@narendramodi/X
संपादकीय

शिवछत्रपतींचा कृतीतून सन्मान

देशाला अस्थिर बनवणाऱ्या दहशतवादी शक्तींचा बीमोड करण्यासाठी मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइक करून आपल्या कणखर धोरणाचा परिचय करून दिला होता.

नवशक्ती Web Desk

- केशव उपाध्ये

मत आमचेही

देशाला अस्थिर बनवणाऱ्या दहशतवादी शक्तींचा बीमोड करण्यासाठी मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइक करून आपल्या कणखर धोरणाचा परिचय करून दिला होता. प्रखर राष्ट्रवाद हा भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीचा प्राण आहे. छत्रपती शिवराय हे प्रखर राष्ट्रवादाचे आदर्श पुरुष मानले जातात. त्यांच्या विचारसरणीला मोदी सरकारने आणि महायुती सरकारने आपल्या अनेक निर्णयांतून अभिवादन केले आहे.

स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी विजापूरच्या आदिल शहाचा सरदार अफजल खान याने मराठी मुलखात हिंदू धर्मीयांच्या श्रद्धास्थानांची तोडफोड करण्याचा सपाटा लावला होता. बलाढ्य अफजल खानाच्या प्रचंड सैन्याने सुरू केलेल्या अत्याचारामुळे रयत हवालदिल झाली होती. स्वराज्यवर आलेले अफजल खानरूपी संकट परतवून लावण्यासाठी शिवछत्रपतींनी केलेला गमिनीकावा देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंदला गेला आहे. मोगल आणि आदिलशाही या दोन्ही शत्रूंना एकाचवेळी नमवणारा पराक्रमी योद्धा म्हणून शिवरायांची नोंद इतिहासाने घेतली आहे. अशा शिवरायांच्या अभिमानास्पद वारशाचे जतन करण्यासाठी भारतीय जनता पक्ष वचनबद्ध आहे. यासाठीच केंद्रातील मोदी सरकारने आणि राज्यातील महायुती सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. या निर्णयाचा एक भाग म्हणून व्हिक्टोरिया अ‍ॅण्ड अल्बर्ट वस्तुसंग्रहालय, लंडन येथून अफजल खानाचा वध करण्यासाठी शिवछत्रपतींनी वापरलेली ‘वाघनखे’ परत आणण्याचा निर्णय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रत्यक्षात आणला आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला अभिमानास्पद अशी ही घटना आहे. भारतीय जनता पक्षाने छत्रपती शिवरायांबद्दलचा आपला अभिमान अनेकदा विविध निर्णयांतून प्रकट केला आहे. शिवरायांच्या अद्वितीय पराक्रमाचे साक्षीदार असलेले राज्यातील गडकोट हे महाराष्ट्राचे भूषण आहे. या किल्ल्यांच्या जपणुकीसाठी एकूण १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये नामांकनासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. राज्यातील प्रतापगड, शिवनेरी, रायगड, राजगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, लोहगड, साल्हेर, खांदेरी, पन्हाळा हे ११ किल्ले तसेच तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याचा यात समावेश आहे. मराठा मिलिटरी लॅण्डस्केप अंतर्गत या किल्ल्यांच्या नामांकनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. शिवरायांचा पराक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा यामागे उद्देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २ सप्टेंबर २०२२ रोजी संपूर्ण स्वदेशी बनावटीची विक्रांत ही आधुनिक विमानवाहू युद्धनौका भारतीय नौदलाकडे हस्तांतरित करण्यात आली. या समारंभात पंतप्रधान मोदी यांनी भारतीय नौदलाच्या नवीन चिन्हाचेही अनावरण केले. त्यावेळी शिवाजी महाराज हे भारतीय नौदलाचे जनक आहेत, असा विशेष उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टकोनी राजमुद्रेवरूनच प्रेरणा घेत नौदलाचे नवीन बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे. मोदी सरकारने परकीय इंग्रजांच्या गुलामीचे जोखड झुगारून शिवरायांच्या स्वदेशी चिन्हाचा वापर केला आहे. भारतीय नौदलाच्या नवीन झेंड्यावर आता एकीकडे वर भारताचा तिरंगा आहे, तर त्याच्या बाजूला नौदलाचं हे बोधचिन्ह अगदी ठळकपणे आहे. छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेचा आकार आणि त्याला असलेली दुहेरी किनार यावरून प्रेरणा घेऊन ध्वजासाठी अशी नक्षी तयार करण्यात आली आहे. मोदी सरकारने नवीन संसद भवनात छत्रपती शिवाजी महाराज यांची गौरवगाथा स्थापित केली आहे. छत्रपती शिवरायांच्या राज्य कारभाराच्या धोरणाचा परिचयही संसदेच्या संग्रहालयात करून देण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी ६०० कोटी रुपये इतका निधी दिला. देखभालीअभावी अनेक किल्ल्यांची स्थिती बिकट झाली होती. ही स्थिती बदलण्यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पुढाकार घेण्यात आला. अलीकडेच राज्यातील महायुती सरकारने विशाळगडावरील अतिक्रमणे काढून टाकली. ही अतिक्रमणे हटविण्याची मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली होती. विशाळगडाला छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभूंच्या पराक्रमाचा इतिहास आहे. अतिक्रमणामुळे या इतिहासाला डाग लागला होता. हा डाग हटवण्यासाठी आवश्यक असलेली राजकीय इच्छाशक्ती महायुती सरकारने दाखवली.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना राज्यातील गड आणि किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या कोल्हापूरचे संभाजी राजे यांची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती केली. राजस्थानच्या धर्तीवर राज्यातील गड आणि किल्ले विकसित करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना समिती तयार केली. या समितीकडून गडकिल्ल्यांच्या संवर्धनाबरोबरच गडकिल्ल्यांचा विकास करण्याचे धोरण राबविले जात आहे. त्यानुसार राज्यातील ३० गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. ज्या प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता, त्याच प्रतापगडावर अफजल खानाचा बेकायदा दर्गा बांधला गेला होता. या अनधिकृत दर्ग्यावरून बुलडोझर फिरवण्याचे काम महायुती सरकारने केले. मोदी सरकारने देशाच्या संरक्षणासाठी छत्रपती शिवरायांच्या धोरणांचाच आदर्श ठेवला आहे. देशाला अस्थिर बनवणाऱ्या दहशतवादी शक्तींचा बीमोड करण्यासाठी मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइक करून आपल्या कणखर धोरणाचा परिचय करून दिला होता. प्रखर राष्ट्रवाद हा भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीचा प्राण आहे. छत्रपती शिवराय हे प्रखर राष्ट्रवादाचे आदर्श पुरुष मानले जातात. त्यांच्या विचारसरणीला मोदी सरकारने आणि महायुती सरकारने आपल्या अनेक निर्णयांतून अभिवादन केले आहे.

(लेखक भाजपचे प्रदेश प्रवक्ते आहेत.)

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले