आपले महानगर
मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी रेल्वे वेगळ्याच कारणांनी चर्चेत येऊ लागली आहे. गर्दीमुळे लोकलमधून पडून होणारे मृत्यू तसे नित्याचे झाले आहेत. यावर उपाय म्हणून स्वयंचलित दरवाजाची लोकल सेवेत आणण्याची तयारी रेल्वे मंत्रालयाने सुरू केली आहे.
नोकरी-व्यवसायानिमित्त लाखो प्रवासी दररोज लोकल प्रवास करतात. या प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध प्रकल्प राबवत असते. मात्र वेगाने होणाऱ्या नागरीकरणाच्या तुलनेत हे प्रकल्प अपुरे ठरत आहेत. सकाळी-सायंकाळी गर्दीच्या वेळी तर लोकलच्या डब्यात पाय ठेवण्यास जागा नसते. यातून होणारे वाद मुंबईकरांच्या अंगवळणी पडले आहेत. लोकलच्या डब्यात पाय ठेवण्यास जागा नसल्याने अनेक प्रवासी लोकलच्या दोन डब्यांमधील जागेत, टपावर तर कुणी दरवाजाला लटकून प्रवास करतात आणि यातूनच लोकलमधून पडून प्रवाशांना जीव गमवावा लागतो. दररोज किमान एक किंवा दोन प्रवाशांचा लोकल अपघातात मृत्यू होत आहे.
मध्य रेल्वेची उपनगरीय रेल्वे सेवा ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत-खोपोली व कसारा या मुख्य मार्गावर, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल/वांद्रे हार्बर मार्गावर, ठाणे ते पनवेल/वाशी ट्रान्स हार्बर मार्गावर तसेच नेरूळ/बेलापूर ते उरण पोर्ट मार्गावर अशी ३२५ किलोमीटर लांबीची आहे. मध्य रेल्वे या मार्गावर १८१० उपनगरीय लोकल चालवते. तसेच मुख्य मार्गावरून दररोज २१० पेक्षा अधिक मेल- एक्स्प्रेसही चालवते. सुमारे २४ तास चालणाऱ्या या सेवेत दररोज ४० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते डहाणूपर्यंत दररोज सुमारे १४०६ लोकल चालविण्यात येत आहेत. या लोकलमधून ३० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. लोकल गाड्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत आहेत.
मुंबई महानगर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत असताना मात्र त्या तुलनेत पायाभूत सुविधा निर्माण झाल्या नाहीत. लांबचा प्रवास करण्यासाठी आजही नागरिकांना रेल्वे मार्गावरच अवलंबून राहावे लागत आहे. रेल्वेवर पडणारा ताण कमी करण्यासाठी मेट्रोचा पर्याय आला आहे. मात्र रेल्वेला समांतर यंत्रणा निर्माण न झाल्याने लोकलवरील प्रवाशांचा ताण कमी झालेला नाही. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. लाखो प्रवाशांना सेवा देताना रेल्वे प्रशासनावर ताण येत आहे. मात्र कामात कसूर केल्यास अनेकांचे जीव जाऊ शकतात. हे मुंब्रा दुर्घटनेने दाखवून दिले आहे. मोटरमन, अभियंते आणि अन्य वरिष्ठ अधिकारी रेल्वे सेवा सुरळीत चालण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतात. यामुळे तर उपनगरीय लोकल अनेक आव्हाने पेलत सुरळीत सेवा देत आहे. परंतु एखाद-दुसरी घटना रेल्वेच्या बदनामीस कारणीभूत ठरते. अशा प्रसंगी वरिष्ठांनी प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.
जून महिन्यात मुंब्रा येथे झालेल्या दुर्घटनेत पाच प्रवाशांचा मृत्यू, तर नऊ प्रवासी जखमी झाले. या घटनेबाबत वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेने (व्हीजेटीआय) दिलेल्या अहवालामध्ये आणि तपास अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वे रुळांच्या देखभालीचे काम न केल्याने हा अपघात घडल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. यानुसार मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता समर यादव आणि सहाय्यक विभागीय अभियंता विशाल डोळस यांच्याविरोधात ठाणे रेल्वे पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. हे गुन्हे मागे घेण्यासाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने गेल्या आठवड्यातील गुरुवारी घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेने लाखो प्रवाशांना वेठीस धरले. लोकल ठप्प झाल्याने प्रवाशांनी चालत पर्यायी मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र याचदरम्यान लोकल सुरू झाली, याची कोणतीही माहिती रुळावरून चालणाऱ्या प्रवाशांना नसल्याने मशीद बंदर-सँडहर्स्ट रोड स्थानकांदरम्यान त्यांना लोकलने धडक दिली. यामध्ये दोन प्रवाशांचा मृत्यू झाला.
मुंब्रा घटनेमध्ये मृत्यू झालेल्या प्रवाशांचे कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. या घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत असताना रेल्वे संघटना दोषी अधिकाऱ्यांच्या बचावासाठी मैदानात उतरते. लाखो प्रवाशांना वेठीस धरून दोन जीवांचे बळी जाण्यास कारणीभूत ठरते. रेल्वे रुळामधून चालणे गुन्हा असला तरी तब्बल एक तास लोकल ठप्प करणारेही गुन्हेगार ठरवले गेले पाहिजेत. संघटनेने ६ नोव्हेंबर रोजी सीएसएमटी येथील डीआरएम कार्यालयासमोर मोर्चा काढण्याचे पत्र रेल्वे प्रशासनाला दिले होते. त्याप्रमाणे हा मोर्चा फलाट क्रमांक ७ आणि ८ पासून सुरू होऊन त्याचे रूपांतर एका मोठ्या बैठकीत होईल, असा उल्लेख पत्रात करण्यात आला. मात्र संघटनेने हा मोर्चा मोटरमन, लोकल व्यवस्थापकाच्या दालनाबाहेर काढला. मोटरमन, लोकल व्यवस्थापकांना आंदोलकांनी बाहेर येऊ न दिल्याने लोकल सेवा ठप्प झाली. या आंदोलकांना दूर करून लोकल सेवा सुरळीत करण्यात प्रशासनाला अपयश आले.
लाखो प्रवाशांना वेठीस धरल्याप्रकरणी आणि दोन मृत्यूस आजवर कोणासही जबाबदार ठरविण्यात आलेले नाही. याउलट मुंब्रा घटनेतील दोषींना वाचविण्यासाठी संघटना मैदानात उतरल्या आहेत. मात्र प्रवासी वाऱ्यावर आहेत. रेल्वे मार्गावर कोणताही तांत्रिक बिघाड होताच लोकल सेवा अधिकाधिक अर्ध्या तासात पूर्ववत केली जाते. मात्र संघटना आणि रेल्वे कर्मचारी तब्बल एक तास लोकल सेवा विस्कळीत करून प्रवाशांची गैरसोय करतात.
याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री आणि राज्य सरकारने दखल घेतलेली दिसत नाही. यातच जबाबदार अधिकाऱ्यांना संघटना पाठीशी घालू लागल्या, तर प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.
tejaswaghmare25@gmail.com