दृष्टिक्षेप
उत्तम जोगदंड
समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय नाकारलेला, जवळजवळ सर्वच क्षेत्रात बहिष्कृत, तिरस्कृत केलेला भारतीय इस्लाम आता आधुनिक अस्पृश्य जमात होऊ घातला आहे. जग मानवी मूल्यांचा आदर करत असतांना आपला देश मात्र मध्ययुगाकडे जातोय हे यातनादायी आहे.
शाळांना सुटी असल्याने मुलांची आणि नागरिकांची गर्दी होते म्हणून पुण्यातील सारसबाग दिनांक २८ आणि २९ मे, २०२६ रोजी बंद ठेवण्यात आली. संपूर्ण मे महिना मुलांना, शनिवारी-रविवारी पालकांना सुटी असतांना याच दिवशी बाग बंद का? प्रतिबंधात्मक आदेश लागू होते असे म्हणावे तर सारसबागच बंद का? सारसबागेतील मंदिर चालू कसे? या प्रश्नांची अधिकृत आणि तर्कसंगत उत्तरे कोणतीही यंत्रणा देणार नाही. दिनदर्शिकेतील २८ मे, २०२६ या तारखेत या प्रश्नांची उत्तरे मिळतील. या दिवशी नेमका बकरी ईद हा सण होता. मुस्लिम बांधव आपला सण साजरा करून बागेत फिरायला येत असतात. त्यांना बागेपासून ‘दूर’ ठेवण्यासाठी हा ‘सारसबाग बंद’चा खटाटोप. यावरून मुस्लिमांना बहिष्कृत करून ‘दूर’ ठेवण्याच्या प्रक्रियेचा हा एक भाग आहे ही शंका खरी ठरते. या विषयावर एक दृष्टिक्षेप टाकू या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘अस्पृश्य पूर्वी कोण होते?’ या शोधग्रंथात अस्पृश्यतेवर महत्त्वाचे निष्कर्ष काढलेले आहेत. अस्पृश्यतेचा कलंक दूर करण्यासाठी संविधानात अनुच्छेद १७ मध्ये विशेष तरतूद करून कायद्याने अस्पृश्यता संपुष्टात आणली आहे. परंतु, गेल्या दहा-बारा वर्षांपासून, आपल्या डोळ्यासमोर धर्मनिरपेक्षता, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या संवैधानिक मूल्यांना पायदळी तुडवून, अस्पृश्यतेच्या कटू इतिहासाची पुनरावृत्ती होतांना पहावे लागत आहे. या वेळी अस्पृश्य होऊ घातलेला वर्ग आहे भारतातील मुस्लिम. धार्मिक विद्वेषाच्या आधारावर मतांचे ध्रुवीकरण करून सत्तेत आलेल्या पक्षाचा आणि संलग्न संस्था-संघटनांचा मुस्लिम-द्वेषयुक्त अजेंडा आणि त्याची कठोर अंमलबजावणी, त्याकडे सरकारने जाणीवपूर्वक केलेले दुर्लक्ष, यामुळे भारतीय मुस्लिम आधुनिक अस्पृश्य जमात होऊ घातला आहे.
विशेष म्हणजे डॉ. आंबेडकर यांनी अस्पृश्य जातीच्या उत्पत्तीची जी कारणे सांगितली आणि आता मुस्लिमांना बहिष्कृत करण्यासाठी वापरली जाणारी पद्धत, यात कमालीचे साम्य दिसून येते. भारतातील अस्पृश्य हे त्या काळी युद्धात पराभूत झालेले उद्ध्वस्त लोक (ब्रोकन मेन) होते. म्हणून त्यांना गावाबाहेर ठेवले गेले, ते गोमांस भक्षण करायचे म्हणून त्यांना अपवित्र, अस्पृश्य ठरवले गेले, त्यांच्याशी रोटी-बेटी व्यवहार बंद केला गेला आणि त्यांना आताच्यासारखे मूलभूत अधिकार, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मानवी मूल्यांपासून वंचित ठेवले गेले. अगदी तेच तंत्र वर्तमानात मुस्लिमांच्या बाबतीत धर्मांध शक्तीद्वारा वापरले जात आहे. त्यासाठी पूर्वीच्या काळात उपलब्ध नसलेल्या आणि आता मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या माध्यमांचा वारेमाप वापर केला जात आहे.
मुस्लिम-मोगल लोकांनी भारतवर्षावर सहाशेहून अधिक वर्षे राज्य केल्यानंतर त्यांची सत्ता लयाला गेली. त्या अर्थाने ते पराभूत, उद्ध्वस्त लोक (ब्रोकन मेन) ठरतात. एकदा त्यांच्यावर अस्पृश्यता लादायची आहे म्हटल्यावर त्यांच्याविषयी मोठ्या प्रमाणात तिरस्कार, द्वेष, क्रोध, वैर, भय निर्माण करणे आवश्यक होते. मग, सगळे बादशाह कसे हिंदू-द्वेष्टे होते, त्यांच्या राजवटीत हिंदूवर किती अत्याचार केले, हिंदू धर्म बुडवण्याचा त्यांनी कसा प्रयत्न केला, याच्या खऱ्या-खोट्या कहाण्या प्रसारित करून, हेट स्पीच करून लोकांमध्ये क्रोध, द्वेष निर्माण केला गेला. मुस्लिम महिलांवरील बलात्कार काही कथित संतांकडून योग्य ठरवले गेले. ‘त्यांचे’ लोक चार बायका करून, प्रत्येक बायकोच्या पोटी चार चार मुले जन्माला घालून त्यांची लोकसंख्या वाढवणार आणि आपण आपल्याच देशात अल्पसंख्यांक होणार असे काल्पनिक भय लोकांच्या गळी उतरवले.
अफगाणिस्तान, सिरिया, पाकिस्तान आदी इस्लामी देशांत आतंकवाद फोफावला. आपल्याकडे काही मुस्लिम समाजातील तरुण आतंकवादी पकडले गेले. परंतु इथले सगळेच मुसलमान आतंकवादी असतात, असे सरसकट नरेटीव्ह जाणीवपूर्वक पसरवले गेले. त्यासाठी इस्लामी देशातील आतंकवाद्यांचे हिंस्र व्हिडिओ एडिट करून प्रसारित केले गेले.
मुस्लिम लोक गोमांसभक्षण करतात आणि गाय तर आपली पवित्र माता, असे सांगून त्यांच्याविषयी द्वेषाची पेरणी केली. ईशान्येकडील राज्ये, तसेच गोवा राज्यात हिंदूंसह अन्य गैर-मुस्लिम लोकही गोमांस भक्षण करत असतांना, मुस्लिम लोक गोमांसभक्षण करतात म्हणून त्यांचा मात्र तिरस्कार केला जातो. यातून मुस्लिमांनी गोमांस बाळगल्याच्या खोट्या आरोपावरून त्यांचे मॉब लिंचिंग केल्याची उदाहरणे घडली.
अस्पृश्यांचे स्थान गावाबाहेर असते. आता मुसलमानांना आपल्या वस्तीत, सोसायटीत कोणीही हिंदू भाड्याने किंवा विकत घर देत नाही. अगदी महानगरांमध्येही हीच स्थिति आहे. कित्येक मुस्लिम सेलिब्रिटींना याची झळ बसल्याच्या बातम्या येत असतात. गृह संकुलांमध्ये त्यांना जागा देऊ नये, असे अलिखित ठराव केले जातात. त्यामुळे या लोकांना ‘आपली’ वस्ती गाठावी लागते. वेगवेगळ्या जातीचे ‘वाडे’ असतात असा आता मुसलमानवाडा निर्माण झाला आहे आणि हे लोक अस्पृश्यांप्रमाणे ‘गावाबाहेर’ फेकले गेले आहेत.
