संपादकीय

पशू-पक्ष्यांच्या जगावरचे अंधश्रद्धांचे आक्रमण

माणसाची बुद्धी विकसित होताना अनेक अंधश्रद्धाही जन्माला आल्या. शिवाय माणसाची हाव सगळेच मला हवे, असे म्हणत अनियंत्रित झाली आहे. त्यामुळेच आज अनेक पशू-पक्ष्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. संथ गतीने चालणारे कासव, मांडूळ नावाचा बिनविषारी साप, कावळे, घुबड, वटवाघूळ, पाल, सायाळ, वाघ, मांजर, बकरा, गेंडा अशा पशू-पक्ष्यांविषयीच्या अनेक गैरसमजुतींमळे

नवशक्ती Web Desk

भ्रम विभ्रम

- अण्णा कडलासकर

माणसाची बुद्धी विकसित होताना अनेक अंधश्रद्धाही जन्माला आल्या. शिवाय माणसाची हाव सगळेच मला हवे, असे म्हणत अनियंत्रित झाली आहे. त्यामुळेच आज अनेक पशू-पक्ष्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. संथ गतीने चालणारे कासव, मांडूळ नावाचा बिनविषारी साप, कावळे, घुबड, वटवाघूळ, पाल, सायाळ, वाघ, मांजर, बकरा, गेंडा अशा पशू-पक्ष्यांविषयीच्या अनेक गैरसमजुतींमळे एक तर त्यांना पकडून पाळले जाते किंवा त्यांच्या नखांसाठी, केसांसाठी, मांसासाठी त्यांना ठार मारले जाते.

पृथ्वीवर मानवाबरोबरच अनेक पशू-पक्षी सुखाने जगत असतात. आपल्याला शुभ-अशुभ वाटते म्हणून माणसांचे अवयव इतर प्राण्यांनी वा पक्षांनी आपल्या घरट्यात टांगून ठेवल्याचे कधी ऐकीवात नाही. माणसाचा त्रास होतो म्हणून कुत्र्या-मांजरांनी रस्ता बदलल्याचे कधी पाहिले आहे काय ? मात्र माणसांच्या जगात याउलट कारभार आहे. कुणीतरी जिवंत कासव जवळ ठेवले तर धनाचा धबधबा आणखी वाढेल अशी अफवा पसरवली आणि लोकं कासवाची पिल्ले किंवा मोठी कासवं गुपचुप वा उघडपणे पाळू लागली. कासवाची चाल अतिशय मंद आहे. स्वत:चेच भक्ष्य शोधतानाच त्याची किती दमछाक होते. ते काय वाढवणार तुमच्या संपतीचा साठा? आता तर अशी अफवा आहे की कासवाची पूजा करून त्याचा बळी दिला तर ते गुप्तधन शोधून देते म्हणे! यामुळे कासव दिसले की त्याला पकडून त्याची गुपचूप विक्री करणाऱ्या टोळ्या कार्यरत झाल्या आहेत. जिवंत कासव मिळाले नाही तर घरात वैभव यावे म्हणून पितळेचे कासव पसरट भांड्यात पाणी भरून ठेवले जाते.

कासवासारखीच गत आज मांडूळ नावाच्या सापाची झाली आहे. खरे तर हा साप एकतोंड्या अन बिनविषारी असून तो अत्यंत संथपणे चालतो. त्याचा शेपटीकडचा भाग तोंडाप्रमाणेच गोल असतो. मग कोणीतरी पुडी सोडली की त्याला दोन्ही बाजूला तोंड असते आणि तो सहा महिने एका तोंडाने सरळ तर सहा महिने शेपटीकडच्या दुसऱ्या तोंडाने उलटा चालतो. तो चावला तर गावाच्या चारही सीमेवर गाढव ओरडले तरच विष उतरते म्हणे! याची पूजा करून बळी दिला तर हा मांडूळ जमिनीत पुरलेले तसेच घरात लपवलेले गुप्तधन शोधून देतो, असेही सांगितले जाते. ज्याला जमिनीत एका फुटांपेक्षा जास्त अंतर लपून राहता येत नाही तो तुम्हाला गुप्तधन कसे काय दाखवणार? काळी जादू करण्यासाठीही याची सर्रास तस्करी केली जाते. तस्कर मंडळी एका मांडुळासाठी काही हजार ते लाख रुपये मोजतात. या अंधश्रद्धेपायी आता या बिचाऱ्या बिनविषारी सापावर नामशेष होण्याची वेळ आली आहे. बाकी सर्वच सापांविषयी इतके गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत की दिसला साप की टाका मारून असा लोकांचा सरळ हिशोब असतो. साप डूख धरतो, तो पुंगी, बासरीचे सूर ऐकून धावत येतो असे थोतांड पसरवण्यात आपल्या फिल्मी लोकांचाही मोठा हात आहे. एक तर सापाला कानच नसतात. सापाला जमिनीवर होणारी कंपने आपल्या जिभेने समजतात आणि भक्ष्याच्या तापमानाद्वारे भक्ष्य नेमके कुठे आहे हे कळते. त्याला एक मीटरपेक्षा दूरचे दिसतही नाही. त्याचा मेंदू अतिशय लहान आहे. तो डूख धरुन कोणाला शोधत फिरणार? उंदीरमामा हे सापांचे आवडते खाद्य. शेतात तयार झालेले धान्य आणि गोदामात साठवलेले धान्य यापैकी २० ते ३० टक्के धान्य खाऊन आणि त्यावर घाण टाकून ते खराब करणारे उंदिर हा शेतकऱ्यांसाठीचा मोठा त्रास आहे. अशा उंदरांना त्यांच्या बिळात घुसून खाणाऱ्या सापांना आपण राष्ट्रीय स्तरावर मोहीम आखून वाचवले पाहिजे. अधश्रद्धांच्या बरोबरीनेच मिथकंही लोकांच्या मनावर प्रभाव पाडतात. त्यामुळेच एरवी मारला जाणारा साप नागपंचमीला मात्र आपल्याला पूज्य असतो. त्याला दूध अन ज्वारीच्या लाहया आवडतात हा जावई शोध कुणी लावला माहिती नाही. त्याच गैरसमजुतीपोटी अनेक सापांना गारुड्याकडून दूध पाजले जाते. गारुडी नागपंचमी अगोदर अशा सापांना उपाशी ठेवतात. साप पाणी समजून दूध पितात. मात्र दुसऱ्या दिवशी त्याचे पोट खराब होते आणि नंतर बहुतेक साप मरतात.

आपल्या घरात जाळी तयार करणारे कोळी अन् झुरळे पकडून खाणाऱ्या बिनविषारी पालींविषयी तर भयंकर गैरसमज आहेत. उदा. पाल विषारी असते हा एक मोठा गैरसमज आहे. अंगावर पाल पडली तर तो मोठा अपशकून मानला जातो. पाल चुकचुकली तर ते अशुभ असते म्हणे. एक ना दोन! त्यामुळे अनेक घरात दिसली पाल की झाडूची तलवार घेऊन पालीला मारण्याचे वा हाकलून लावण्याचे युद्ध सुरू होते.

वाघ हा जंगलातील अन्न साखळीतील महत्त्वाचा घटक आहे. पण वाघाचे कातडे हे वैभवाचे लक्षण मानले जाते. वाघनखे गळ्यात बांधून मिरवणे हे तर मर्दाचे लक्षण मानतात. वाघाची हाडे आणि इतर अवयव यांच्यापासून तयार होणारी पारंपरिक चिनी औषधे लैंगिक शक्ती वाढवतात हा चिनी लोकांचा परंपरागत समज असून तो त्यांनी जगभर पसरवला. म्हणून तर दर वर्षी भारतात १५० पेक्षा अधिक वाघांची हत्या होते.

कावळा, घुबड, गिधाड, वटवाघूळ हे पक्षी प्रामुख्याने मांसाहारी असून निसर्गात फुकटचे स्वच्छता कामगार म्हणून ते काम करतात. कावळे रोज सकाळी परिसरातील मेलेले उंदीर, बेडूक, सरडे, नदी-तलावाकाठाचे मासे पटापट खाऊन वातावरण स्वच्छ ठेवतात. पण याच कावळ्याचा स्पर्श अशुभ मानला जातो. पितृ पक्षात मात्र शोधून शोधून त्याच्यात आपल्या पूर्वजांचा आत्मा शोधला जातो. घुबड-वटवाघूळ हे रात्री संचार करत अंधारातही भक्ष्य शोधतात. पण त्यांचेही दर्शन अशुभ मानले जाते आणि अंधारात सहज संचार करतात म्हणून त्यांचा भुतांशी संबंध जोडतात. जणू भूते पिंगळा घुबड, वाटवाघूळ यांचे रूप घेऊन फिरतात. मांजराच्या डोळ्यांना तर भुताचे डोळे म्हणून रहस्यकथाकारांनी आणि फिल्मी दुनियेने बदनाम केले आहे. मांजर आडवे गेले तर ठरलेली कामे होणार नाहीत, ही तर व्यापकपणे पसरलेली अंधश्रद्धा आहे. अगदी सुशिक्षित मंडळींनाही तसे वाटते. मांजरे अंधारात सहज फिरतात कारण निसर्गत: मांजराच्या डोळ्यांच्या विस्तारणाऱ्या आणि प्रकाशसंवेदनशील असलेल्या बाहुल्या थोड्या प्रकाशातही चमकतात.

घुबड, पिंगळा रात्री शेतातील वा अंगणातील उंदीर पकडण्यासाठी फिरतात. त्यांचा जोडीदाराला साद घालणारा किंवा वेदनेचा आवाज मात्र माणसांना भीतीदायक आणि भयानक अशुभ वाटतो. कुत्रा रडतो, विव्ह‌ळतो तणावापोटी आणि माणसे म्हणतात आता कोणीतरी गचकणार.

मुंगुसाचे तोंड दिसले तर शुभ असते हा समज तर ग्रामीण भागात सर्रास आढळतो. लहानपणी परीक्षेचा पेपर चांगला जावा म्हणून आम्हा पोरांचा घोळका कितीतरी वेळ मुंगुसाचे तोंड दिसावे यासाठी ताटकळत थांबायचा. सापाचे विष मुंगूसाला बाधत नाही म्हणून मुंगुलाचे मांस खाल्ले जाते आणि त्यासाठी त्याची मोठ्या प्रमाणावर अवैध शिकार होते. खरे तर सापाने कितीही डंख मारण्याचा प्रयत्न केला तरी शरीरावरील जाड केसांमुळे मुंगूस आपले संरक्षण करून घेतो. सायाळीचा काटा जवळ ठेवला तर भूतबाधा होत नाही, या गैरसमजुतीपोटी दुर्मिळ होत चाललेल्या सायाळ प्राण्याचीही मोठ्या प्रमाणावर शिकार होते.

अतिंद्रिय शक्ती आणि दैवतांना आपल्या आवडीचे खाद्य नक्कीच आवडत असणार या गैरसमजातून अनेक ठिकाणी पशू-पक्षी यांचे बळी देणे आजही सुरू आहे. उस्मानाबाद येथील चिवरी यात्रेत चक्क रेड्याचा बळी दिला जायचा. आसाम, नेपाळ, अरुणाचल प्रदेश इथे आजही हे बळी देण्याचे प्रकार होतात. कबुतर, कोंबडा, बोकड ते गेंडा, हत्ती यांचे बळीही गुपचुप दिले जातात. जे प्राणी, पक्षी सहज पकडता येतात त्यांच्यावरच ही वेळ येते. यामागे आपल्याला इष्ट वाटणारी गोष्ट मिळावी म्हणून केलेले नवस, तसेच आपल्या जातीची आणि धर्माची परंपरा हेच कारण प्रामुख्याने असते.

शेळी, मेंढी हे प्राणी मांसाहार करण्यासाठीच जास्त पाळले जातात. मात्र काही बकऱ्यांच्या कातडीवरील केसांची नक्षी ही काही धर्माच्या लोकांना पवित्र वाटून पाच हजारांचा बकरा लाखो रुपयांना विकला जातो आणि पवित्र दिनी बळी दिला जातो. देवतांच्या आणि धर्माच्या नावे अशा गोष्टी बंद करायलाच हव्यात. पण यासाठी लोकांशी संवाद साधायला गेलो तर आस्था आड येतात आणि भावना दुखावतात. लोक हो, आपण शिक्षणाने प्रगती केली. पण आजही सुशिक्षित मंडळीही अशा गैरसमजुतींकडे डोळस होऊन पाहायला तयार नाहीत ही मोठीच खेदाची बाब आहे. सर्वांनी ठरवले तर समाजातून या गैरसमजूती हद्दपार होऊ शकतात. गरज आहे ती प्रखर इच्छाशक्तीची.

(लेखक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारी समिती सदस्य आहेत.)(kadlaskaranna@gmail.com)

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत