संपादकीय

मुंबई प्रदूषणाच्या जाळ्यात

आडव्या-उभ्या मुंबईचा विकास झपाट्याने सुरू असताना वाढते प्रदूषण ही शहरासाठी गंभीर चिंता बनली आहे. विकासाच्या या धावपळीत पर्यावरणाकडे होणारे दुर्लक्ष आता थांबवणे अत्यावश्यक ठरत आहे.

गिरीश चित्रे

महाराष्ट्रनामा

गिरीश चित्रे

आडव्या-उभ्या मुंबईचा विकास झपाट्याने सुरू असताना वाढते प्रदूषण ही शहरासाठी गंभीर चिंता बनली आहे. विकासाच्या या धावपळीत पर्यावरणाकडे होणारे दुर्लक्ष आता थांबवणे अत्यावश्यक ठरत आहे.

मुंबईला प्रदूषणाचा विळखा हा याच वर्षी बसला असे नाही. गेल्या १० ते १२ वर्षांपासून झाडांची होत असलेली कत्तल, गगनचुंबी इमारती उभारण्याची शर्यत यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. हवेची गुणवत्ता खालावली, प्रदूषणात वाढ अशी ओरड पर्यावरणप्रेमींकडून केली जाते. उच्च न्यायालयासह केंद्र व राज्य सरकारने वाढत्या प्रदूषणावर मुंबई महापालिकेला धारेवर धरले. चहुबाजूंनी टीका होताच मुंबई महापालिका ॲक्शन मोडमध्ये येते आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पालिकेची धावाधाव सुरू होते. मुळात प्रदूषणात का वाढ होते, काय उपाययोजना केल्या पाहिजेत, यावर कोणीही एक शब्द उच्चारत नाही. प्रदूषणात वाढ झाली की पालिकेवर खापर फोडायचे आणि हात वर करायचे. मुंबईत फक्त प्रदूषण हा एकच प्रश्न आहे असे नाही, पावसाळा जवळ आला की खड्डे, उघडी मॅनहोल हे प्रश्न चर्चेत येतात. उघड्या मॅनहोल प्रश्नी दरवर्षी उच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागतो. पालिका प्रशासनाकडून काय उपाययोजना करण्यात आल्या, काय करणार याचा अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालय देते. अहवाल सादर केला जातो, पण दरवर्षी उपस्थित होणारे प्रश्न 'जैसे थे' राहतात. हवेची गुणवत्ता खालावली असून प्रदूषणात वाढ होत आहे, यावर काय उपाययोजना केल्या, असे मुंबई उच्च न्यायालयाने खडसावताच मुंबई महापालिका ॲक्शन मोडमध्ये आली. धुळीचे कण पसरण्यास कारणीभूत असलेल्या बांधकाम व्यावसायिकांना नोटीस बजावण्यास सुरुवात झाली. नोटीस, दंडात्मक कारवाई यातून हा प्रश्न निकाली निघेल याची शाश्वती नाही. त्यामुळे मुंबई प्रदूषणमुक्तीसाठी ठोस निर्णय घेणे काळाची गरज आहे. यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यानंतरच प्रदूषण नियंत्रित करणे शक्य होईल.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र वेगाने वाढणारी लोकसंख्या, वाहनांची संख्या, बांधकामांचा सपाटा आणि औद्योगिक विस्तार यामुळे मुंबई आज प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. हवेचे, पाण्याचे, ध्वनी व घनकचऱ्याचे प्रदूषण हे मुंबईकरांच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे. प्रदूषणमुक्त मुंबई घडवायची असेल, तर केवळ सरकारवर जबाबदारी टाकून चालणार नाही; प्रत्येक मुंबईकराने पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे. सर्वप्रथम हवेच्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. खासगी वाहनांचा अतिवापर, डिझेल वाहनांतून निघणारा धूर आणि बांधकामातून उडणारी धूळ यामुळे हवा विषारी होत आहे. यासाठी सार्वजनिक वाहतूक, मेट्रो, लोकल ट्रेन आणि बससेवेचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणे, वाहनांची नियमित प्रदूषण तपासणी करणे या गोष्टी महत्त्वाच्याच आहेत. मिठी नदी, समुद्रकिनारे आणि नाले सांडपाण्यामुळे दूषित होत आहेत. घरगुती व औद्योगिक सांडपाणी थेट नाल्यांत सोडण्यावर कडक निर्बंध आणणे गरजेचे आहे. मुंबईकरांनी प्लास्टिक, कचरा किंवा पूजासाहित्य समुद्रात टाकणे टाळले पाहिजे.

घनकचरा व्यवस्थापनात नागरिकांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे. ओला व सुका कचरा वेगळा करणे, घरगुती कचऱ्यापासून खत तयार करणे आणि एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला पूर्णविराम देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्लास्टिक पिशव्या, थर्माकोल आणि डिस्पोजेबल वस्तूंना नकार देणे ही काळाची गरज बनली आहे. कठोर कायदे, हरित क्षेत्र वाढवणे, वृक्षलागवड आणि प्रदूषण नियंत्रण यंत्रणा प्रभावी करणे आवश्यक आहे. मात्र नियमांची अंमलबजावणी यशस्वी होण्यासाठी मुंबईकरांचा सक्रिय सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे.

मुंबईतील बदलत्या वातावरणास आपण सगळे जबाबदार आहोतच. मुंबईत सुरू असलेली विविध प्राधिकरणांची सहा हजार कामे, बांधकाम करताना कुठल्याही नियमांचे पालन न करणे, मुंबईच्या तापमानात झपाट्याने वाढ होणे; याला मुख्य कारण झाडांची कत्तल आहे. झाडांची होणारी कत्तल यामुळे मुंबईत हिट वेवचा धोका वाढला आहे.

काँक्रीटचे जाळे विस्तारले जात असून हिटमुळे वाहतूक बेटांवर परिणाम होत आहे. त्यामुळे मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला बांधकामे जितकी जबाबदार तितकेच तुम्ही-आम्ही.

मायानगरी मुंबई देशाची आर्थिक राजधानी. मुंबईत काहीही घडले तर त्याची चर्चा तर होणारच. प्रदूषणात वाढ हा प्रश्न वर्षानुवर्षे चर्चेत आहे. परंतु ठोस निर्णय करण्याबाबत ना राज्य सरकार ना मुंबई महापालिकेने तसदी घेतली. ना वाढत्या प्रदूषणाला मुंबईकरांनी गांभीर्याने घेतले. हिवाळ्यात प्रदूषणात वाढ होते आणि वर्षातून एकदा विषय चर्चेला येतो. प्रदूषणात वाढ हा प्रश्न हिवाळ्यासाठी मर्यादित नसून प्रदूषणवाढीमुळे आरोग्यासह अनेक गोष्टींवर परिणाम होतो. बांधकाम ठिकाणी नियमावली जारी केली. परंतु यासाठी कायमस्वरूपी नियमावली असणे गरजेचे आहे. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात उघड्या मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर येतो. पावसाळ्यात खड्ड्यांचा प्रश्न चर्चेत येतो. वेळ निघून गेली की, हेच गंभीर प्रश्न चर्चेतही येत नाहीत. त्यामुळे वाढते प्रदूषण, कचऱ्याची समस्या, खड्ड्यांचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न यांसारख्या गंभीर प्रश्नांवर कायमस्वरूपी उत्तर शोधणे गरजेचे आहे.

वृक्ष लागवडीसाठी प्रत्येकाचा पुढाकार महत्त्वाचा!

मुंबईचा विकास झपाट्याने होत असला तरी मुंबईच्या मुळावर उठून विकास होत असेल तर तो कोणीच सहन करणार नाही. रस्ते काम, मेट्रो रेलचा विस्तार, गगनचुंबी इमारती उभारण्याची जणू शर्यतच लागली आहे. घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईचा विकास होत असताना झाडांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. याआधीच देण्यात आलेला ग्लोबल वाॅर्मिंगचा इशारा लक्षात घेता पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन ही काळाची गरज झाली आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने झाडांचे संवर्धन करणे गरजेचे झाले असून झाडे जगवा यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेत झाडे लावण्यावर भर देणे ही आपली जबाबदारी आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे.

gchitre4@gmail.com

ठाण्यात मंगळवारपासून १२ दिवस २०% पाणी कपात; न्युटिक गेट दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा कमी, बघा पाणी शटडाऊन वेळापत्रक

महाराष्ट्र सदन घोटाळा : मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता; ACBनंतर आता EDच्या प्रकरणातही दिलासा

Mumbai : सपा, राष्ट्रवादी गटाला समितीतही स्थान नाही; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकच समिती; एमआयएमला लॉटरी

...तर पालिका आयुक्त, अधिकाऱ्यांचे पगार रोखू; हायकोर्टाची तंबी: प्रदूषण रोखण्यात BMC प्रशासन अपयशी!

भारत-न्यूझीलंड टी-२० मालिका : इशान, सूर्याचा झंझावात; न्यूझीलंडवर सहज मात; दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा ७ गडी राखून शानदार विजय