हिंदू-मुस्लिम आंतरधर्मीय विवाह आपल्या देशाला नवीन नाहीत. तरीही 'लव्ह जिहाद' ही संकल्पना आणली गेली. मुस्लिम तरुण हजारो हिंदू तरुणींना फूस लावून त्यांच्याशी लग्न करतात, त्यांना जबरदस्तीने मुस्लिम, अतिरेकी बनवतात असा अपप्रचार केला जातो आहे. अशा काही तुरळक घटना घडल्याही असतील. परंतु प्रचारकी चित्रपटांनी त्याचे भयावह चित्र उभे केले. त्यामुळे, मुस्लिमांविषयीचा तिरस्कार अधिक तीव्र झाला. याचे पुढचे पाऊल म्हणजे काही राज्यात आंतरधर्मीय विवाह रोखण्यासाठी कडक कायदे करून असे विवाह अवघड करून टाकले आहेत. मुस्लिमांसोबत ‘बेटी-बंदी’ झाल्यात जमा आहे.
मुस्लिमांच्या हॉटेलातले पदार्थ, त्यांच्या फळांच्या गाड्यांवरील फळे खाऊ नयेत कारण ते लोक अन्नावर, फळांवर थुंकतात असे दर्शविणारे खरे खोटे व्हिडिओ प्रसारित केले जाऊ लागले. यामुळे मुसमानांचे ढाबे बंद पडू लागले आणि ‘रोटी-बंदी’ साधली गेली. त्याची पुढची पायरी म्हणजे एकूणच मुसलमानांच्या सर्वच प्रकारच्या सेवांवर, दुकानांवर बहिष्कार टाकला जात आहे. या बहिष्काराचे लोण मुस्लिम कलाकारांच्या सिनेमा, नाटकांवर बहिष्कार टाकण्यापर्यंत गेले आहेत.
मुसलमानांनी गरबा खेळायला येऊ नये म्हणून कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारावर वराह-पूजन करायला लावणे, चार धाम येथे मुस्लिमांना (गैर-हिंदूंना) प्रवेशबंदीचा प्रस्ताव आणणे, कावड यात्रा मार्गावर लावलेल्या टपऱ्यांवर मालकाचे नाव लिहिण्याचे बंधन घालणे, कुंभमेळ्यात मुस्लिम दुकानांना बंदी, इत्यादी पद्धतीने शक्य होईल तिथे मुस्लिमांना वेगळे पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याची परिसीमा म्हणजे मुसलमान जवळपास फिरकू नयेत म्हणून हिंदूंनी काही ठिकाणी, एरवी गलिच्छ मानली जाणारी डुकरे पाळणे सुरू केले.
मुस्लिमांच्या काही वस्त्या बुलडोझर लावून पाडल्या जात आहेत. एखाद्या गुन्ह्यात मुसलमान पकडल्यास त्याचे घर बुलडोझर लावून पडले जाते. एसआयआर अंतर्गत ठोक प्रमाणात मुसलमानांची नावे वगळून त्यांचा मताधिकार डावलला जात आहे. एनआरसी, सीएएमधील अन्यायकारक तरतुदीं विरोधात आवाज उठवणाऱ्या मुस्लिमांवर दहशतवादी, अर्बन नक्षलचा शिक्का मारून यूएपीएअंतर्गत खोट्या प्रकरणात अडकवून वर्षानुवर्षे तुरुंगात डांबले जात आहे.
अशा प्रकारे समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय नाकारलेला, जवळजवळ सर्वच क्षेत्रात बहिष्कृत, तिरस्कृत केलेला 'भारतीय इस्लाम' आता 'आधुनिक अस्पृश्य' जमात होऊ घातला आहे. सारे जग मानवी मूल्यांचा आदर करत असतांना आपला देश मात्र मध्ययुगाकडे जातोय हे अत्यंत यातनादायी आहे. परंतु काही कट्टरपंथी लोक वगळता अन्य बांधवांना मुस्लिमांशी केला जाणारा हा भेदभाव मान्य नाही, हे दिलासादायक आहे.
uttamjogdand@gmail.com