सन २०२१-२०२२ यावर्षाचे आयकर विवरणपत्र दंडाशिवाय भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२२ आहे. अर्थखात्याच्या सचिवांनी ट्विट करून मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे जाहीर केल्याने आजचा दिवस २८ जुलै सोडल्यास शेवटचे तीन दिवस राहिले आहेत. यापूर्वींच्या वर्षी, सरकारने विविध कारणांनी ते भरण्यास मुदतवाढ दिली. यावर्षीही सनदी लेखापालांच्या संघटनेने मुदतवाढीची मागणी केली असून ती रास्त आहे, कारण शेवटच्या तिमाहीत मुळातून कापून घेतलेला कर हा फॉर्म २६ एएस मध्ये किंवा एआयएस मध्ये पूर्णपणे दिसण्यासाठी मे अखेरपर्यंत वाट पाहवी लागते. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात आपण तांत्रिकदृष्ट्या विवरणपत्र भरू शकत असलो, तरी अनेकांना ते भरता येत नाही. अनेक नामवंत कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना देऊ करत असलेला फॉर्म १६ जूनमध्येच देतात. हा फॉर्म मिळाल्यावर विवरणपत्र भरण्याच्या हालचालींना सुरुवात होते. अनेक जण सुरुवातीस संथ असतात, मग अखेरच्या क्षणी त्यांची धावाधाव सुरू होते.
सुरुवातीपासूनच आपण आपल्याला सर्व मार्गांनी मिळणाऱ्या पैशांची व्यवस्थित नोंद वेळच्या वेळी करून ठेवली, तर यातील तपशिलाचे वर्गीकरण करून बेरीज करून ठेवणे एवढेच काम शिल्लक राहते. त्यामुळे आपण तणाव विरहित राहतो. तेव्हा आपण मागील वर्षी ही सूचना विचारात घेतली नसेल, तर नवे आर्थिक वर्ष सुरू होऊन केवळ चारच महिने होत असल्याने आपल्या सर्व उत्पन्नाच्या नोंदी आद्ययावत कराव्यात आणि पुढील वर्षी त्यापासून मिळू शकणाऱ्या आनंदाचा लाभ घ्यावा. आयकर विवरणपत्र स्वतःचे स्वतः भरावे की तज्ज्ञाकडून भरून घ्यावे, हा वैयक्तिक प्रश्न आहे; पण त्यासाठी आपले सर्व मार्गाने मिळणारे उत्पन्न त्याच्यप्रमाणे करात सवलत मिळवायची असल्यास अनेक कागदपत्रे लागतात. यातील कोणतेही कागदपत्र दाखवावे लागत नसेल, तरी आयकर विभागाकडून काही चौकशी झाल्यास त्याचा खरेपणा सिद्ध करण्याची जबाबदारी करदात्यावर असते; अन्यथा आपण दंड अथवा शिक्षा किंवा दोन्हींस पात्र ठरतो. तेव्हा कोणतीही माहिती दडवून ठेवू नये. यात काही चुकीची माहिती भरल्यास अंतिम जबाबदारी करदात्याची असते. त्यामुळेच जर दुसऱ्याने विवरणपत्र भरले तरी ते कसे भरले, हे नीट समजून घ्यावे. मी माझे विवरणपत्र स्वतः भरत नाही. अनेक जण ते भरतात. आपले विवरणपत्र आपणच भरणे कधीही चांगले. ते भरणे सोपे असले, तरी विभागाची त्यासाठी दिलेली यंत्रणा वापरकर्त्याच्या सोयीची नाही, असे माझे मत आहे. आता सर्व तपशील भरलेलाच फॉर्म देण्याची विभागाची योजना असून त्यास यश आल्यास ते करदात्यांच्या नक्कीच सोयीचे होईल. सध्यातरी विवरणपत्र भरणे ही गुंतागुंतीची तांत्रिक प्रक्रिया असल्याने सर्वसामान्य व्यक्तीच्या दृष्टीने हे एक आव्हान आहे, असे वाटते. अगदी शेवटच्या क्षणी ते भरताना काही चुका होण्याची शक्यता आहे, त्याचे दडपण येऊ नये म्हणून कोणत्या तयारीत असावे, याचा आपण विचार करू या -
विवरणपत्र भरण्याची पूर्वतयारी करणे - आयकर विवरणपत्र भरताना आपले उत्पन्नचा करपात्र/करमुक्त अशी विभागणी केलेला तपशील आणि बचत गुंतवणूक तपशील आवश्यक आहे. याशिवाय काही किमान गोष्टी आवश्यक आहेत, त्या अशा, पॅन, लॉग इन पासवर्ड (हा पासवर्ड माहिती नसेल तर पुन्हा निर्माण करता येईल; पण त्यात काही वेळ जाईल), ईमेल, मोबाइल तो आधारशी संलग्न मोबाइल असल्यास अधिक चांगले, बँक खाते तपशील इ.
आवश्यक कागदपत्रे हाताशी ठेवणे- आयकर विभागाला कोणतेही कागदपत्र द्यावे लागत नसल्याचे मी यापूर्वी सांगितले आहेच; परंतु पुन्हा खात्री करण्याच्या दृष्टीने सर्व कागदपत्रे एकत्रित हाताशी असावीत, यातील महत्त्वाची कागदपत्रे म्हणजे, फॉर्म १६, फॉर्म १६ए, फॉर्म २६एएस, एआयएस बँक स्टेटमेंट, कॅपिटल गेन स्टेटमेंट (आजकाल आपल्या ब्रोकरेज फर्मकडून तयार स्टेटमेंट मिळत असल्याने ते सुखकारक झाले आहे) अग्रीम कर भरल्याची चलने इ. या सर्वांची सॉफ्ट कॉपी असेल तरी चालेल.
सहज होणाऱ्या चुका टाळणे - शेवटच्या क्षणी घाईगडबडीत घरापासून मिळणारे भाड्याचे उत्पन्न किंवा काही उत्पन्नाना मिळणारी वजावट, काही उत्पन्न काही बचत गुंतवणूक अनावधानाने जाहीर करण्याचे राहून जाण्याची शक्यता असते, त्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घ्यावी.
करपात्र उत्पन्न कोणत्या पद्धतीने मोजावे - याबद्दल साशंकता असल्यास तज्ज्ञांची मदत घ्यावी, जरी मालकाने जुन्या पद्धतीने करमोजणी केली असली तरी करदात्यास नवीन पद्धतीने करमोजणी करून विवरणपत्र भरता येईल. जुन्या पद्धतीने अनेक करसवलती उपलब्ध असल्याने शक्यतो कोणताही बदल अखेरच्या क्षणी करण्यापूर्वी भविष्यात त्याचे काय परिणाम होतील, याचा विचार करावा.
योग्य फॉर्मची निवड - विवरणपत्र भरण्यासाठी वेगवेगळे फॉर्म उपलब्ध असून ते कोणास लागू आहेत, त्याचा तपशील विभागाच्या संकेतस्थळावर दिला असून त्याप्रमाणे योग्य फॉर्मची निवड करावी. दरवर्षी या फॉर्ममध्ये किरकोळ बदल होत असल्याने असे काय बदल झाले आहेत, ते समजून घ्यावे.
आपल्या उत्पन्नाची त्यावर मिळणाऱ्या सवलतींची अचूक मोजणी करूनच योग्य करभरणा करावा २६ एएस किंवा एआयएसमधील तपशिलात फरक असल्यास आपली हरकत घ्यावी किंवा परताव्याची मागणी करावी व विवरणपत्र वेळेत भरून दंड टाळावा. तरीही अनवधानाने काही उत्पन्न, बचत, गुंतवणूक तपशील जाहीर करायचे राहिल्यास सुधारित विवरणपत्र भरण्याची सवलत काही अटींवर सर्व करदात्यांना आहे.