स्वातंत्र्य ही तर व्यक्तीसापेक्ष कलाकृती 
संपादकीय

स्वातंत्र्य ही तर व्यक्तीसापेक्ष कलाकृती

स्वातंत्र्य ही संकल्पना जितकी राजकीय तितकीच नैतिक, जितकी सामाजिक तितकीच आर्थिक, जितकी सांस्कृतिक तितकीच नैसर्गिक भावना आहे. त्यामुळे व्यक्ती असो की सार्वभौम राष्ट्र, त्याचे स्वातंत्र्य बाधित करण्याचा दुसऱ्या कोणालाही अधिकार असत नाही.

नवशक्ती Web Desk

अस्वस्थ वर्तमान

डॉ. प्रवीण बनसोड

स्वातंत्र्य ही संकल्पना जितकी राजकीय तितकीच नैतिक, जितकी सामाजिक तितकीच आर्थिक, जितकी सांस्कृतिक तितकीच नैसर्गिक भावना आहे. त्यामुळे व्यक्ती असो की सार्वभौम राष्ट्र, त्याचे स्वातंत्र्य बाधित करण्याचा दुसऱ्या कोणालाही अधिकार असत नाही.

स्वातंत्र्य हा एक बहुआयामी शब्द. खरंतर स्वातंत्र्य या शब्दातच जादू आहे. बहुरंगी आणि बहुढंगी भावना आहे. प्रत्येक शब्दात कोणती ना कोणती भावना दडलेली असते. 'स्वातंत्र्य' या शब्दात असणारी भावना तर आणखीन वेगळी आहे, कारण व्यक्ती बदलला की स्वातंत्र्याची भावनाही बदलत जाते. 'स्वातंत्र्य' ही अशी कलाकृती आहे जी प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारे साकारली जाते. व्यक्तीला त्याच्या मनाप्रमाणे आनंदाने जगता येणे, नैसर्गिक मानवी अधिकार प्राप्त होणे हा स्वातंत्र्याचा अर्थ व्यक्तीनुसार सुद्धा बदलत असतो. असमानतेकडून समानतेकडे, वंचिततेकडून विपुलतेकडे, अक्षमतेकडून सक्षमीकरणाकडे असा स्वातंत्र्याचा प्रवास.

आजपासून आठशे वर्षांपूर्वी सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांनी, 'स्वातंत्र्य हा मोक्षः पारतंत्र्य हा बंध' असे म्हटले होते. प्रत्येक व्यक्ती ही जन्मतः स्वतंत्र असते, तिला इतर कृत्रिम भेद नसतात, असेच श्री चक्रधर स्वामी म्हणत असत.

स्वातंत्र्य ही विकासाची पहिली अट असून विकास करायचा असेल तर स्वातंत्र्य लागतेच. आमच्या राज्यघटनेची प्रास्तविका 'वुई द पिपल' अशी सुरुवात करते, हा त्याचाच उच्चार आहे. 'स्वातंत्र्य' असते तेव्हाच विकास, त्यापुढील आव्हाने आणि त्यासाठी हव्या असणाऱ्या संधी यांची शक्यता असते. सोबतच बंधुता, समता, सामाजिक न्याय व त्यासाठी लोकशाही राज्यव्यवस्था आदी मूल्ये लागतात. विकासासाठी आणखी काय काय लागते, हे आम्ही आमच्या संविधानाच्या प्रास्ताविकेत नमूद केले असून विकासाच्या नव्या वाटा या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतून सुरू होतात.

"स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेपासून मुक्त होणे नव्हे. खरे स्वातंत्र्य तेव्हाच मिळते जेव्हा समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान हक्क, न्याय आणि सन्मान मिळतो. जर एखाद्या देशात गरीब, शोषित आणि दुर्बल लोकांवर अन्याय होत असेल, तर त्या देशाला पूर्णपणे स्वतंत्र म्हणता येणार नाही. त्यामुळे स्वातंत्र्याचा खरा अर्थ म्हणजे समाजातील सर्व प्रकारच्या शोषणाचा अंत आणि सर्वांसाठी समान संधी निर्माण करणे होय" असे शहीद भगतसिंग म्हणतो, तर महात्मा गांधी यांच्या मते, "स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय स्वातंत्र्य नव्हे, तर सत्य, अहिंसा आणि नैतिक मूल्यांवर आधारित जीवन होय."

शहीद भगतसिंग असे म्हणतो, "खरे स्वराज्य काही लोकांकडे सत्ता आल्याने नव्हे, तर सर्व लोकांना अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची क्षमता आल्याने मिळते. निरपराध लोकांच्या रक्ताने माखलेले स्वातंत्र्य आणि लोकशाही पवित्र राहात नाहीत." महात्मा गांधी यांच्या मते, स्वातंत्र्य म्हणजे नैतिकता, जबाबदारी, अहिंसा आणि सर्वांच्या कल्याणाशी जोडलेले मूल्य आहे, तर कार्ल मार्क्स यांच्या मते, "खरे स्वातंत्र्य तेव्हाच संभवते जेव्हा माणूस आर्थिक शोषणापासून मुक्त होतो. स्वातंत्र्य म्हणजे फक्त वैयक्तिक हक्क नव्हे, तर समाजातील सर्वांना समान आर्थिक आणि सामाजिक संधी मिळणे होय."

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, "राजकीय स्वातंत्र्य मिळवणे ही महत्त्वाची गोष्ट असली, तरी समाजात जर समता नसेल, भेदभाव आणि अन्याय

असेल, तर त्या स्वातंत्र्याचा उपयोग सर्वांना समान रीतीने होत नाही. खरे स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीला समान हक्क, संधी आणि सन्मान मिळणे होय. स्वातंत्र्य टिकवण्यासाठी समता आणि बंधुता आवश्यक आहेत; अन्यथा ते केवळ नावापुरते राहते. स्वातंत्र्य फक्त देश स्वतंत्र होणे नसून, समाजातील प्रत्येक माणूस खऱ्या अर्थाने मुक्त आणि समान असणे महत्त्वाचे आहे."

याचा अर्थ स्वातंत्र्य ही संकल्पना जितकी राजकीय तितकीच नैतिक, जितकी सामाजिक तितकीच आर्थिक, जितकी सांस्कृतिक तितकीच नैसर्गिक भावना आहे. त्यामुळे व्यक्ती असो की सार्वभौम राष्ट्र, त्याचे स्वातंत्र्य बाधित करण्याचा दुसऱ्या कोणालाही अधिकार असत नाही. स्वातंत्र्य हे मानवी मूल्य असल्यामुळे इतरांच्या स्वातंत्र्याचा सन्मान करणे सर्वांचेच आद्य कर्तव्य असते. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या भांडवली युद्धज्वराच्या पार्श्वभूमीवर हे स्वातंत्र्याचे मुक्त चिंतन नव्याने विचार करायला प्रवृत्त व्हावे असेच आहे.

आजचे जग अतिशय भीषण युद्धखोर मानसिकतेवर उभे आहे. युद्ध केल्याशिवाय सत्ता आणि संपत्ती निर्माण करता येत नाही, हे सूत्र ध्यानात घेऊन खरा किंवा खोटा शत्रू इतरांसमोर उभा करणे आणि त्या विरोधकाला युद्धासाठी तयार करणे ही मानसिकता जगभरातील युद्धखोर जोपासत आहेत. विरोधकाचा वैचारिकदृष्ट्या विरोध न करता युद्धासाठी तयार करणे आणि सत्तेच्या जोरावर विरोधकाला युद्धात हरविणे किंवा युद्धास तयार न झाल्यास आपल्या बाजूने उभे करणे, या युद्धपिपासू विचारांवर जगभरातील सत्ताधारी सत्ता गाजवित आहेत.

पहिले जागतिक महायुद्ध १९१४ मध्ये सुरू झाले. लाखो गाव-शहरे आणि अनेक देश युद्धाच्या रणांगणावर होरपळून निघाले. लाखो स्त्रिया आणि लहान मुले बळी गेले. अन्न-वस्त्र-निवारा औषधाअभावी हजारो स्त्रियांवर अत्याचार झाले.

युद्ध मग ते कोणतेही असो त्यामध्ये स्त्रिया आणि बालकांचाच सर्वात आधी बळी जात असतो. शस्त्रास्त्रांचे कारखाने काढून जे देश आणि भांडवलदार बहुराष्ट्रीय कंपन्या गडगंज संपत्ती कमावतात तेच एका देशाविरुद्ध दुसऱ्या देशाची युद्धे पेटवतात. सामान्य नागरिक, स्त्रिया, मुलांचे एकमेकांविरुद्ध काय वैर आहे की त्यांनी एकमेकांची कत्तल करावी आणि मरावं! त्यामुळेच उपलब्ध साधनांचा आणि नवतंत्रज्ञानाचा उपयोग माणसाला जगवण्यासाठी व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करणे गैर ठरणार नाही.

दुसरे महायुद्ध १९३९ साली पेटले. पहिल्यापेक्षाही भीषण परिस्थिती निर्माण झाली. लाखो लोक मारले गेले. आताचे युद्ध मात्र पूर्वपिक्षा फार वेगळे आहे. प्रत्यक्ष रणांगणावर लढण्यापेक्षा नवतंत्रज्ञान आणि

आर्थिक कोंडी हे आजच्या युद्धाचे मुख्य शस्त्र आहेत. या शस्त्रांचा उपयोग नवतंत्रज्ञानाने प्रगत आणि बलाढ्य देश दुसऱ्या राष्ट्रांविरुद्ध करताना दिसत आहेत. युद्ध पूर्वीचे असो की आत्ताचे, एक गोष्ट मात्र खरी आहे की, तेव्हाही माणूस मारला जात

होता आणि आताही माणूस मारला जातो आहे. अशावेळी मानवी स्वातंत्र्याचा जागर करणे अधिक गरजेचे बनले आहे.

लेखक हे प्रगतिशील लेखक संघाचे विदर्भ समन्वयक आहेत

Mumbai : प्रवाशांची होणार गैरसोय; उद्या पश्चिम व मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

Iran vs US-Israel War: तेल पुरवठ्यात अस्थिरता; इराणने अमेरिकेचा दावा फेटाळला

Mumbai : धक्कादायक! वृद्धाश्रमात ज्येष्ठ महिलेला झाडूने मारहाण; Video व्हायरल होताच संतापाची लाट

Mumbai : उद्धव ठाकरे यांच्याकडून एक्सपोर्ट-इम्पोर्ट लॉजिस्टिक्स कोर्सचा शुभारंभ; काय आहे खास? फी किती? जाणून घ्या

Iran vs US-Israel War: पत्नीशी फोनवर बोलताना मोठा स्फोट! सौदीतील हल्ल्यात भारतीय नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू