संपादकीय

सगळेच सोन्याच्या मागे का लागले आहेत ?

दिवाळी आणि त्यापाठोपाठ सुरू होणाऱ्या लग्नसराईमुळे भारतात सोन्याला झळाळी आली आहे. सोन्याचा दर उच्चांकी पातळीवर असतानाही ग्राहकांचा सोने खरेदीकडे कल आहे. व्यक्तिगत खरेदीबरोबरच संस्था, देश हेही सोने खरेदीत उतरत आहेत.

नवशक्ती Web Desk

देश-विदेश

- भावेश ब्राह्मणकर

दिवाळी आणि त्यापाठोपाठ सुरू होणाऱ्या लग्नसराईमुळे भारतात सोन्याला झळाळी आली आहे. सोन्याचा दर उच्चांकी पातळीवर असतानाही ग्राहकांचा सोने खरेदीकडे कल आहे. व्यक्तिगत खरेदीबरोबरच संस्था, देश हेही सोने खरेदीत उतरत आहेत.

सध्या सगळीकडे दिवाळीची रौनक आहे. बाजारपेठेत चैतन्य आहे. विशेष म्हणजे, सोन्याचा दर हा दहा ग्रॅमला (तोळे) ८० हजारांच्या पुढे गेला आहे. असे असले तरी सोन्याची झळाळी कमी झालेली नाही. सर्वसामान्य लोकं किंवा गुंतवणूकदार यांना सोन्याचे आकर्षण असणे स्वाभाविक आहे. मात्र, भारतीय रिझर्व्ह बँक, बलाढ्य चीन आणि इतर अनेक देश सोन्याच्या मागे लागले आहेत.

सुरक्षित आणि हमखास परतावा देणारी गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. अडचणीच्या वेळी सोनेच कामी येते. एक तर त्यावर कर्ज मिळते, ते गहाण ठेवता येते, प्रसंगी विकूनही टाकता येते. सोन्याच्या कर्जावरील व्याजाचा दर इतर कर्ज दरांपेक्षा कमी असतो. शिवाय सोन्याची विक्रीही जलद गतीने होते. म्हणजेच प्रसंगी रोकड लवकर हातात येते. याचा सारासार विचार करूनच भारतीय संस्कृतीत सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक सुरक्षित तर राहतेच, पण घसघशीत परतावाही त्यातून मिळतो. सण उत्सव असो की लग्नसमारंभ असो, अपत्यप्राप्ती होवो की साखरपुडा, कुठल्याही आनंदाच्या प्रसंगी सोन्याची खरेदी केली जाते. सध्या तर दिवाळीचा सण साजरा होत आहे. सोन्याच्या दरांनी उसळी घेतली आहे. ८१ हजारांच्या आसपास दर असले तरीही सोन्याची मागणी घटलेली नाही. जो-तो आपापल्या कुवती किंवा क्षमतेप्रमाणे सोन्याची खरेदी करतो.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारतातील बँकांची बँक म्हणजे सर्वोच्च बँक आहे. याच रिझर्व्ह बँकेने धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर तब्बल १०२ टन सोने लंडनहून भारतात आणले आहे. यापूर्वी मे महिन्यातही बँकेने अशाच प्रकारे सोने मायदेशी आणले होते. गेल्या दोन वर्षांत बँकेने तब्बल २१४ टन सोने भारतात आणले आहे. अद्यापही रिझर्व्ह बँकेचे ३२४ टन सोने हे बँक ऑफ इंग्लंडमध्ये सुरक्षितरीत्या पडून आहे. तर, भारतात ५१० टन सोने बँकेकडे आहे. म्हणजेच, तब्बल ८४० टन सोन्याची मालकी बँकेकडे आहे. ही बाब अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

रिझर्व्ह बँकेने गेल्या काही महिन्यांत १४ ते १५ टन सोने खरेदी केल्याचे सांगितले जात आहे. सद्यस्थितीत रशिया-युक्रेन आणि पश्चिम आशियातील (मध्य पूर्व) इस्रायल लेबनॉन, इस्रायल-हमास, इस्रायल-इराण यांच्यातील युद्धामुळे भूराजकीय बदलांचा वेध घेत रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतल्याचे दिसून येते. आपली सुवर्ण संपत्ती आपल्या ताब्यात आणि देशात राहावी, याला बँकेचे प्राधान्य दिसते. पश्चिम आशियातील युद्धाचा भडका आणखी उडाला किंवा अरब राष्ट्र या युद्धात उतरली तर परिस्थिती अतिशय गंभीर होण्याची चिन्हे आहेत. अशा स्थितीत आर्थिक आघाडीवर भारत स्थिर राहणे आवश्यक आहे. त्यासाठीची आवश्यक उपाययोजना म्हणूनही सोन्याच्या निर्णयाकडे पाहिले जात आहे.

तिकडे चीन सुद्धा सोन्याच्या मागे लागला आहे. चीनच्या 'पिपल्स बँक ऑफ चायना' या सरकारी बँकेनेही सोन्याच्या खरेदीचा सपाटा लावला आहे. गेल्या दीड वर्षांच्या काळात तब्बल २०० टनांहून अधिक सोन्याची खरेदी चीनने केली आहे. त्यामुळेच सोन्याचे दर ग्रॅमला ८ हजारांच्या पुढे गेले आहे. सर्वसाधारणपणे भारतातून सोन्याची सर्वाधिक आयात होते. वर उल्लेख केल्याप्रमाणे प्रथा, परंपरा, गुंतवणूक अशा विविध घटकांमुळे भारतीयांमध्ये सोन्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी सोन्याची आयात केली जाते. मात्र, जगातील आर्थिक, भूराजकीय आणि युद्धजन्य स्थिती लक्षात घेता चीनने आपला मोर्चा सोन्याकडे वळविला आहे. सोने हा असा धातू आहे ज्याच्या असण्याने आर्थिक आघाडीवर विश्वास आणि स्थिरता निर्माण होते. आगामी काळात युद्धाचा भडका आणखी उडाला तर देशोदेशीच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम होणे अपेक्षित आहे. चीनसारखा देश तर जगभरात आपल्या उत्पादनांची विक्री करतो. अजस्त्र उत्पादन क्षमतेमुळे चीनने देशोदेशीची बाजारपेठ काबीज केली आहे. पश्चिम आशियातील स्थिती चिघळली तर चिनी मालाची मागणी घटू शकते. त्याचबरोबर अन्य उत्पादने आणि वस्तूंची पुरवठा साखळी बाधित होऊ शकते. याचा मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन चीनने सोन्याची खरेदी करून त्याचा साठा वाढविण्याला प्राधान्य दिल्याचे दिसून येते. चीनमध्ये सध्या सोन्याचा २२ हजार टनाहून अधिक साठा आहे. तरीही जेवढे सोने खरेदी करता येईल, तेवढे करावे, असे चीनला वाटते. यामुळे जागतिक बाजारपेठेत सोन्याला मागणी प्रचंड वाढली आहे.

भारत किंवा चीन हे दोनच देश सोन्याच्या मागे धावत नाहीत. तर, जवळपास ५० हून अधिक देशांनी सोन्याच्या खरेदीला पसंती दिली आहे. यातून जागतिक अर्थकारणात सोन्याचे मूल्य वाढत आहे. मागणी आणि पुरवठ्याचे संतुलन बिघडल्याने त्याचा परिणाम दरावर झाला आहे. सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅमला ८५ हजारांचा आकडा ओलांडण्याची चिन्हे आहेत. फोब्जन सप्टेंबर महिन्यात प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, सोन्याचा साठा करण्यात भारत आठव्या स्थानी आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे. त्यांच्याकडे ८१३३ टन एवढे सोने आहे. त्यांच्यानंतर जर्मनी ३३५१ टन, इटली २४५१, फ्रान्स २४३६, रशिया २३३५, चीन २२६४, जपान ८४५, भारत ८४०, नेदरलँड ६१२, तर तुर्की ५८४ टन अशी सोने साठवणूक आहे.

एखाद्या देशाचे चलन आंतरराष्ट्रीय स्तरावर कमकुवत झाले तर सोन्याचा साठा त्या देशाची क्रयशक्ती आणि आर्थिक स्थिरता टिकवून ठेवण्यास मदत करतो. १९९१ मध्ये जेव्हा भारताची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती आणि वस्तूंच्या आयातीसाठीही भारताकडे पैसे नव्हते. त्यावेळी भारताने सोने गहाण ठेवून पैसे उभे केले आणि या आर्थिक संकटातून स्वतःला सुरक्षित बाहेर काढले. सोन्याचा भरपूर साठा असणे म्हणजे देशाची अर्थव्यवस्था मजबूत असणे. देश आपल्या पैशाचे व्यवस्थित व्यवस्थापन करतो हे देखील यावरून दिसून येते. अशा परिस्थितीत इतर देश आणि जागतिक वित्तीय संस्था त्या देशावर अधिक विश्वास ठेवतात. कोणत्याही देशाच्या चलन मूल्याला बळकटी आणण्यासाठी सोन्याचे साठे एक मालमत्ता म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतात. ही बाब ओळखून भारत, चीनसह अनेक देश सुवर्ण खरेदीच्या मागे आहेत. विशेष म्हणजे, युद्ध थांबवून शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी जगभरातून प्रयत्न होणे गरजेचे असताना आर्थिक स्थैर्य व सुरक्षिततेसाठी सोने खरेदी करण्यात अनेक देश धन्यता मानत आहेत. जागतिकीकरणाचे हे वरदान समजायचे की शाप ?

bhavbrahma@gmail.com

संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी व पर्यावरणाचे अभ्यासक आणि मुक्त पत्रकार.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी