माण करू शकते; पण त्यांना यशस्वी करण्यासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा असतो.

दिवाळीचा प्रकाश आपल्याला एकतेचा आणि सकारात्मकतेचा संदेश देतो. समाजात कोणताही भेदभाव न ठेवता एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची शिकवण देतो. आज महाराष्ट्राला याच एकजुटीची, परिश्रमाची आणि सकारात्मक विचारांची गरज आहे.

या दिवाळीत आपण केवळ आपल्या घरात दिवे लावू नयेत, तर एखाद्या गरजूच्या आयुष्यातही आनंदाचा दिवा लावूया. शेतकऱ्याच्या कष्टाचा सन्मान करूया, महिलांच्या स्वप्नांना बळ देऊया, तरुणांच्या आकांक्षांना संधी देऊया आणि आपल्या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येऊया. आपला महाराष्ट्र अधिक समृद्ध, सक्षम, स्वयंपूर्ण आणि विकसित करण्याचा संकल्प या दीपावलीच्या शुभमुहूर्तावर करूया.

उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

Mumbai : एफडीएने ४३ परवाने केले निलंबित; १७.८ टन साठा केला जप्त, दिवाळीत FDA ची मोठी कारवाई

दिवाळीच्या मुहूर्तावर कतरिना-विकीने पहिल्यांदाच दाखवला मुलाचा चेहरा! छोट्या विहानच्या गोड फोटोने वेधलं लक्ष

Mumbai : पावसासंबंधी माहिती वॉलवर; मुख्यालयासह परळ येथील नियंत्रण कक्ष होणार हायटेक

Mumbai : स्थायी समितीत जोरदार आतषबाजी; आधी खर्च, नंतर मंजुरी; स्थायी समितीत ५ ते ७५ लाखांचे ९० टक्के प्रस्ताव

Mumbai : केईएमचा ४२२ कोटींचा शैक्षणिक संकुल प्रकल्प; BMC डिसेंबरमध्ये काढणार निविदा