मत आमचेही
ॲड. हर्षल प्रधान
गुजरातला कोकणापेक्षा मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे. मात्र सगळे पर्यावरणाची हानी करणारे प्रकल्प कोकणभूमीच्याच वाट्याला येत आहेत. कालांतराने कोकणाचे निसर्गसौंदर्य, तिथले पर्यटन, तिथली मत्स्यशेती या सगळ्यासमोरच प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे. स्थानिकांचा विरोध असूनही हे प्रकल्प कोकणाच्या माथी मारले जात आहेत. म्हणूनच असे का? हा प्रश्न उपस्थित करणे आवश्यक आहे.
भारताला ७५१६.६ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. भारतात, नऊ राज्यांना समुद्रकिनारा आहे. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओदिशा, पश्चिम बंगाल ही ती राज्ये आहेत. चार केंद्रशासित प्रदेशांनाही किनारपट्टी आहे. गुजरातला काठियावाड प्रदेशासह भारतातील सर्वात लांब समुद्रकिनारा लाभला आहे. अरबी समुद्राने वेढलेल्या गुजरात किनारपट्टीची लांबी सुमारे १६०० किमी आहे. मात्र तरीही गुजरातमध्ये कोकणाइतके प्रकल्प नाहीत.
असे का?
कोकणात अनेक प्रकल्प आहेत, येत आहेत. उदा. वीज प्रकल्प, रिफायनरी प्रकल्प, अणुऊर्जा प्रकल्प. दाभोळ येथे गॅसवर आधारित वीज प्रकल्प कार्यरत आहे. माडबन (ता. राजापूर) येथे युरेनियमवर आधारित अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजगाव-धाकोरे येथे एक हजार मेगावाॅटचा, मुणगे येथे चार हजार मेगावॉटचा वीज प्रकल्प होणार आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग परिसरात पाच ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग या भागात बारसूच्या सड्यावर रिफायनरी म्हणजे तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. तसेच लवकरच पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर उभारण्याच्या कामाला गती येत आहे. महाराष्ट्रातले इतर महत्त्वाचे प्रकल्प गुजरातला पळवणाऱ्यांना कोकणपेक्षाही मोठी समुद्रकिनारपट्टी असूनही वीज प्रकल्प, रिफायनरी प्रकल्प, अणुऊर्जा प्रकल्प यासारखे सामान्यांच्या जीविताशी गाठ असणारे प्रकल्प मात्र गुजरातला नेले जात नाहीत.
भारतातील कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भागात असलेला भूमीचा पट्टा आहे. कोकण किनारपट्टी हा एकूण ७२० किमी लांबीचा किनारा आहे. हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीचा एक खडबडीत भाग आहे. हा भाग दमण गंगा नदीपासून ते महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यानच्या तेरेखोल नदीपर्यंत पसरलेला आहे.
रत्नागिरी परिसरात, समुद्रकिनारपट्टीला लागून असलेल्या भागात आर्य येण्यापूर्वी 'कुंकण' नावाचे नागकुल वास्तव्य करीत होते. ते मोठे पराक्रमी कूल होते आणि या 'कुंकण' कुलाच्या काहीतरी चिरस्मरणीय कामगिरीमुळेच या प्रांताला 'कोंकण' हे नाव पडले. कोकण विभागात महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांचा समावेश होतो. कोकण किनारपट्टी गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर पसरलेली आहे. हिरवीगार झाडी, हिरवेगार धबधबे, सुंदर भूप्रदेश आणि स्वादिष्ट मत्स्याहार यासह कोकण पर्यटकांना सुट्टीचा आनंददायी आणि संस्मरणीय अनुभव देतो. प्रकल्पांमुळे उद्ध्वस्त कोकण भूमी
कोकणात लवकरच वाढवण बंदर येणार आहे. स्थानिकांचा या बंदरनिर्माणास विरोध आहे, पण त्यांच्या विरोधाला विचारतेय कोण? कोकणात असलेले प्रकल्प पाहिले तर हे प्रकल्प केवळ विकास करण्यासाठी आणले, स्थानिकांच्या रोजगारासाठी आणले की विनाश करून कोकणाचे निसर्गसौंदर्य कमी करून त्यास शापित भूमी बनवण्यासाठी आणले, असा प्रश्न पडतो. कोकणाचे निसर्गसौंदर्य नष्ट करणारे हे प्रकल्प खालीलप्रमाणे आहेत - वाढवण : वाढवण एमएसआरडीसी नवनगर, वाढवण मेगा पोर्ट, तारापूर : अणुऊर्जा प्रकल्प १ ते ६, बीएआरसी आण्विक इंधन रिसायक्लिंग प्रकल्प, बोईसर : रासायनिक एमआयडीसी, मोरबे जेएसडब्ल्यू पोर्ट,
केळवा : केळवा एमएसआरडीसी नवनगर, केळवा माहीम पेट्रोकेमिकल रिलायन्स प्रकल्प, थळ : आरसीएफ, अलिबाग : रोहा एमएसआरडीसी नवनगर, सालाव, रेवदंडा जेएसडब्ल्यू स्टील प्लांट, दिघी : अदानी पोर्ट, प्रस्तावित फार्मा पार्क, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोअर डीएमआयसी, श्रीवर्धन : दिघी एमएसआरडीसी नवनगर, केळशी, उतंबर, बॉक्साइट खाण, जयगड : जिंदाल स्टील प्लांट, जेएसडब्ल्यू औष्णिक ऊर्जा प्रकल्प, जयगड पोर्ट, पावस रनपार फिनोलेक्स उद्योग, आडिवरे वाडी खुर्व ‘एमआयडीसी’चा प्रस्ताव, आंबोळगड एमएसआरडीसी नवनगर आंबोळगड, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, देवगड एमएसआरडीसी नवनगर, कुडाळ, कणकवली बेसुमार काँक्रीटीकरण, वेळागर-शिरोडा : सप्ततारांकित हॉटेल-टाटा, आजगाव-धाकोरे, लोह आणि मँगनीज मायनिंग, रेडी : टाटा इस्पात, लोह आणि मँगनीज मायनिंग, डहाणू : अदानी कोळसा वीज प्रकल्प, तानसा, भातसा, वैतरणा धरण, पाताळगंगा, रासायनिक एमआयडीसी, पेण : नैना - नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लून्स नोटिफाइड एरिया, तिसरी मुंबई, डोलवी, धरमतर, जेएसडब्ल्यू प्लांट, रोहा : न्हावे एमएसआरडीसी नवनगर, रासायनिक एमआयडीसी, रिलायन्स पेट्रोकेमिकल्स, कोलाड, विले भागड, रासायनिक एमआयडीसी, तळा, म्हासळा, माझगाव एमएसआरडीसी नवनगर, महाड : रासायनिक एमआयडीसी, मंडणगड : माझगाव नवनगर, बॉक्साइट खाण, वापोली : देवळे एमएसआरडीसी नवनगर, खेड, लोटे परशुराम, रासायनिक एमआयडीसी, दाभोळ : दाभोळ वीज प्रकल्प, रीळ उंडी, वाटव खंडाळा : प्रस्तावित प्रोजेक्ट रिलायन्स डिफेन्स, गणपतीपुळे : गणपतीपुळे एमएसआरडीसी नवनगर, बारसू सोलगाव रिफायनरी, नाणार व सागवे, बॉक्साइट खाण,
सावंतवाडी : लोह आणि मँगनीज मायनिंग,
बांदा : बेसुमार काँक्रीटीकरण, ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे, शक्तिपीठ महामार्ग, दोडामार्ग : कोड आणि मँगनीज मायनिंग, रबर-अननस-काजू मोनोकल्चर, रियल इस्टेट बंगलो प्रोजेक्ट्स, दगड खाणी पश्चिम घाट. हे आणि असे असंख्य येणारे प्रकल्प कोकणभूमी उद्ध्वस्त करण्याचे काम करत आहेत.
प्रदूषण करतेय समुद्राचा नाश
महाराष्ट्राचा समुद्रकिनारा देशात सर्वाधिक प्रदूषित आहे, असा निष्कर्ष गोव्याच्या राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेने आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संयुक्त अहवालात नुकताच काढला आहे. पश्चिम किनारपट्टीवरील सागरजलाचे अकराशे नमुने घेऊन त्यांच्या अभ्यासानंतर हे अनुमान काढल्याचे या संस्थांनी म्हटले आहे. या अहवालानुसार संपूर्ण पश्चिम किनाऱ्यापैकी महाराष्ट्राची ७२० किमी लांबीची किनारपट्टी सर्वात जास्त प्रदूषित आहे. त्यातही मुंबई, गुजरातच्या किनाऱ्यावर हे प्रमाण लक्षणीय आहे. नदीमुखे आणि खाड्या हे किनाऱ्यावरील प्रदेश प्रदूषणामुळे जास्त बाधित आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्गचा किनारा तुलनेने कमी प्रदूषित असल्याचे या संस्थांनी म्हटले असले, तरी प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही. बोर्डी, एलिफंटा, रेवदंडा, मुरूड, देवबाग अशा अनेक ठिकाणी सागरी प्रदूषणाचे दुष्परिणाम प्रकर्षाने दिसत आहेत. केवळ लहान मासेच नाहीत, तर डॉल्फिनसारखे मोठे मासे मरून पडल्याच्या घटना समोर येत आहेत. दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी, प्लास्टिक पदार्थ यामुळे कोकणातील खाड्या प्रदूषित झाल्या आहेत. या समस्येची वेळीच दखल घेतली नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल यात शंका नाही. अनिर्बंध औद्योगिकीकरण, रासायनिक आणि तेल कंपन्यांकडून समुद्रात जाणारे दूषित पाणी, नाल्यातील सांडपाणी या सगळ्यांचा परिणाम जैववैविध्यावर होत आहे. मुंबईपासून ३० ते ५० किमी दूर समुद्रात प्राणवायूच नसल्यामुळे तिथे मासेही आढळत नाहीत. मुंबईपासून दीवपर्यंतच्या समुद्रात अतिघातक विषाणू असल्यामुळे तिथे जीवसृष्टी शिल्लक राहणेच अशक्य असल्याचे निरीक्षण संयुक्त अहवालात मांडलेले आहे. मुंबई आणि उपनगरे, तारापूर, वसई, मनोरी, वर्सोवा, वांद्रे, माहीम, वरळी, ठाणे, पाताळगंगा आणि अलिबाग या सर्व ठिकाणी प्रामुख्याने घरगुती सांडपाणी, औद्योगिकीकरण, ऊर्जा प्रकल्प यामुळेच प्रदूषणात वाढ झाल्याचे लक्षात आले आहे. उर्वरित किनाऱ्यांवर मात्र पर्यटनामुळे, सांडपाण्यामुळे आणि सरकारी व स्थानिक पातळीवर असलेल्या असंवेदनशीलपणामुळे ही समस्या उग्र रूप धारण करत आहे. स्वच्छ भारत अभियानाचे फलक कोकण किनाऱ्यावर हमखास दिसतात. मात्र किनाऱ्यांची स्वच्छता आणि प्रदूषणापासून त्यांची मुक्ती कोणी या प्रश्नांची उत्तरे काही मिळत नाहीयेत.
कोकणची माणसे साधीभोळी आणि म्हणूनच कदाचित विनाशकारी, प्रदूषणकारी प्रकल्प कायम त्यांच्या भाळी.. अशी परिस्थिती गेली अनेक वर्षं आहे. हे चित्र बदलेल का? आणि कधी?
प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष