संपादकीय

भारतीय ज्ञानप्रणाली आणि अभ्यासक्रम आराखडा

राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ मध्ये प्रसिद्ध झाला व २०२५ मध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झाली. राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या प्रस्तावनेत राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० आणि एन.सी.एफ.च्या आधारे राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार केल्याचे कबूल केले आहे.

नवशक्ती Web Desk

शिक्षणनामा

रमेश बिजेकर

राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ मध्ये प्रसिद्ध झाला व २०२५ मध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झाली. राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या प्रस्तावनेत राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० आणि एन.सी.एफ.च्या आधारे राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार केल्याचे कबूल केले आहे.

कस्तुरीरंगन कमिटीचा अहवाल २०१९ ला प्रसिद्ध झाला आणि शिक्षण आशयाची चर्चा भारतात नव्याने सुरू झाली. भारतीय ज्ञानप्रणालीचा पुरस्कार करण्याची शिफारस अहवालात केली होती. भारतातील प्राचीन व महान ज्ञानाचा पुरस्कार भारतीय ज्ञानप्रणालीत केला आहे, असा दावा समर्थकांकडून केला गेला. हा दावा अमान्य करून प्राचीन व महान परंपरा कोणती, असा प्रश्न विरोधी विचार प्रवाहांनी उपस्थित केला. भारतातील विविध विचार प्रवाहांनी आपापला विरोध प्रदर्शित केला. यात मुख्यत: भारतीय ज्ञानप्रणालीत एकसुरी धर्मांध भूमिका घेऊन समावेशकता डावलल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतला. दुसरा आक्षेप बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवादाच्या सूत्रानुसार मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद विचारसरणीने घेतला. पितृसत्ताक वर्णजाती समर्थक ज्ञानप्रणालीचा पुरस्कार भारतीय ज्ञानप्रणालीत केला आहे ही महत्त्वाची चिकित्सा त्यांनी मांडली. भारतीय ज्ञानप्रणालीचा प्रतिवाद उभा करून कस्तुरीरंगन समितीची शिक्षण आशयाची भूमिका नाकारली. विरोधी विचारप्रवाहाची दखल न घेता राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०ने कस्तुरीरंगन समितीची शिफारस मान्य केली व लागू केली.

राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा भाग म्हणून एन.सी.एफ.ने केंद्रीय शाळांसाठी २०२३मध्ये अभ्यासक्रम आराखडा प्रसिद्ध केला व २०२४ मध्ये तो लागू केला. या आराखड्याने पितृसत्ताक जाती समर्थनाची व जात भांडवली उत्पादन कौशल्याची भूमिका घेतली. जाती व्यवस्थेचे बळकटीकरण व भौतिक शोषण व्यवस्थेच्या समर्थनात पिढ्या घडवण्यासाठी अभ्यासक्रम आराखडा तयार केला गेला. व्यवस्थेच्या समर्थनात विद्यार्थ्यांची जाणीव-नेणीव घडवणारी अभ्यासक्रमातील दोन उदाहरणे बोलकी आहेत. डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत अभ्यासक्रमातून काढून टाकला. डार्विनच्या सिद्धांताने वैज्ञानिक दृष्टिकोन, निसर्गनियम आणि तार्किक विचार शिकवला. अमिबा ते मनुष्यनिर्मितीचा जैविक, निसर्ग व सामाजिक सिद्धांत डार्विनने दिला. हा सिद्धांत समजून घेतल्यास ब्रह्माच्या मुखातून, बाहूतून, मांड्यांतून व पायातून माणूस जन्मल्याचा सिद्धांत गळून पडतो. मुख ते पायातून जन्माला आल्याची मिथ उभी करून वैज्ञानिक व निसर्गनियमाला डावलले. या मिथ्याने सामाजिक उतरंडीची नेणीव घडवली. या कालबाह्य झालेल्या समाजरचनेच्या बळकटीकरणासाठी डार्विनला बाजूला करून वेदांतिक (ब्राह्मणी) विचारसरणीचा पुरस्कार आराखड्यात केला आहे. रामायण, महाभारत यासारखे साहित्य व वेदांतिक मूल्य, नीती, परंपरा म्हणजे भारतीय ज्ञानप्रणाली असे प्रतिबिंबित करून एकसुरी व एकांगी भूमिका घेतली आहे.

दलित स्त्रियांच्या अमानवीय व क्रूर प्रथेवर अभ्यासक्रमात धडा अंतर्भूत होता. हा धडा काढून टाकण्यात आला. हा धडा जातीव्यवस्थेच्या इतिहासाची तोंडओळख करून देत होता. जातीव्यवस्थेच्या प्रथा, परंपरा, संस्कृती याविषयी विचार करण्याचा अवकाश निर्माण करू शकत होता. सामाजिक रचनेचे अंतरंग समजून घेण्यास मदत करत होता. प्रचलित जातीव्यवस्थेची चिकित्सा करून निर्णायक मत तयार होण्याची संभावना यातून निर्माण होऊ शकत होती. हे घडू नये यासाठी हा धडा काढून टाकण्यात आला. जातीव्यवस्थेची कारणमीमांसा व शोषणाची दाहकता दडवण्याची व्यूहरचना ब्राह्मणी व्यवस्थेची राहिली आहे. कालबाह्य झालेल्या पितृसत्ताक जातीव्यवस्थेची नसलेली महानता सांगून तिचे गौरवीकरण करणे ही दुसरी व्यूहरचना ब्राह्मणी छावणीची राहिली आहे. ब्राह्मणी प्रभूत्व कायम राहावे यासाठी जातीसमर्थक पिढ्या घडवल्या जात आहेत. एन.सी.एफ.च्या आराखड्याने तीच भूमिका घेतली आहे.

राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ मध्ये प्रसिद्ध झाला व २०२५ मध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पहिल्या वर्गाचा पाठ्यक्रम यावर्षी बदलला गेला. राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या प्रस्तावनेत राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० आणि एन.सी.एफ.च्या आधारे राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार केल्याचे कबूल केले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाने राज्य सरकारचे स्वतंत्र अधिकार संपुष्टात आणले आहे. राज्याचे केवळ प्रतिनिधित्व ठेवून एन.सी.एफ.ला अधिकार बहाल केले आहेत. निर्णयाच्या केंद्रीकरणातून राज्यातील विविधतेला व राज्यघटनेच्या निकषाला डावलले आहे. त्यामुळे एन.सी.एफ.चा २०२३ च्या आराखड्याचे महाराष्ट्रीयकरण करून राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ तयार केला आहे. त्यामुळे या आराखड्याने पितृसत्ताक जातीसमर्थनाची व जातभांडवली उत्पादन कौशल्याची भूमिका घेतली आहे. हा आराखडा २०२४ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्रात मोठा गदारोळ झाला. मनुस्मृती, गीतेचा १२वा अध्याय आणि रामदासाचे श्लोक आराखड्यात अंतर्भूत केले होते. याला प्रचंड विरोध झाला. मनुस्मृती, गीतेचा अध्याय आणि श्लोक काढून टाकण्याची भूमिका विरोधकांनी घेतली. हा विरोध आवश्यक होताच. परंतु या पलीकडे जाणे आवश्यक होते. भाषा, गणित, सामाजिकशास्त्रे, विज्ञान, पर्यावरण, मूल्यशिक्षण यात काय भूमिका घेतली हे तपासणे आवश्यक होते.

भाषा शिक्षणात अभिजन भाषेला झुकते माप दिले आहे. मातृभाषा व बहुभाषीय वर्ग अध्यापनाची चर्चा करून सहावीच्या पुढे मातृभाषेची सक्ती शिथिल केली आहे. संस्कृतचा अतिरेकी छुपा पुरस्कार केला आहे. विद्यार्थ्याच्या स्वभाषेला हद्दपार करून संस्कृत व मराठीच्या भाषेतून ब्राह्मणी नीतिमूल्यांचा पुरस्कार होणार हे उघड आहे. गणितातील स्त्रीसत्ताक काळातील योगदान, जैन, बौद्ध व जागतिक गणिताचे योगदान नाकारले आहे. वेदांतिक परंपरेतील गणित अभ्यासकांचे गौरविकरण केले आहे. भांडवली व वैदिक गणिताचा दृष्टिकोन स्वीकारला आहे. सामाजिकशास्त्राच्या अभ्यासात रीतीरिवाज, परंपरा, सण, पारंपरिक कुटुंबरचना, नातेगोते याचे दृढीकरण करण्याची भूमिका घेतली आहे. भारतात कुटुंबरचना, सण, प्रथा इत्यादी ब्राह्मणीनीती, मूल्यांवर अधिष्ठित आहे. या सामाजिक रचनेचा अभ्यासक्रमात पुरस्कार केला आहे. जातीव्यवस्थेच्या बळकटीकरणाची नेणीव घडवण्याचा प्रयत्न यातून होणार आहे. अभ्यासक्रमातील इतर विषयातही हा दृष्टिकोन पाहायला मिळतो.

२०२५-२६च्या शैक्षणिक सत्रात पहिल्या वर्गाच्या पाठ्यक्रमातून ब्राह्मणी नीतिमूल्याचा पुरस्कार केला आहे. मराठी भाषेच्या पाठ्यपुस्तकातील चित्रगप्पा २ मध्ये गावाचे चित्र दिले आहे. त्या चित्राचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात शेती, पशुपालन व स्त्रियांची कामे चित्रित केली आहेत. ट्रॅक्टर चालवण्याचे व गाईचे दूध काढण्याचे काम पुरुष करत आहेत. एक स्त्री मुलीची वेणी घालून देत आहे व दुसरी घरच्या अंगणातील फुलझाडांना पाणी घालत आहे. दुसऱ्या भागात पाहुणे चहा घेत आहेत. ते सर्व पुरुष आहेत. मुले खेळत आहेत. एक स्त्री तुळशीच्या वृंदावनाला नमस्कार करत आहे. या चित्रातून स्पष्टपणे स्त्री-पुरुषांच्या कामाची विभागणी आणि हिंदू प्रथा प्रतिबिंबित केली आहे. सहा वर्षांची मुले- ज्यांचा नेणीव घडण्याचा हा सुपीक काळ मानला जातो. त्याची नेणीव या चित्रातून ब्राह्मणी घडवली जाईल.

पुढचे चित्र आठवडी बाजाराचे आहे, ज्यात एक स्त्री हातात बांगड्या भरून घेत आहे. हे ‘सौभाग्याचे’ प्रतीक पितृसत्ताक नेणिवेचे बळकटीकरण करते. पाठ दहावा ‘सोहमचा दिवस’मध्ये आईवडील व गुरूच्या पाया पडणारा आदर्श विद्यार्थी दर्शवला आहे. त्यातील शरणागती मात्र दडवली आहे. भारतीय ज्ञानप्रणाली अशीच व्यवस्थेला शरण जाण्यासाठी पुरस्कृत केली आहे.

rameshbijekar2@gmail.com

ठाणे स्थानकाच्या विस्तारीकरणाला प्रारंभ; १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाटांची लांबी वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

“२० वर्षांपासूनचं स्वप्न अखेर साकार; तुम्ही फक्त वर्ल्डकप नव्हे, तर..."; विश्वविजेत्या भारतीय संघासाठी मिताली राजची इमोशनल पोस्ट

इतिहास रचला! भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी प्रथमच विश्वचषक जिंकला; दक्षिण आफ्रिकेला चारली धूळ

कोइंबतूर एअरपोर्टजवळील धक्कादायक घटना; कॉलेजच्या विद्यार्थिनीचे अपहरण करून तिघांनी केला गँगरेप; प्रियकरालाही केली मारहाण

'कोणीतरी मराठी अभिनेत्री आहे, पण जोपर्यंत रंगेहाथ पकडत नाही...'; गोविंदाच्या अफेअरच्या चर्चांवर नेमकं काय म्हणाली पत्नी सुनीता?