संपादकीय

अतुल्य पर्यटन स्थळ म्हणून भारताला घडविताना

भारताचे पर्यटन क्षेत्र मोदी सरकारच्या काळात केवळ विश्रांतीपुरते मर्यादित न राहता रोजगार, विकास आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे प्रभावी साधन ठरले आहे. मोदी स्वतः सांस्कृतिक दूत बनून ‘ब्रँड इंडिया’ला जागतिक पातळीवर प्रतिष्ठा मिळवत आहेत.

नवशक्ती Web Desk

विशेष

रितेश अग्रवाल

भारताचे पर्यटन क्षेत्र मोदी सरकारच्या काळात केवळ विश्रांतीपुरते मर्यादित न राहता रोजगार, विकास आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे प्रभावी साधन ठरले आहे. मोदी स्वतः सांस्कृतिक दूत बनून ‘ब्रँड इंडिया’ला जागतिक पातळीवर प्रतिष्ठा मिळवत आहेत.

भारताची समृद्ध संस्कृती, आध्यात्मिक वारसा, नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक महत्त्व यामुळे भारत जगभरातील प्रवाशांसाठी एक ‘स्वप्नवत ठिकाण’ बनले आहे. तरीही सध्याच्या मोदी सरकारच्या काळातच या क्षेत्राला अर्थव्यवस्थेचा प्रमुख चालक आणि ऊर्जेचे साधन म्हणून प्राधान्य मिळाले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासूनच पंतप्रधान मोदींनी ही क्षमता ओळखली. भारतातील पर्यटन हे आता केवळ विश्रांतीपुरते मर्यादित राहिलेले नाही. आज ते रोजगारनिर्मितीचे साधन, राष्ट्रीय अभिमानाचा स्रोत आणि भारताला जागतिक नकाशावर ठळक स्थान मिळवून देणारे महत्त्वाचे क्षेत्र बनले आहे.

गेल्या दशकात भारतात वाहतुकीच्या पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. महामार्ग, रेल्वे आणि हवाई वाहतुकीचे जाळे दुर्गम भागात पोहचले आहे. स्वदेश दर्शन (संकल्पनेवर आधारित पर्यटन) आणि प्रसाद (तीर्थयात्रा पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक संवर्धन मोहीम) सारख्या योजनांनी लहान शहरे आणि ग्रामीण भागात रोजगार निर्माण करताना श्रद्धा आणि संस्कृतीचे प्राचीन मार्गही पुनरुज्जीवित केले आहेत. गेल्या दशकात बांधलेला प्रत्येक महामार्ग, विमानतळ आणि तीर्थक्षेत्र संचार मार्ग या केवळ पायाभूत सुविधा नाहीत, तर ते भारताच्या वारशाशी जोडणारे सेतू आहेत.

मोदींच्या दृष्टिकोनामुळे अतुल्य भारत २.० मध्ये नवीन प्राण फुंकले गेले आहेत, ज्यामध्ये अध्यात्म, वेलनेस, साहस आणि व्यवसाय पर्यटनावर भर देण्यात आला आहे. बौद्ध परिपथ, रामायण परिपथ, वाराणसीतील काशी विश्वनाथ संचारमार्ग आणि गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी यांसारखे विशेष परिपथ म्हणजे लाखो लोकांना आकर्षित करणारे महत्त्वाचे प्रकल्प आहेत. एकेकाळी दुर्घटनेने उद्ध्वस्त झालेले केदारनाथ २०२४ मध्ये १६ लाखांहून अधिक यात्रेकरूंचे स्वागत करण्यासाठी सरसावले जिथे एका दशकापूर्वी फक्त ४०,००० जण भेट देत असत.

महांकाल नगरी म्हणून पुनरुज्जीवित झालेल्या उज्जैनमध्ये २०२४ मध्ये ७.३२ कोटी पर्यटक आले. काशीने ११ कोटी यात्रेकरूंचे स्वागत केले, तर २०२३ मध्ये बोधगया आणि सारनाथने ३० लाखांहून अधिक साधकांना आकर्षित केले. अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर अवघ्या सहा महिन्यांत ११ कोटींहून अधिक भाविकांनी येथे भेट दिली. जगातील सर्वात मोठ्या अध्यात्मिक मेळाव्यातील महाकुंभ २०२५ मध्ये ६५ कोटींहून अधिक यात्रेकरू आले. केदारनाथचे पुनरुज्जीवन, काशीचे परिवर्तन आणि अयोध्येचा पुनर्जन्म हे दाखवून देतात की, श्रद्धा आणि पायाभूत सुविधा एकत्रितपणे प्रवासाची पुनर्परिभाषा कशी करू शकतात!

डिजिटल इंडिया आणि स्मार्ट सिटीजवर लक्ष केंद्रित केल्याने पायाभूत सुविधा आणि सुलभता आणखी सुधारली आहे. आधुनिक विमानतळ, सुधारित महामार्ग, सुधारित रेल्वे जोडणी आणि अखंड डिजिटल बुकिंग प्रणालीमुळे प्रवास अधिक सोयीस्कर आणि विश्वासार्ह झाला आहे. डिजिटल ॲप्स, बहुभाषिक हेल्पलाइन आणि शेवटच्या मैलापर्यंतचा संचारसंपर्क हे छोटे बदल वाटू शकतात, परंतु एकत्रितपणे त्यांनी भारताला जगातील सर्वात प्रवासी-अनुकूल ठिकाणांपैकी एक बनवले आहे. त्याचवेळी, शिथिल केलेले व्हिसा नियम आणि विस्तारित ई-व्हिसा धोरणामुळे परदेशी पर्यटकांच्या आगमनात लक्षणीय वाढ झाली आहे. सरकारने इको-पर्यटन, वेलनेस पर्यटन आणि साहसी खेळांना प्रोत्साहन दिले आहे. या उपक्रमांमुळे भारतीय पर्यटनाचा विकास शाश्वततेसोबत संतुलित झाला आहे. वारसा जपत पायाभूत सुविधा उभारणे आणि परंपरांना आधुनिकतेशी जोडणे, यामुळे पर्यटन क्षेत्राचे भविष्य अधिक सक्षम आणि सर्वसमावेशक झाले आहे.

भारताने जी-२० शिखर परिषदेसारख्या उच्चस्तरीय जागतिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याने केवळ आदरातिथ्यच नव्हे, तर सांस्कृतिक सघनता देखील दिसून आली. अशा प्रसंगांनी अधिक प्रवाशांना प्रोत्साहन दिले. धोरणांच्या पलीकडे जाऊन मोदीजी भारतीय संस्कृती आणि स्थळांना कसे प्रोत्साहन देतात, याला एक वैयक्तिक आयाम देखील आहे. त्यांनी केवळ भाषणांद्वारेच नव्हे, तर जगभरात योग लोकप्रिय करण्यापासून ते केदारनाथमध्ये अनवाणी चालण्यापर्यंत, अंदमान आणि निकोबार बेटांच्या पाण्यात बुडी मारण्यापर्यंत, अशा प्रत्यक्ष अनुभवांद्वारे जगासमोर भारताची पुन्हा नव्याने ओळख करून दिली आहे. असे करून ते स्वतः एक सांस्कृतिक राजदूत बनले आहेत, ब्रँड इंडिया केवळ बोर्डरूम किंवा धोरणात्मक कागदपत्रांमध्येच नव्हे, तर वाराणसीच्या घाटांवर, हिमालयाच्या शिखरांवर आणि केरळच्या किनाऱ्यांवर बांधला जात आहे या कल्पनेला बळकटी देत आहेत.

पंतप्रधान मोदी केवळ पर्यटनाला चालना देत नाहीत; तर ते त्याचे मूर्त स्वरूप आहेत. समाज माध्यमांवर भारतीय स्थळांचे वारंवार प्रदर्शन, भाषणांमध्ये स्थानिक सण आणि परंपरांचे उल्लेख तसेच भारतीयांना ‘प्रथम भारत जाणून घ्या’ असे आवाहन यामुळे देशांतर्गत पर्यटन अभिमानपूर्वक केले जाऊ लागले आहे. अधिकृत भेटींवरील त्यांचा पोशाख, मग ती नागा शाल असो, हिमाचली टोपी असो किंवा तमिळ वेष्टी असो, प्रादेशिक ओळख आणि परंपरांचा आदर राखतो, हे विविधतेतील एकतेचे प्रतीक आहे.

राष्ट्रीय नेते आणि जागतिक राजकारणी म्हणून मोदी भारताच्या नरम ऊर्जा, संस्कृती आणि अध्यात्माचे मूल्य ओळखतात. संयुक्त राष्ट्रसंघ, जागतिक आर्थिक मंच आणि जी-२० शिखर परिषदेतील त्यांची भाषणे अनेकदा भारताच्या वारशावर अभिमानाने प्रकाश टाकतात. योग आणि आयुर्वेदासाठी त्यांनी केलेल्या जागतिक स्तरावरील प्रयत्नांमुळे भारताला समग्र आरोग्याचे केंद्र म्हणून स्थान मिळाले आहे. आज देशभरातील आरामगृहांमध्ये येणारे १२०हून अधिक राष्ट्रांमधील साधक याचा पुरावा आहेत की, प्राचीन पद्धती जगभरातील आधुनिक जीवनशैलीला कशा आकार देत आहेत! अशाप्रकारे त्यांच्या नेतृत्वाखाली पर्यटन हे रोजगार, विकास आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे प्रभावी चालक म्हणून उदयास आले आहे.

२०२४मध्ये भारताने २९४.७६ कोटी देशांतर्गत पर्यटकांच्या भेटी नोंदवल्या. मागील वर्षाच्या तुलनेत ही १७.३६ टक्के वाढ होती. या क्षेत्राचा विस्तार होत असताना भारत केवळ त्याचा भूतकाळ साजरा करत नसून एक असे भविष्य घडवत आहे जिथे प्रत्येक प्रदेशाला जागतिक नकाशावर स्थान मिळेल. प्रत्येक राज्य, शहर आणि गावाला आता आपली कहाणी सांगण्याची संधी आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली, या कहाण्या जगभर पोहोचत आहेत.

‘ब्रँड इंडिया’च्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणाऱ्या नेत्यामुळे भारतीय पर्यटनाचे भविष्य मजबूत, गतिमान आणि शाश्वत आहे.

प्रिझम या आतिथ्य साखळीचे संस्थापक आणि सीईओ

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत