Mumbai दुधासाठी रडणाऱ्या चिमुरड्याला दारावर आपटले; ४ वर्षीय मुलाच्या मृत्यूप्रकरणी वडील अटकेत

पवईतील गौतमनगर परिसरात दुधासाठी रडणाऱ्या ४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मुलाला दारावर आणि जमिनीवर आपटल्याचा आरोप वडिलांवर असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. राजावाडी रुग्णालयातील शवविच्छेदन अहवालानंतर प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.
Mumbai दुधासाठी रडणाऱ्या चिमुरड्याला दारावर आपटले; ४ वर्षीय मुलाच्या मृत्यूप्रकरणी वडील अटकेत
'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबईतील पवई परिसरात दुधासाठी वारंवार रडणाऱ्या चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलाचे वडील राजेश प्रकाश सिंह (वय २७) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, संतापाच्या भरात मुलाला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.

दुधासाठी रडत होता चिमुरडा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश सिंह पवईतील गौतमनगर परिसरात आई, पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत होता. यातील धाकटा मुलगा यश (वय ४) हा विशेष गरजा असलेला (Special Child) होता आणि प्रामुख्याने दुधावर अवलंबून होता.

राजेश बेरोजगार असून त्याला मद्यपानाचे व्यसन असल्याचे सांगितले जात आहे. आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक वादांमुळे त्याची पत्नी सुमारे १५ दिवसांपूर्वी माहेरी गेली होती. मोठा मुलगा राजेशच्या बहिणीकडे राहत होता.

पहाटे घडली घटना

२९ मे रोजी पहाटे यश दुधासाठी रडू लागला. त्याच्या रडण्यामुळे झोपमोड झाल्याने राजेशचा संताप अनावर झाला. त्याने मुलाला दारावर आपटले आणि जमिनीवर आपटल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या मारहाणीत मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर सकाळी राजेशने आपल्या बहिणीला यशचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.

राजावाडी रुग्णालयात मृत घोषित

घटनेची माहिती मिळताच पवई पोलिस घटनास्थळी पोहोचले. यशला तातडीने घाटकोपर पूर्व येथील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

शवविच्छेदन अहवालात मुलाच्या कवटीला फ्रॅक्चर झाल्याचे समोर आले असून गंभीर मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा संशय अधिक बळावला आहे.

Mumbai दुधासाठी रडणाऱ्या चिमुरड्याला दारावर आपटले; ४ वर्षीय मुलाच्या मृत्यूप्रकरणी वडील अटकेत
पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने केली इच्छामरणाची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं पत्र

चौकशीत गुन्ह्याची कबुली

पोलिसांनी सांगितले की, सुरुवातीला राजेश सिंह याने दिशाभूल करणारी माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सखोल चौकशीनंतर त्याने मुलाला मारहाण केल्याची कबुली दिली. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून १ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तपास सुरू

पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून कौटुंबिक परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि घटनेमागील इतर कारणांचाही तपास केला जात आहे. या घटनेमुळे पवई परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in