भवताल
ॲड. वर्षा देशपांडे
नांदेडमधील विदारक ऑनर किलिंग प्रकरण प्रेम, स्वातंत्र्य आणि समानतेला शत्रू ठरणाऱ्या जातीय हिंसेचे भयावह चित्र उभे करते. त्या तरुणीच्या धाडसी कृतीने मात्र जात, द्वेष आणि दहशतीपेक्षा प्रेम मोठे असल्याचा संदेश मिळतोय..
नांदेडमध्ये पद्मशाली समाजातील एका तरुणीचे बौद्ध समाजातील मुलावर प्रेम होते ही गोष्ट घरात कळली. त्यामुळे चिडून गेलेल्या भावाने बहिणीला पोलीस ठाण्यात त्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी नेले असता तिथे उपस्थित असणाऱ्या पद्मशाली समाजातीलच दोन पोलीस कॉन्स्टेबलनी त्या मुलीला त्या बौद्ध समाजातील मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करत नाही म्हणून तिच्या भावाला उचकवले. ते पोलीस कॉन्स्टेबल असे म्हणाले की, ‘तुझी बहीणच तुझ्या ताब्यात नाही तर मग जा की तुझ्या बहिणीचे ज्या मुलावर प्रेम आहे त्याला मारून मग तक्रार दाखल करायला तूच ये.’ ‘तसेच करतो’ असे म्हणून परत गेलेल्या भावाने वडिलांसह त्या बौद्ध समाजातील मुलावर गोळीबार केला. गोळीबारानंतरही तो मयत झाला नाही म्हणून अतिशय क्रूरपणे त्याच्या डोक्यात फरशी घालून त्याला मारून टाकले. ही घटना सदर मुलीला कळल्यानंतर ती मुलगी त्या ठिकाणी गेली. तिने त्या प्रेतासोबत सौभाग्याचे प्रतीक असणारा मळवट भरला आणि प्रतीकात्मक पद्धतीने स्वतःचे लग्न त्या प्रेतासोबत स्वतःच लावून घेतले. आता आपण सासरीच राहणार असल्याचे सांगितले. याबाबतचे दोनही व्हिडिओ महाराष्ट्रात समाज माध्यमांवर व्हायरल झाले आणि संपूर्ण महाराष्ट्र सुन्न होऊन हा प्रकार अनुभवत होता. जातीसाठी क्रूरपणे हिंसा करण्यात आली परंतु प्रेमासमोर ‘जात’ हरली आणि मृत्यू पश्चात प्रेम जिंकले आहे. आपल्याकडे हे असे का व्हावे? मागच्याच आठवड्यात आपण जाती अंताच्या संदर्भात ‘भवताल’ या आपल्या सदरामध्ये चर्चा केली. अलीकडे बदललेल्या अर्थव्यवस्थेत आरक्षणामुळे, मिळालेल्या शिक्षणाच्या संधीमुळे, नोकरीच्या संधीमुळे मोठ्या प्रमाणावर सर्व जाती धर्मातील मुलं-मुली एकत्र शिकतात. कोल्हापूर पुण्यासारख्या ठिकाणी हॉस्टेलवर राहतात. त्यांच्यामधली मैत्री आणि वयोमानाप्रमाणे प्रेमात पडणे हे स्वाभाविक आहे. देशपातळीवर आरएसएसच्या माध्यमातून कितीही फॅसिस्टवादी प्रवृत्ती धर्मांध, जात्यांध राजकारण करून समाजामध्ये फूट पाडत असली तरीही मोठ्या प्रमाणावर आंतरजातीय, आंतरधर्मीय लग्ने, प्रेमविवाह, परिचय विवाह होत आहेत.
एका बाजूला समाज माध्यमांमुळे, ‘ए आय’मुळे जग हे ‘ग्लोबल व्हिलेज’ झाले आहे असे आपण म्हणतो आहे आणि दुसरीकडे मात्र तंत्रज्ञानाचा गैरवापर करून जातीचे तुष्टीकरण, जातीच्या नावावर माणसांमध्ये ध्रुवीकरण होते आहे. असे दृढीकरण करून आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचे काम राजकीय पक्ष करत आहेत. काही राजकीय पक्षांचा तो उघड अजेंडा आहे. तर काही पक्ष या गोष्टी आडून छुप्या पध्दतीने जातीयवादी होत आहेत; जीवावर उठत आहेत. सर्वच पक्ष संविधानाची शपथ घेऊन सत्तेत येतात. राजकारण करतात. परंतु सत्तेत असणारे किंवा विरोधात असणारे सर्वच पक्ष पक्षांतर्गत स्ञीविरोधी आणि जातीचे राजकारण करणारे आहेत. त्याचाच परिणाम म्हणून सर्वसामान्य माणसे दिवसेंदिवस बंदिस्त होत आहेत, जातीवादी होत आहेत. नेते, अभिनेते मात्र त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या वैयक्तिक लग्नाच्या संदर्भात अगदी आंतरधर्मीय, आंतरजातीय लग्न सहजपणे मान्य करताना दिसतात. सेलिब्रेट करताना दिसतात. त्याची भली मोठी यादी देता येऊ शकते. परंतु सर्वसामान्य कुटुंबातील मुले प्रेमात पडून आपल्या चॉईसने आंतरधर्मीय, आंतरजातीय लग्न करण्याचा प्रयत्न करत असतील, प्रेमात पडत असतील तर त्याला मात्र विरोध होतो आहे, त्यामुळे मारहाण, खून होत आहेत.
अमक्या लोकांकडून सामान घेऊ नका; तमक्या जातीच्या लोकांकडे जावू नका असे मोठे बोर्ड गावोगावी लावले जात आहेत. कधी नव्हे ते सर्वसामान्य लोक त्याप्रमाणे वागून आपली देशभक्ती व्यक्त करत आहेत. अतिशय नियोजन पद्धतीने मुळातच असलेली ही जात अधिक कट्टर कशी होईल, बंदिस्त कशी होईल, प्रत्येक जात मस्तवाल कशी होईल यासाठी कार्यक्रम आखले जात आहेत. जात पंचायती बळकट होत आहेत. जातींचे मेळावे होत आहेत. वधु-वर मेळावे करून आपल्याच जातीतल्या मुला- मुलींची लग्न कशी होतील? यासाठी गावागावात प्रयत्न केले जात आहेत.
‘काश्मीर फाईल’, ‘केरला स्टोरी’ असे सिनेमे विशिष्ट राजकीय पक्ष सामान्य लोकांना गाड्या भरभरून थिएटरवर नेऊन मोफत दाखवीत आहेत. ‘लव जिहाद’च्या भयावह अशाच घटना रंगवून समाज माध्यमांवर व्हायरल केल्या जात आहेत.
लहान-सहान, किरकोळ कारणावरून कुरापत काढून दलित, अल्पसंख्यांक व्यक्तींना हेरून मॉबलिंचींग करून मारण्याच्या घटनाही याच दरम्यान घडल्या आहेत. समाज माध्यमांवर अकाउंट हॅक करून संदेश आणि पोस्ट चुकीच्या पद्धतीने व्हायरल करून विशिष्ट जाती- धर्मातील युवकांना टार्गेट करून त्यांना गुन्हेगार ठरविले जात आहे. या सगळ्या षडयंत्राचा भाग म्हणजे आंतरधर्मीय, आंतरजातीय होणाऱ्या प्रेमविवाहातील जोडप्यांना विरोध करणे, मारून टाकणे; तेही त्यांच्या जवळच्याच नात्यातील व्यक्तींकडून होत आहे. अवतीभवतीचे सामाजिक, राजकीय वातावरण संपूर्ण देशभरात विखारी-विषारी झाले आहे; सलोखा बिघडत चालला आहे. म्हणूनच अशा काळात कायद्याने समाजाला शिस्त लावण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखवावी लागते. परंतु जेव्हा सत्ताधारीच असे विखारी आणि विषारी वातावरण निर्माण करत असतात, पसरवीत असतात तेव्हा जनसामान्यांनाच सामूहिक शहाणपण दाखवावे लागते. कायद्याचे रक्षक असणाऱ्या संवेदनशील वकिलांनी आणि सामाजिक संस्था, संघटनांनी, न्यायाधीशांनी सक्रिय होऊन प्रोॲक्टिव्हली मॉबलिंचींग, ऑनर किलिंग या संदर्भातला स्वतंत्र कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करावा लागेल. त्यानुसार सामाजिक, राजकीय वास्तवामुळे विषारी, विखारी आणि हिंसक होत चाललेल्या जातीय मानसिकतेला आळा बसवावा लागेल.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही पातळीवर कायदा होण्यासाठीचे बील वाट पाहत आहे. सदर कायद्याच्या केलेल्या ड्राफ्टमध्ये केवळ हत्या करणाऱ्या जवळच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल होत नाही तर हत्येसाठी उचकविणाऱ्या व्यक्ती, व्यक्तींचा समूह, जात पंचायती, जात पंचायतीचे पदाधिकारी, भावकी, ज्यांनी त्या हत्या करण्यासाठी उचकवले त्यांनाही सहआरोपी करण्यात यावे असे या नवीन प्रलंबित असणाऱ्या कायद्यामध्ये म्हटले आहे. त्यामुळे सामूहिकपणे जातीचे संघटन करून अस॔विधानिकपणे सामाजिक दहशत माजवून आंतरजातीय, आंतरधर्मीय लग्न केलेल्या जोडप्यांच्या कुटुंबीयांना बहिष्कृत करण्याची भीती घालून, उचकवून हत्येला प्रवृत्त करत असतील तर हत्या करणाऱ्या व्यक्तीहूनही अधिक तीव्र असा हा गुन्हा आहे असे प्रस्तावित कायद्यात नमूद करण्यात आले आहे. आणि म्हणून हा कायदा अस्तित्वात येणे ही काळाची गरज आहे. याबाबत जनसामान्यातून आणि संविधान टिकावे असे वाटणाऱ्या नागरिकांमधून या कायद्याची मागणी व्हायला हवी आहे. तर आणि तरच अशा घटना आपण रोखू शकू. केवळ अशा घटना घडल्यानंतर पीडित व्यक्तींसाठी नक्राश्रू ढाळणे पुरेसे नाही. त्यामुळे दोन्ही कुटुंब जातीसारख्या, असंविधानिक, अवैज्ञानिक विचार आणि व्यवस्थेमुळे उद्ध्वस्त होतात. जाती संपवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागेल. आंतरधर्मीय, आंतरजातीय लग्न हे त्यावरील उत्तर आहे. कमीत कमी तरुण जोडप्यांची वाताहत न होता त्यांच्या कुटुंबीयांची बरबादी न होता आपण हा सलोखा कसा टिकवणार हे काळच ठरवेल. परंतु नांदेडमधील त्या तरुणीच्या कृतीने त्या तरुणाच्या मृत्यूपश्चात जात संपेल आणि प्रेम जिंकेल हा विश्वास दिला आहे; तिच्यासोबत आपण उभे राहूया.
आतापर्यंत उत्तर भारतामध्ये समगोत्रातील किंवा सगोत्रातील लग्न किंवा आंतरधर्मीय, आंतरजातीय लग्न याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर ऑनर किलिंग आणि खरंतर शेमफुल किलींग्ज होत होती; परंतु पुरोगामी महाराष्ट्रात २०१४ सालापासून जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात या पद्धतीच्या झालेल्या हत्यांबाबत गुन्हा दाखल झाला आहे. हा केवळ २०१४ सालापासून फॅसिस्ट विचाराची सत्ता राज्यात आणि केंद्रात आहे आणि याच काळामध्ये सर्वाधिक या प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत; हा केवळ योगायोग म्हणता येत नाही.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लेक लाडकी अभियानाच्या संस्थापक