संपादकीय

बेतालपणाला आवर घालण्याची गरज

महायुती सरकारमधील मंत्री आणि आमदारांची वादग्रस्त वक्तव्ये व गैरवर्तनामुळे सरकारची प्रतिमा मलीन होत आहे. लोकप्रतिनिधींनी केलेल्या अशा कृतींवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. जनतेच्या सेवेसाठी असलेल्या लोकप्रतिनिधींना संयम बाळगण्याची गरज आहे.

गिरीश चित्रे

महाराष्ट्रनामा

गिरीश चित्रे

महायुती सरकारमधील मंत्री आणि आमदारांची वादग्रस्त वक्तव्ये व गैरवर्तनामुळे सरकारची प्रतिमा मलीन होत आहे. लोकप्रतिनिधींनी केलेल्या अशा कृतींवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. जनतेच्या सेवेसाठी असलेल्या लोकप्रतिनिधींना संयम बाळगण्याची गरज आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे राजकारण सुरू आहे. संयमी, कर्तृत्ववान नेतृत्व अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ओळख; मात्र मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील मंत्री व आमदार यांची बेताल वक्तव्ये, एखाद्याला मारहाण करणे हे नित्याचेच झाले आहे. मंत्री व आमदार यांच्या गैरवर्तनामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे. ज्या मतदारराजाने हक्काने निवडून दिले, त्या मतदारराजाला सोयीसुविधा देणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे; मात्र शिंदे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कँटीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. महायुती सरकार मविआच्या टार्गेटवर येणे अपेक्षित होते. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे विधान, माजी आमदार बबनराव लोणीकर यांचे वादग्रस्त विधान यामुळे महायुतीतील तिन्ही घटक पक्षांची नाहक बदनामी होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील मंत्री व आमदारांना आवर घालणे गरजेचे आहे.

राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून मंत्री व आमदार यांचा तोल ढासळत आहे. शिळं जेवण दिल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कँटीनच्या कर्मचाऱ्यांवर मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. मारहाणीचे कोणीही समर्थन करणार नाही. त्यामुळे गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला समज देऊन अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करणे अपेक्षित होते. गायकवाड यांचे हे पहिलेच प्रकरण आहे, असे नाही, तर याआधीही त्यांनी “जीभ छाटणाऱ्याला १० लाखांचे बक्षीस” असे वादग्रस्त विधान केले होते. कृषी मंत्र्यांनीही शेतकऱ्यांप्रति वादग्रस्त विधान केले होते. भाजपचे माजी आमदार बबनराव लोणीकर यांनी तर मतदारराजाची लायकीच काढली होती. लोकप्रतिनिधींनीच कायदा हातात घेत असतील, तर सर्वसामान्य जनतेने कोणाकडून अपेक्षा करायची? त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ जाण्याआधीच लोकप्रतिनिधींना आवर घालणे अपेक्षित आहे. गेल्या काही वर्षांत राजकारणाचा पॅटर्न बदलला असून, जनतेच्या समस्या सोडवण्याऐवजी लोकप्रतिनिधी आपलाच तोरा मिरवत असल्याचे निदर्शनास येत आहे. अवकाळी पाऊस, कर्जास नकार यामुळे जगाचा पोशिंदा बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून त्याला मदतीची गरज असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले होते की,“कर्ज दिलं तर साखरपुडा, लग्नात खर्च करतात.” “तुम्हाला रेशन, जेवण, इतकेच नव्हे तर अंगावरचे कपडेही सरकार देते” असे वादग्रस्त विधान भाजपचे माजी आमदार बबनराव लोणीकर यांनी एका कार्यक्रमात केले होते. लोणीकर यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली. सत्ताधारी पक्षाचे मंत्री-आमदार अशी वक्तव्ये करत असतील, तर सर्वसामान्य जनतेने कोणाकडे बघायचे? लोकप्रतिनिधी म्हणजे जनतेने निवडून दिलेला जनतेचा सेवक; परंतु लोकप्रतिनिधी हमरीतुमरीच्या भाषेचा प्रयोग करत असतील, तर हे पक्ष आणि स्वतः मंत्री व आमदारांसाठी घातक आहे. त्यामुळे वादग्रस्त विधान करणारे, हमरीतुमरीवर येणारे मंत्री व आमदारांना आताच लगाम घालणे गरजेचे आहे. वादग्रस्त विधान, मारहाण या प्रकरणांची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिउत्साही मंत्री व आमदारांना समज देणे गरजेचे आहे.

एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष - या तीन पक्षांचे मिळून राज्यात महायुतीचे सरकार राज्याचा कारभार चालवत आहे. महायुतीत धुसफूस कायम असली, तरी पुढील पाच वर्षे महायुती सरकार सत्तेत कायम राहणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे महायुतीतील मंत्री, आमदार यांना जनतेसाठी चांगले करून दाखवण्याची संधी आहे; मात्र महायुतीतील मंत्री व नेते आपपसातील वादातच अडकले आहेत. नव्याने मंत्रिपद मिळालेल्या आमदारांना पदाचे सोने करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सत्ता येते आणि सत्ता जाते, राजकारणात एंट्री केल्यावर '८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण' अशी ओरड राजकीय नेत्यांकडून होत असते; मात्र गेल्या काही वर्षांत राज्यातील राजकारणात बदल घडत, आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरू आहे. तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी म्हणवणाऱ्या राजकारण्यांच्या तोंडाला येईल ते बोलणे, अपशब्द वापरणे, मारहाण करणे अशा गोष्टीच ऐकायला मिळतात. सत्ताधारी पक्षातील आमदार संजय गायकवाड यांनी केलेली मारहाण असो, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे वादग्रस्त विधान असो , या गोष्टी महायुती सरकारला अडचणीत आणणाऱ्या ठरू शकतात. त्यामुळे या अशा बाबींची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिउत्साही मंत्री व आमदारांना समज देणे गरजेचे आहे.

gchitre4@gmail.com

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती